भयानक....!
भीतीदायक....!भय.....!
भुत...!
हडळ....!
यासारखे शब्द सहज ऐकायला मिळाले तर काही वाटत नाही परंतु या शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष अनुभव आल्यावर समजतो....
मी रोज टेरेसवर झोपतो त्याचप्रमाणे त्या दिवशी ही झोपलो होतो.... खरंतर झोप येत नव्हती त्यामुळे मोबाईल हातात घेऊन मोबाईल मध्ये फोटो, व्हिडीओ, स्टेटस पाहत येरझऱ्या मारत होतो.... रात्र वाढत चालली होती.... पौर्णिमेचा चंद्र स्पष्ट दिसत होता.... आजूबाजूला कुत्र्यांच्या भूकण्याचा आवाज येत होता. मध्येच कुठलातरी पक्षी त्या आवाजाला साद देत लक्ष वेधुन घेत होता....
मी मात्र भय, भीती, भयानक आणि भुत, हडळ यांना न मानणारा त्या आवाजामुळे मनातुन थोडा चलबिचल होऊ लागलो.... चंद्र थोडा थोडा पुढे सरकत होता... तसा मीही मनातुन घाबरुन जात होतो..... इतक्यात त्या आवाजाला नवीन साथ मिळाली .... जिन्यावरून मस्त पैंजनाचा आवाज येऊ लागला.... मी जिन्याकडे जाऊ लागलो.... तसा तो आवाज हळुहळु मंद झाला..... मी कोण आहे ? विचारताच तो पैंजनाचा छ्म छ्म आवाज थोडंस अंतर धावुन बंद झाला.... मी मात्र घाबरलो.... पुन्हा टेरेसवर जाऊन इकडे तिकडे पाहु लागलो... तर घराशेजारील रानात एक स्त्री आकृती दोन हात सरळ करून नृत्य करत असावी... तिचा एक पदर हवेत तरंगत होता.... आणि माझ्या मनात भीतीने कोलाहल माजवला होता..... कुत्र्यांच्या भुकण्याचा विव्हळण्याचा आवाज चालुच होता.. जिन्याखाली कोणीतरी नृत्य करत असावं तो पैंजनाचा आवाज येतच होता. टेरेसवरून रानात पाहता त्या स्त्रीच नृत्य चालुच होत... आणि काळोख्या राती चंद्र ढगांबरोबर लपंडाव खेळत होता. कधी मंद प्रकाश तर कधी पूर्ण अंधार... आणि माझ्या मनात भुत, भूतणी, हडळ, खविस यांचा विचार येऊन सगळेजण डोळ्यासमोर येत होते... या भीतीने घाबरून मी पटकन जाऊन अंथरुणात अंगावर घेऊन झोपलो. तरीसुद्धा ते पैंजण वाजतच होते. अंगाचा थरकाप उडाला. पूर्ण शरीर घामाने भिजुन गेले आणि मला या भीतीत कधी झोप लागली कळलच नाही...
आता झाली खरी कहाणी सुरू..
सुंदर रमणीय रात्र त्या रात्रीत मी गार्डन मध्ये बसलेलो मस्त वाऱ्याची गार झुळुक शरीराला स्पर्श करून जात होती. मी मात्र त्याचा आनंद घेत काहीतरी गुणगुणत बाकावर रेलुन बसलेलो. थोडंस इकडं तिकडं पाहता समोरच्या उंच झाडाकडे लक्ष गेलं तो महाकाय वृक्ष उंचच उंच आणि रुंदही त्याच्या बाजुने मंद असे धुके हवेत पसरत होते त्या धुक्याचे ढग बनुन हवेत मस्त विहार करीत होते. अचानक त्या धुक्यातुन पांढरीशुभ्र अप्सरा पंख असते तर परी म्हणावी लागली असती. हळुहळु पुढे येत होती पायी पैंजण छ्म छ्म आवाज करत होते. खरच ते रूप पाहुन भले भले मोहित होतील त्यात मी मोहित झालो हे कोणतं अजब. मी तिच्याकडे पाहत होतो ती पुढेपुढे येत होती. तीच सुंदर रूप मी न्याहाळत होतो.. सुंदर कमनीय बांधा... व्वा! व्वा! तेजोमय कांती... लाजवाब! गुलाबी ओठ... अप्रतिम! पैंजणाची छ्म छ्म... मधुर! ती जवळ येत होती आणि मी तिच्याकडे पाहतच होतो. डोळे जणु मीनाक्षी.. सौंदर्य रंभा मेनका जणु उर्वशी... ती जवळ आली शेजारी बसली तशी चांदण्यांची चमचम चालु झाली... त्यामध्ये ती आणखीच सुंदर दिसु लागली... तिचा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवु लागली जणु मोरपंख फिरतोय असा भास होऊ लागला.. मी रोमांचित होऊन डोळे झाकले तसा तिने माझा गळा पकडला. तिचा कर्णकर्कश आवाज खडबडीत हात आणि रक्ताळलेला चेहरा आणि हवेत उडत असलेली तिची पांढरी शुभ्र कपडे... यांनी मला राम राम राम राम म्हणण्यास भाग पाडले.. आणि मी जागा झालो...
पुर्ण शरीर घामाने ओले झालेले तोंडातून आवाज निघेना अशी माझी अवस्था झाली होती आणि भय आणि भयानक, भुत आणि हडळ यांनी मला त्यांचं रूप दाखवलं... तसाच उठुन जिना उतरू लागलो सहज रानात पाहिलं तर एक बुजगावणं आणि त्यावर एक कापड फडफडत होतं. जरा मनात धीर आला आणि जिना उतरून खाली आलो तर घरात पुन्हा रात्रीच्या पैंजनांचा आवाज आला म्हणुन घरात गेलो तर मांजराच्या गळ्यात ताईने बांधलेले पैंजण होते. मी मात्र पाहत राहिलो. आणि भय, भयानक, भुत आणि हडळ या शब्दांचा अनुभव काय असतो याचा विचार करू लागलो..
भुत हडळ आणि खविस
यावर जरी नसला विश्वास
जो होतो मनाला भास
तेच कारण भयास..
© लेखक राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी