गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा...
महाराज...
ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे 
भाग्य असावे असे आमुचे
मावळे व्हावे शिवरायांचे 
पुन्हा नव्याने स्वप्न पाहावे 
हे स्वराज्य निर्माण व्हावे...
म्हणुन सदैव प्रार्थना 
त्या शिवचरणी...
महाराज आमुचें पुन्हा जन्मा यावे...

समस्त युवा वर्गाला एक सांगतो तुम्ही आम्ही महाराजांना मानतो. फक्त एकच विनंती शिवकार्य पुन्हा हातात घ्यावे. शिवविचारांचा अभ्यास करावा. वागण्या बोलण्यातून आपल्या विचारातून आणि नजरेतून शिव विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करा. फक्त आपण मावळे पुन्हा निर्माण झालो तर आपले महाराज त्याच विचारातून पुन्हा जन्माला येतील आणि हे स्वराज्य पुन्हा निर्माण होईल.

©rahulbichkule

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभच धोक्यात - दशरथ यादव

दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा 


दौंड, ता.६ : वृत्तपत्र क्षेत्रात सध्या पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही अशी अवस्था निर्माण झाली असून, ढासळणारा लोकशाहीचा चौथा आधास्तंभ सावरण्यासाठी पत्रकारांना आता संघर्ष करावा लागणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक दशरथ यादव यांनी केले. दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने भुलेश्वर मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यादव म्हणाले, ''ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून, सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहेत. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील, एवढीच आशा राहिली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आहे. आगरकर, आचार्य अत्रे यांची खरी पत्रकारिता पुन्हा जिवंत करावी लागेल, तरच पुन्हा लोकशाही उभी राहील. पत्रकारांची विश्वासार्हता कायम राहणे अत्यावश्यक आहे. पत्रकारांना सर्वत्र मान मिळतो मात्र धन मिळवण्यासाठी पत्रकारीतेच्या व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करुन उत्पन्न मिळवण्याची धडपड करायला हवी.

दरम्यान सोमवारी ता.६ रोजी सकाळी भुलेश्वर मंदिर येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुजारी राजेंद्र गाडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे व जेष्ठ साहित्यिक दशरत यादव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी संजय सोनवणे, राहुल अवचट, विठ्ठल थोरात, दीपक पवार, आनंदा बारवकर, संतोष जगताप, मिलिंद शेंडगे, अतुल बोराटे, बाळासाहेब मुळीक, शशिकांत रासकर, नेताजी खराडे, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, संदीप चव्हाण, सुशांत जगताप, विलास कांबळे, करण गायकवाड, नितीन गव्हाणे, गौरव दिवेकर,अविनाश लोंढे,विनायक यादव, धनाजी ताकवणे, संतोष शेंडे, बालाजी घोडके, सलीम मुलानी, डॉक्टर सकट, प्रकाश यादव, अरविंद जगताप, दादा गाडेकर, आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. पत्रकारासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य पवन साळवे यांचे वडील गौतम साळवे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना पत्रकार संघातर्फे आदरांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविक अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी तर आभार उपाध्यक्ष संदीप भालेराव यांनी मानले.

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

यवत मलभारे वस्ती आयोजित श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभ यासाठी भव्य तीन दिवशीय सोहळा...

यवत मलभारे वस्ती आयोजित श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभ यासाठी भव्य तीन दिवशीय सोहळा...

दौंड : हिंदू संस्कृती आणि धार्मिक वारसा जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याच श्रद्धेने दौंड तालुक्यातील यवत येथील मलभारे वस्तीतील ग्रामस्थांनी सर्व सिद्धीचा नायक असणारे गणपती बाप्पा या देवाच्या स्थापणेसाठी पुढाकार घेऊन भव्य दिव्य मंदिर साकारले आहे आणि या निमित्ताने भव्य असा तीन दिवसीय उत्सव सोहळाही आयोजित केलेला आहे.  
या कार्यक्रमाला दौंड विधानसभेचे आमदार अँड राहुल कुल व. सौ कांचन राहुल कुल. पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारतीय जनता पार्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन काल शनिवार रोजी कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी आमदार रंजनाताई कुल यांनी भेट दिली असल्याचे सांगितले 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवार दि २१ रोजी श्री गणेश मूर्तीची यवत गावातुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पिठस्थापना करण्यात आली असून सायंकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान हभप शिवलिलाताई महाराज पाटील यांचे वारकरी सांप्रदायिक किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

यवत मलभारे वस्ती आयोजित श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली होती या पुढेही सोमवार दि २३ पर्यंत धार्मिक व पारंपरिक पद्धतीने सर्व कार्यक्रम होणार असल्याने परीसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकानी केली आहे 
आज रविवार दि.२२ रोजी सकाळी ८:३० ते दु १२ वाजे पर्यंत होम हवन व मूर्तीन्यास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी ६ ते ८ या वेळात भागवताचार्य हभप. महेश महाराज शास्त्री संत तुकाराम महाराज संस्थान केंदळ. यांच्या कीर्तनाचा यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आव्हान केले असून  सोमवार दि २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० ते दु २ वाजे दरम्यान श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन श्री महंत हेमंतपुरी महाराज श्री तीर्थ क्षेत्र रामदरा शिवालय लोणी काळभोर यांच्या हस्ते महापुजा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान हभप चैतन्य महाराज वाडेकर जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र  डोंगर पुणे यांचे किर्तन होणार आहे.
कार्यक्रमाच्या तिनही दिवशी अन्नदान सोहळा आयोजित केलेला आहे.

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

डाळिंब येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन साजरा

दौंड : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने रब्बी हंगामाअंतर्गत मौजे डाळिंब येथे  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन शेतकरी प्रकाश विठ्ठल गायकवाड यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता. या ज्वारी प्रकल्पामध्ये डाळिंब गावाची निवड करून शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर व कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी कृषी सहाय्यक  विनायक जगताप यांच्या नियोजनाखाली पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी पोपट बबन म्हस्के यांनी सांगितले की कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आमचे ज्वारीचे  पीक खुप चांगले असुन नेहमीच्या पद्धतीपेक्षा आम्हाला 30 ते 40 टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला. यावेळी कृषी सहाय्यक विनायक जगताप, पंढरीनाथ कुतवळ, कृषी लोकसेवा शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा गायकवाड, पोपट म्हस्के, महादेव म्हस्के, लहूनाथ म्हस्के, दत्तात्रेय म्हस्के , गणेश गायकवाड, शंकर काळे, लक्ष्मण शितोळे, सुखदेव गायकवाड, सतीश म्हस्के, रिसोर्स फार्मर युवराज जगताप  यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाने राबवलेल्या प्रकल्पाबद्दल कृषी विभागाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

यवत व परिसरात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा

यवत मध्ये श्री दत्तजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा या सोहळ्यात, भाविक  दत्तमंदिरात दर्शनास मोठ्या संख्येने आले होते. मंदिर परिसरात या निमित्त लक्षवेधी भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध रंगीबेरंगी आकर्षक पुष्प सजावट  करण्यात आली होती. विविध फुलांची सजावट केल्यामुळे मंदिरे लक्षवेधी दिसत होते., दत्तभजन यांच्या सुमधुर आवाजाने मंदिरासह यवत व आसपास चा परिसर धार्मिक भक्तिमय वातावरणात दुमदुमला.
  हरी ओम तत्सत्, जय गुरुदत्त दत्त, ज्ञानेश्‍वरी व गुरुचरित्र चे वाचन  दिपप्रज्ज्वलन, , गुरुचरित्र आणि ग्रंथ वाचन, प्रतिमा पूजन, अभिषेक, पूजा, आरती असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम झाले.  आरती, पारायण, होमहवन, भजन सेवा,  हरिपाठ, आरती, किर्तन, अन्नदान, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. यवत,व परिसरातील  इरिकेशन कॉलनी,चोबे वस्ती, यवत,स्टेशन, व परिसरातील नागरिक, भाविकांना मोठ्या मंगलमय धार्मिक वातावरणात अन्नदान केले.
    श्री गुरुदेव दत्त  मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न.

दौंड : श्री क्षेत्र माळवाडी पडवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक १४/१२/२०२४ वार शनिवार दिवशी प.पू.सद्गुरु श्री आण्णा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
दत्तजयंतीनिमित्त श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्यात आला होता. या पारायण सोहळ्यात विविध भागातून आलेल्या भाविकांनी सहभाग घेतला होता. शनिवार सकाळी ७ वा. श्री दत्त महाराज यांची आरती करण्यात आली स.७ ते९ गुरुचरित्र पारायण समाप्ती व श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली नंतर स. ९ ते ११ दत्त जयंती निमित्त अभिषेक करण्यात आला. त्या नंतर ११ ते १ वाजेपर्यंत श्री दत्तयाग व होमहवन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत पंचक्रोशीतून आलेले भजनी मंडळी यांनी हरिभजनाचा 
कार्यक्रम साजरा केला. दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत ह.भ.प. प्रा. नवनाथ महाराज माशेरे यांचा किर्तनाचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र आणि इतर राज्यातून आलेल्या भाविकांनी  श्री दत्त महाराज व सद्गुरू श्री आण्णा महाराज यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले .श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती उत्साहात संपन्न महाराष्ट्र आणि इतर राज्यातून भाविकांची मोठी उपस्थिती होती.सर्व भाविक भक्तांनी या किर्तनाचा आनंद घेतला. सायं .६.०३ मि.श्री दत्त जन्म मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरा करण्यात आला.सायं ७.वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मानवी जीवनात गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे या कार्यक्रमात बोलताना माशेरे महाराज यांनी पटवून सांगितले.आई वडिलांची आणि गुरुंची सेवा केल्यास देव सुद्धा भक्तांच्या हाकेला धावून येतो असे यावेळी बोलताना सांगितले.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन श्री दत्त औदुंबर सेवा संस्था व श्री दत्त सेवेकरी मंडळी यांनी व्यवस्थीतरित्या पार केले. श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे विविध भागातून आलेल्या भाविकांनी श्री दत्त महाराज व सद्गुरू श्री आण्णा महाराज यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दुर्मिळ होत चाललेल्या लोकसंस्कृतीचा वारसा आजही जपला जातोय.. वासुदेव

 उत्पन्नाचे साधन म्हणुन नाही तर आमची परंपरा म्हणुन आम्ही या कलेकडे पाहतोय. : संतोष रायभान कोंडे ( वासुदेव )

 थंडीचे दिवस आहे सकाळची साखरझोप यामध्येच कानावर टाळ चिपळीचा सुंदर आवाज आणि वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पहारी हरीनाम बोला. हे सुंदर गीत ऐकू आले आणि दाराबाहेर सुंदर विविध रंगी पोशाखात डोक्यावर मोरपिसाची टोपी गळ्यामध्ये वेगवेगळ्या माळा घातलेली वासुदेवाची स्वारी नाचत नाचत चाललेली पाहायला मिळाली.
      पण आता हि लोककला लोप पावत चाललेली आहे. आणि लोककलावंत दुर्मिळ होत आहे. आजपर्यंत वारसा आणि संस्कृती म्हणुन आपण याकडे पाहत आलो आहे. परंतु आता या लोककलेच्या माध्यमातून पोट भरणं अवघड आहे त्यामुळे यामध्ये असणारा वासुदेव समाज नोकरी व्यवसाय करू लागला आणि या लोक कलेपासून अलिप्त होऊ लागला आहे. पूर्वी आपण पाहत असलेले पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, हेळवी, साधु संतांच्या पोलिसाच्या वेशातील बहुरूपी, नंदीबैल, कडक लक्ष्मी असे अनेक लोककलावंत आता दुर्मिळ होत चाललेले आहे. कारण या कलेच्या माध्यमातुन आता पोट भरणे अवघड होत चालले आहे.



      वासुदेव हि लोकसंस्कृती जपणारे संतोष कोंडे हे आजही आपली हि लोककला जपत आहे. ते म्हणतात उत्पन्नाचे साधन म्हणुन नाही तर आमची परंपरा म्हणुन आम्ही या कलेकडे पाहतोय. कारण आता नाही जपली तर पुढे हा वारसा संपुष्टात येईल. पूर्वी लोकं धार्मिक वृत्तीने आमच्याकडे पाहून दानधर्म करत होते परंतु आता आम्ही दिसताच काही आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी आम्ही येताच सर्व समाज अवतीभवती गोळा व्हायचा. आता आम्ही आमचा वारसा म्हणुन गावोगावी फिरत असतो रस्त्याने जात असताना कोणी दानधर्म केला तर घेतो नाहीतर आपली संस्कृती परंपरा जपत पुढे जातो. आज आमचे अनेकजण आपला नोकरी व्यवसाय सांभाळत आपला हा वारसा जपत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली हि लोककला आजही आम्ही अभिमानाने एक वारसा म्हणुन जपत आहे.

      आपल्या संस्कृतीची शोभा असणाऱ्या अनेक लोककला या जपल्या गेल्या पाहिजेत आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या लोककला आपण कित्येक पहिल्यात आणि आपण पाहिलेल्या लोककला आपली पुढची पिढी किती पाहिल हे आता सांगता येणार नाही. कारण या लोककलेला लोकाश्रय नाही मिळाला तर त्या संपुष्टात येईल आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील असणारी दानधर्माची परंपराही हि इथेच लोप पावेल. पुढच्या पिढीकडे जाणारी हि धार्मिक परंपरा कमी कमी होत जाईल.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

शून्य होतो मी

शून्य होतो मी 
आज शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न पाहतोय.
आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतोय.
आज मला शून्याची भीती वाटत नाही.
कारण परिस्थिती कितीही बदलूदे 
पुन्हा शून्याच्या खाली जाऊ देणार नाही.
हे मात्र पक्क मनाशी ठरवलंय...

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

गुंतवणूक हा प्रगतीचा राजमार्ग आहे.

 गुंतवणूक हा प्रगतीचा राजमार्ग आहे आणि बचत हा गुंतवणूकीचा आधार आहे : राहुल बिचकुले 



    माणसाने प्रगतीची स्वप्ने पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. कारण आपण करत असलेली छोटी मोठी गुंतवणूक हि आपल्याला आपल्या उज्वल भविष्याकडे घेऊन जात असते यामुळे भविष्यात अनेक अडचणीवर आपल्याला मात करून योग्य ती प्रगती साधता येते. 
    आज गुंतवणूकीचे अनेक पर्याय आपल्या समोर आहेत. जसे कि सोने खरेदी, व्यावसायिक गुंतवणूक, जमीन खरेदी, फ्लॅट, वाहन खरेदी, शेतीमध्ये पर्यायी उद्योग, शेअर मार्केट, विमा क्षेत्रातील गुंतवणूक असे एक ना अनेक गुंतवणूकीचे मार्ग उपलब्ध आहेत. यामध्ये आपण गुंतवणूक करून भविष्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
    स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूक करणे हि प्रत्येकाची गरज आहे. आणि गुंतवणूक करण्याचं व्यसन प्रत्येकाला असलं पाहिजे. आपली छोटी मोठी गुंतवणूक हि आपल्या कुटुंबाचा आधार असली पाहिजे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहात ती गुंतवणूक आपल्याला भविष्यात वाढत्या मुल्याने आधार देणारी असली पाहिजे.  नाहीतर आपण करत असलेली गुंतवणूक तिचे भविष्यात कमी होत जाणारे मूल्य हे आपल्याला अडचणीत आणू शकते. म्हणुन प्रत्येकाने गुंतवणूक करत असताना फायदा हि गोष्ट डोक्यात ठेऊन गुंतवणूक केली पाहिजे. 
आर्थिक नियोजन हे शिक्षण घेऊन समजते असे नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण आर्थिक नियोजन कसे करावे हे समजुन सांगु शकतो. उदा. एखादी गृहिणी आपले घर चालवत असताना ती छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तडजोड करून कुटुंबासाठी लागणारे साहित्य यामध्ये ती गुंतवणूक करत आलेली आहेच आणि त्याबरोबरच या गुंतवणुकीचा आधार असणारी बचत कशी करावी हे तिला चांगले समजते. 
    मोठे मोठे गुंतवणूकदार यांना गुंतवणूक कशी करावी हे सांगावे लागत नाही. ते त्यांचे आलेले भांडवल आपल्या फायद्याच्या गोष्टीमध्ये गुंतवत असतात त्यामुळे त्यांची गुंतवणूक मोठी आणि होणारा फायदा ही मोठा असतो. परंतु सर्वसामान्य माणुस विचार करतो कि पैसा हा पैश्याकडेच जातो. असे नसते त्यांनी त्या पटीत गुंतवणूक केली त्या पटीत त्यांना आर्थिक फायदा होणार आपण गुंतवणुकीला ज्या प्रमाणे सुरुवात करू त्या प्रमाणे आपल्यालाही फायदा होणार आहे. म्हणुन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 


    बचत हा गुंतवणुकीचा आधार आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात त्याने बचतीला महत्व दिले पाहिजे कारण त्याचे उत्पन्न एकठोक पद्धतीचे नसते थोडे थोडे येणारे पैसे हे त्याने बचत केले पाहिजे व त्याला योग्य ठिकाणी आर्थिक नियोजन करून गुंतविले पाहिजे जेणेकरून त्यामध्ये वाढ होत जाईल व आपली आर्थिक प्रगती साधता येईल.

आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला बचतीची छोटीसी सवय लावा अगदी लहान मुलांनाही बचतीची सवय लावा आणि त्यामधून ज्याच्यात्याच्या बचती प्रमाणे गुंतवणूक करा. यामुळे प्रत्येकाला आपोआप आर्थिक नियोजन कसे करावे हे समजेल जेणेकरून त्याच्या आयुष्यात त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. व एका उज्वल भविष्याच्या दिशेने प्रत्येकाची वाटचाल होईल.

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर संपन्न

पत्रकारांनी धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी व्यक्त केले.



यवत- दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ रोजी  पत्रकारांचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते, यामध्ये तालुक्यातील बहुसंख्य पत्रकारानी सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली. 
पत्रकारांनी धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप  यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की पत्रकार हे  नेहमी अन्यायाच्या विरोधात लढत समाजाला न्याय व दिशा देत असतात पत्रकारांच्या हितासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ किशोर पत्की म्हणाले यवत रुग्णालयात मोफत डायलिसिस केंद्र लवकरच सुरू होणार असून त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.  पुणे जिल्ह्यामध्ये महिलांच्या सामान्य  व सिझेर प्रसूती मध्ये जिल्ह्यामध्ये क्रमांक दोन रुग्णालय आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी म्हणुन रोज नियमित चालणे व इतर शारीरिक व्यायाम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 


 दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने डॉ. किशोर पत्की यांचा पंढरीचा पांडुरंग हि प्रतीमा देऊन सन्मान करण्यात आला व उपस्थित सर्व स्टाफ यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे दौंड चे अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले की,दौंड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य करत असल्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, जिल्हा सचिव संदीप बोडखे,विजय काळभोर,  जनार्दन दांडगे कार्याध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, संदीप नवले , दौंड तालुका उपाध्यक्ष संदीप भालेराव,राहुल अवचट यांच्या सह दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

जंगली श्वापदे मानववस्तीत हि तर धोक्याची घंटा !


आजची बातमी वाचली आणि विचार करण्याची क्षमता सुन्न झाली. बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू हि आपल्या जवळची बातमी वाचताच अंगावर शहारा आला परंतु आपल्या आसपास हि अशा अनेक घटना रोज घडत चालल्या आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या सभोवताली रानगव्याचा मानववस्तीत शिरकाव, बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी पशुधनाचे नुकसान, रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, तरसाच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू, रस्त्यावर रात्री वाघ दिसला. अशा अनेक बातम्या आपण वाचत आहे. जेथे घटना घडत आहे. तेथे थोडीफार जागरूकता आणि भीती निर्माण होत आहे. परंतु वेळ निघुन गेल्यावर पुन्हा पहिलेच दिवस. 
खरतर जंगली प्राणी मानववस्तीत आले याचे कारण शोधणे गरजेचे आहे आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारी स्तरावर विशेष अंमलबजावणी करून वनविभागाकडे विशेष जबाबदारी सोपवून सामान्य नागरिकांना या विषयावर जन जागृती करून काहीतरी करणे आवश्यक आहे. यामध्ये असणारे तज्ञ अभ्यासक यांचे या ठिकाणी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. वनविभागातील अनुभवी कर्मचारी यांचीही यामध्ये मदत घेऊन यावर काय करता येईल याचा विचार करून काहीतरी करायला पाहिजे नाहीतर हि जंगली श्वापदे जंगल राहिले नसल्यामुळे मानववस्तीत येणार शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान करणार, नाही काही मिळाल्यास किंवा त्यांच्या नजरेच्या अंदाजामध्ये मानवी सावज आल्यास ते माणसावरही भीती पोटी किंवा भुकेपोटी हल्ला करणार हे होणारच आहे. म्हणुन सावध व्हायला हवे कारण हि तर धोक्याची घंटा आहे.

जंगल संपलं ते राहिलं फक्त चित्रात आणि प्राणीही दुर्मिळ झाले परंतु ज्या प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतीचा आणि ओढ्या नाल्याचा, गायरानांचा आधार घेतला ते प्राणी आज मानववस्तीत आपल्या भुकेची गरज भागवण्यासाठी येऊ लागले आहेत. याला कारणही माणुस आहे. आपले एखाद्याने घर उध्वस्त केल्यास आपण सुडापोटी दुसऱ्याचे घर उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करतो परंतु प्राणी त्यांचे आपण संपवलेले जंगल (घर) आणि त्यामुळे त्यांची होत असलेली उपासमार म्हणजे तो फक्त आणि फक्त पोटाची भुक भागवण्यासाठी माणसाच्या वस्तीत येत आहे येथे त्याची भुक कारण आहे. माणसासी कुठलं वैर नाही. जंगल गेलं छोटे मोठे जंगली प्राणी यांची संख्याही कमी झाली. त्यामुळे या मांसाहारी जंगली प्राण्यांचे मुख्य अन्न संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचा भूकेपोटी मानवी वस्तीत शिरकाव सुरु झाला आणि तो सातत्याने वाढत चालला आहे. त्यामुळे यावर विचार व्हायला हवे प्रत्येकाने प्रयत्न करून छोटी मोठी जंगले निर्माण केली पाहिजे नाहीतर उद्याचा काळ आणि वेळ यामध्ये माणुस सुरक्षित असेल असे वाटत नाही. 
सरकारने यावर विशेष मोहीम राबवावी अनुभवी वनविभाग कर्मचारी यांची मदत घ्यावी. सामाजिक संस्था यांनाही याच्या जोडीला घेऊन यावर उपाययोजना करण्याची तयारी करावी. यामध्ये जनतेने या कार्याला सहकार्य करावे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा हिरावून घेतलेला आदीवास पुन्हा निर्माण व्हायला हवा. तेव्हाच हा जंगली प्राण्यांचा वाढत चाललेला शिरकाव आटोक्यात येऊ शकतो असे मला वाटते परंतु यावर या क्षेत्रातील तज्ञ अभ्यासकांनी व्यक्त व्हायला हवे आणि त्याचे सार्वत्रिक प्रसारण प्रसार माध्यमांच्या सहाय्याने करायला हवे. यामध्ये जंगली प्राणी मानव वस्तीत आल्यास घ्यावयाची काळजी तसेच त्याला मानव वस्तीतून दूर पाठवण्यासाठी काही उपाययोजना याचीही जनजागृती व्हायला हवी नाहीतर विनाकारण गरीब शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या कुटुंबाची वाताहत निर्माण होईल कारण हि तर धोक्याची घंटा आहे म्हणुन सावध व्हायला हवे.

माणसानं जंगल उध्वस्त केलं म्हणुन माणसाशी वैर नसुन जंगली प्राणी आपल्या पोटाची भुक भगवण्यासाठी मानववस्तीमध्ये येतात. यावर काहीतरी उपाययोजना व्हायला हव्यात नाहीतर गरीब शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची वाताहत होईल. 
राहुल बिचकुले - पत्रकार

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...