रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

श्री क्षेत्र माणकोबावाडा ( Shree Siddhnath Jogeshwari Mandir Mankobawada )


माझ्या गावातलं जागृत देवस्थान
श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवस्थान

श्री सिद्धनाथ मंदिर माणकोबावाडा ( shri siddhnath mandir mankobawada )


भारतीय संस्कृती हि पुर्णपणे विविधतेने नटलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात अधिक विविधता पहावयास मिळेल धर्म संस्कृती, परंपरा, त्याचबरोबर आराध्य दैवत. वेगवेगळ्या ठिकाणी अशी अनेक वेगवेगळी देवस्थाने आहेत ज्या देवस्थानांबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आहे. आणि त्याच श्रद्धेपोटी ती लोकं वर्षातुन किमान एकदा तरी त्या मंदिराला भेट देतात. आणि आपल्या मनातील दैवताला पाहुन मनातुन समधानी होऊन पुन्हा रोजचे जीवन आनंदाने जगतात. म्हणजे त्या देवाला पाहिल्यावर लोकांच्या मनात एक नवी उर्जा निर्माण होते. यामुळेच मंदिरात मोठ्या प्रामाणात लोकं  एकत्र येतात. व ज्या ठिकाणी देवावरील श्रद्धेपोटी भाविकभक्त मोठ्या प्रमाणावर त्या देवस्थानाला भेट देतात. अशी देवस्थाने जागृत समजली जातात.
     पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावापासुन यवत गावाच्या दक्षिण बाजुला ४ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत माणकोबावाडा गावच्या माळावर एक जागृत देवस्थान म्हणून श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर आहे. या मंदिरात वर्षभरात असंख्य भाविक भक्त येऊन या मंदिराला भेट देत असतात. या ठिकाणी वर्षभर अनेक कार्यक्रम होत असतात. वर्षभरात मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो. या सिद्धनाथ जोगेश्वरी देवाची एक वेगळीच आख्यायिका सांगितली जाते. ती आपल्याला माणकोबा बिचकुले या सिद्धनाथाच्या भक्ताकडे घेऊन जाते.
     माणकोबा काशिबा बिचकुले हा धनगर मुळचा साताऱ्यातील आपल्या मेंढरांना घेऊन रानोमाळ हिंडत असताना तो साताऱ्यातील माण तालुक्यातील माणगंगेच्या काठी असणाऱ्या दक्षिणकाशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या म्हसवड नगरीतील सिद्धनाथ जोगेश्वरी देवाची भक्ती करीत होता. देवावरील अपार भक्तीमुळे तो देवासाठी जिथे असेल तेथुन देवाला भेटण्यासाठी म्हसवडला जात असे. माणकोबाच्या जीवनाचा प्रवास असाच मजल दरमजल वाढत गेला. तेव्हा माणकोबाला देवाच्या दर्शनासाठी जाणे अवघड होऊ लागले. तेव्हा माणकोबाने देवाला मनोमन प्रार्थना केली. देवान माणकोबाचं ऐकलं आणि या माणकु धनगराच्या वाड्यात उजाड माळावर कायमचं ठाण मांडल. माणकु धनगराच्या फिरत्या जिवनाला स्थैर्य मिळाल. माणकोबाने आपल्याबरोबर आपल्या समाजबांधवांना या ठिकाणी एकत्र करून आनंदाने आपल्या मेंढरासोबत राहुन देवापाशी राहु लागला. हळुहळू या सिद्धनाथ जोगेश्वरीची भक्ती यवत आणि यवत पंचक्रोशीतील भाविक आनंदाने करू लागले. पुणे जिल्ह्यातील भाविकांबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर देवासाठी या धनगरवाड्यावर येऊ लागले. देवाच्या श्रद्धेपोटी आलेला भाविक या ठिकाणाहून आपल्या मनात समाधान आणि नाथबाबांचा आशीर्वाद घेऊन जाऊ लागला. हळूहळू या धनगर वाड्याची ओळख नाथभक्त माणकोबा वरून माणकोबावाडा अशी झाली. या ठिकाणी म्हसवड सिद्धनाथ येथे ज्याप्रमाणे कार्यक्रम होतात. त्याचप्रमाणे कार्यक्रम वर्षभर होऊ लागले. आणि मोठ्या उत्साहाने भाविक देवाच्या दर्शनासाठी वर्षातुन अनेक वेळा येऊ लागले. आपल्या अडीअडचणी देवापाशी बोलुन मनात समाधान घेऊन परत जाऊ लागले. आज याठिकाणी पुणे जिल्ह्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाबरोबरच कर्नाटक राज्यातील भाविक सुद्धा मोठ्या भक्तिभावाने येत आहेत.


श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 

वर्षभरातील कार्यक्रम
    या ठिकाणी वर्षभर अनेक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाला देवासाठी दूरदूरवरून भाविक येऊन देवाचे दर्शन घेतात. स्वखुशीने अन्नदान करतात. वर्षभरात पोर्णिमा, यात्रा, नाथजन्मोस्तव त्याचबरोबर अनेक छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमासाठी हजारो भावीक या ठिकाणी येतात.

१ ) श्रावणी पौर्णिमा :
 श्रावण महिन्यातील श्रावणी पोर्णिमा या दिवशी माणकोबावाडा येथे पौर्णिमेच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. या दिवशी सकाळी देवाचा अभिषेक करून उत्सवाला सुरुवात होते. दिवसभर भाविक येत असतात. व देवाला राखी बांधून गुलाल नारळ अर्पण करतात. या दिवशी रात्री छ्बिण्याचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये सर्व भाविक एकत्र येऊन ढोलाच्या तालावर गजनृत्य सादर करतात. व त्यानंतर महाभोजनाचा कार्येक्रम असतो. अशाप्रकारे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. व भाविक हि मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात.

श्रावणमासी पौर्णिमेला 
भेटावया जाऊ देवाला 
राखी बांधुन हातात 
मागु मागण 
यावे धावुन संकटात 
देवा माझ्या सिदोबा 
देवा माझ्या माणकोबा 
आलो तुझ्या दर्शनाला 
या श्रावणमासी पौर्णिमेला 
यावे धावुनी हाकेला ....
यावे धावून हाकेला ....

या श्रावणी पोर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविक देवासाठी येतात. देवाला राखी वाहुन आपलं गाऱ्हाण देवाला सांगुन संकटात मदत म्हणुन धावुन यावे अशी देवाला विनंती करतात.
अशाप्रमाणे या श्रावणी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवतात.

२) दसरा :
या दिवशी माणकोबावाडा व आसपासची पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन संध्याकाळी शिलांगणाचा कार्यक्रम होतो. देवाचा छबिना काढण्यात येतो. धनगरी लोककला असणारे गजनृत्याचे वेगवेगळे खेळ खेळले जातात. रात्री उशिरा देवभेटीचा कार्यक्रम होतो. यामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने देवाला आपट्याची पाने सोन भेट म्हणुन वाहतात. नंतर एकमेकांची गळाभेट घेऊन आपट्याची पाने एकमेकांना देता आनंदाने सोन लुटण्याचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर परिसरातील देवांच्या भेटीसाठी सारेजण एकत्रित ढोल वाजवत देवांना सोन वाहण्यासाठी जातात.

दिस आज सोन्याचा
दसरा आनंदाचा सण
भेटीस आलो देवा
घेऊन दसऱ्याच सोनं

३) दिवाळी, घटस्थापना आणि यात्रा :
श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर माणकोबावाडा 

दिवाळी हा हिंदु संस्कृतीतील महत्वाचा सण या दिवाळी सणाला देवासाठी अनेक भाविक येऊन दर्शन घेऊन जातात. दिवाळीनंतर दिवाळी पाडवा भाऊबीज या दिवशी देवाला सायंकाळी हळदी लावुन मंदिरात घटस्थापना केली जाते. त्यानंतर देवाला येणारे सारे भाविक आपापल्या घरी देवाचा घट बसवतात. आणि बारा दिवस कडक उपवास करतात. या बारा दिवसात रोज सकाळ संध्याकाळी देवाचा छबिना काढण्यात येतो. या बारा दिवसात अनेक भाविक श्रद्धेने देवाला येऊन दर्शन घेतात. देवापाशी दिवे लावतात. या बारा दिवसात मंदिर परिसरात मोठे आनंदाचे वातावरण असते. सर्वत्र सकाळ संध्याकाळ ढोलांचा आवाज घुमत असतो. त्याला गजनृत्याची साथ असते. बाराव्या दिवशीभ तुळशीविवाहाच्या दिवशी देवाचे लग्न लावण्यात येते. आणि घट उठविण्यात येतात. देवाला सर्वत्र पुरणपोळीचा नैवैद्य करण्यात येतो. भाविकांची वर्दळ वाढू लागते. आणि यात्रा भरू लागते.
     हि यात्रा दोन दिवसाची असते. हजारोंच्या संख्येने भाविक या माणकोबा वाड्यावर एकत्र येतात. गुलालखोबऱ्याची उधळण करण्यात येते दोनही दिवस गजनृत्याचा कार्यक्रम असतो. या ठिकाणी तमाशा सारखी लोककला सादर केली जात नाही. कारण येथे गजनृत्य हि लोककला जपण्याचा देवाच्या सानिध्यात राहुन देवाचा आशिर्वाद मिळविण्याचा भक्त प्रयत्न करत असतो. पुर्णपणे गुलालात रंगत " सिद्धनाथाच्या नावाने चांगभले" चा गजर करत सारे भक्त देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत असतात. यात्रेचा आनंद घेत असतात.

देवा तुझा भक्त भोळा
करी उधळण खोबर गुलालाची  
चिंब गुलालात रंगत
आस ठेवी दर्शनाची
 तुझ्या दर्शनाची ओढ
भेटीस आतुरले मन
पाहुन मुर्ती डोळयांन
होई देवा समाधान !!!

     अशाप्रकारे प्रत्येक भक्त यात्रेत देवाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि आशिर्वाद म्हणुन देवाच्या मंदिरात उधळलेल गुलाल खोबर सोबत घेऊन जात असतो.

४ ) नाथजन्मोत्सव :-
यात्रेनंतर आठ दिवसांनी काळभैरव जन्माष्टमी या दिवशी सकाळी देवाला अभिषेक केला जातो.  त्यानंतर मंदिरात होमहवन केले जाते. रात्री देवाचा पाळणा बांधुन जन्मोत्सव साजरा केला जातो. पंचक्रोशीतील भाविक त्याचबरोबर दूरदूरचे भाविक या कार्यक्रमाला उपस्थित असतात. रात्री आरती केली जाते आणि महाभोजनाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होते.


५ ) रिंगावण आमावस्या :
 यात्रेनंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या आमावसेच्या दिवशी मूळ ठाण म्हसवडची यात्रा असते. या दिवशी माणकोबावाडा येथील ग्रामस्थ पुजारी सारे मिळुन म्हसवडच्या यात्रेला जातात. कारण पूर्वी माणकोबा देव आपल्यापाशी असला तरी मूळ ठाण असणाऱ्या म्हसवड सिद्धनाथ यात्रेला आवर्जुन जात असत. त्याचप्रमाणे मोठ्या श्रद्धेने सारेजण मिळुन म्हसवडला जातात. तेथील देवाला तसेच घरच्या या देवालाही गोड नैवैद्य केला जातो.

६) माघ पोर्णिमा :
माघ महिन्यात येणाऱ्या  माघ पोर्णिमा या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. या दिवशी सकाळी देवाचा अभिषेक केला जातो. त्यानंतर आरती करण्यात येते. व रात्री ८ ते ९ च्या सुमारास देवाचा छबिना काढण्यात येतो. त्याचबरोबर पालखी मध्ये देवाच्या मूर्तीला मंदिर प्रदक्षिणा घालण्यात येते. या छबिन्याच्या कार्यक्रमाला रंगत येते ती गजानृत्यामुळे सर्व भाविक भक्त एकत्र येऊन हे धनगरी गजानृत्य सादर करतात.

ढोलाच्या या तालावर
धरुनिया फेर 
कसा डुलत झुलत नाचतो 
माझ्या गजाचा अवतार 

डिपांग रिपांग डीटीपांग रिपांग, रिपांग रिपांग डिंपांग रिपांग   या तालात लय धरून वेगवेगळ्या चालीवर हे गजानृत्य केले जाते. यामध्ये सर्व ढोल वाजवणारे ढोले, नृत्य करणारे गजे बेभान होऊन नाचतात. उपस्थित भाविक त्यांच्यावर भंडार गुलालाची उधळण करतात. त्यानंतर छबिना मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरात येतो. त्यानंतर देवाची धुपारती केली जाते. व  महाभोजनाचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी भक्त माणकोबाची यात्रा साजरी केली जाते.

७ ) इतर कार्यक्रम :-
माणकोबावाडा येथील सिद्धनाथ मंदिरात वर्षभर वरील महत्वाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त अनेक कार्यक्रम होतात. श्रावण महिन्यात अनेक भाविक मंदिरात येऊन अन्नदानाचा कार्यक्रम करत असतात. तसेच वर्षभरात अनेकवेळा भाविक देवाला महाभिषेक घालुन देवाची दहीभाताची पुजा बांधुन अन्नदानाचा कार्यक्रम करतात. तसेच वर्षभरात भाविक येऊन देवापाशी देवाचा कुसुमा म्हणुन देवाला पुरणपोळीचा नैवैद्य करतात. असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी भाविक श्रद्धेने येऊन करत असतात. 


जागृत देवस्थान आणि श्रद्धा :

shree siddhanath jogeshwari mandir

 देव, देवस्थान, जागृत देवस्थान. हा विषय श्रद्धेवर अवलंबून आहे. माणसाने एखाद्या देवाची मनापासून भक्ती केली आणि त्याला त्याच्या मनाप्रमाणे इच्छिलेले मागणे पुर्ण झाले तर त्या माणसाची त्या देवावर श्रद्धा दृढ होत नाही. त्याचप्रमाणे माणकोबावाडा येथील सिद्धनाथ दर्शनाला येणारा माणुस आजवर अतृप्त मनाने कधी माघारी गेलेला नाही. इथे भाविक देवाला कौल लावतात आणि त्यातुन आपले प्रश्न देवाला सांगतात. आणि देवाने सांगितलेल्या कौल प्रमाणे आपले पुढील निर्णय घेतात. आजवर देवाने दिलेला निर्णय कधी चुकला नाही. त्यामुळे भाविकांची देवावरील श्रद्धा अधिक दृढ झालेली आहे.




मंदिर परिसर व जाण्याचा मार्ग :
     पुण्यापासुन ५० किलोमीटर अंतरावर दौंड तालुक्यात यवत गावाजवळ हे जागृत देवस्थान आहे. यवत मध्ये आल्यानंतर पुणे सोलापूर रोडला पुण्याकडे जात असताना यवत गावाच्या सुरुवातीला किंवा सोलापूरकडे जात असताना यवत गाव संपताना दक्षिण दिशेला रोडलगत एक भव्य कमान आपले स्वागत करते. त्या कमानीत असणारी विलोभनीय काळ्या पाषाणातील नाथ जोगेश्वरीची मुर्ती तसेच कमानीवर असणारे रंगीत नाव ''श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर प्रवेशद्वार श्री क्षेत्र माणकोबावाडा'' हि माणकोबावाडा गावाचा रस्ता असलेली ओळख करून देते त्यानंतर असणारा डांबरी रस्ता आपल्याला थेट दुसऱ्या कमानीत नेऊन सोडतो आणि त्या कमानीतून ५०० मीटर अंतरावर हे सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. या मंदिरात गेल्यानंतर आपण नाथ जोगेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतर व मंदिर परिसर व छोटी मोठी अनेक मंदिरे पाहुन मन प्रसन्न होईल.
     मंदिरापासून ३ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर डोंगर रांग आहे तसेच ७ – ८ किलोमीटर अंतरावर डोंगर रस्त्याने पायी गेले तर महाराष्ट्रातील प्राचीन प्रसिद्ध मंगलगड भुलेश्वर मंदिर आहे.
     माणकोबावाडा येथे सर्व धनगर समाज राहत असल्याने येथे मेंढपाळ व्यवसाय केला जातो. त्याचबरोबर शेती हा व्यवसाय केला जातो. येथील फुलशेती फार प्रसिद्ध आहे. दिवाळी मध्ये यात्रेच्या आनंदी वातावरणातही येथील रहिवाशी आपल्या फुलशेतीचा व्यवसाय सांभाळत श्रद्धेने देवाची यात्रा मोठ्या आनंदात साजरी करतात.

भोळ्या भक्ताचा देव तु
आहे भोळा नाथ
सोबती घेऊन जोगेश्वरी
राहतो धनगर वाड्यात
देवा तुझा महिमा भारी
गुलालाची उधळण सारी
भक्त मागता मागण
इच्छा तु पुर्ण करी
चांगभल चांगभल
नाथबाबाच चांगभल
चांगभल चांगभल
नाथबाबाच चांगभल !!!

लेखक : राहुल  दादा बिचकुले
८८८८८९७५३३


६ टिप्पण्या:

  1. निसर्गाच्या कुशीत वसलेले ठिकाण... एकदम छान माहिती

    उत्तर द्याहटवा
  2. Siddhnathachya navan chang bhal🙏🙏
    Khup chan prakare mahiti dili aahe
    Khup chan Rahul🙏

    उत्तर द्याहटवा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...