बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

माझे आदर्श


लक्ष्य असे असावे मोठे
इतरांना ही हेवा वाटे
जरी असतील वाटेवर काटे
पुढे चालतच रहावे

अनेक भेटतील या वाटेवर
कुणी अडथळा बनेल
कुणी साथ निभावेल
विचार याचा ही करावा
पण मार्ग आपला ना सोडावा

जिवनाची वाटच खडतर
कुठे नसे आधार कुठे असे आधार
आपणच निर्माण करावा आधार
करावा नवा मार्ग साकार
पुन्हा येतील अनेक आपल्याच मार्गावर
पोहचतील तेही यशाच्या शिखरावर

तेव्हा आठवेल त्यांना 
कोण पुढे हा गेला 
ज्याने मार्ग दखविला
असा आहे तो थोर
आदर्श माझ्या समोर

फोटो स्त्रोत - इंटरनेट 

                                                  कवी : राहुल बिचकुले 


गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

प्रेमांकुर २

अपर्णा बोलू लागली - आज मी या निकालात दुसरी आले. परंतु एवढा आनंद झाला आहे की, जो पहिले आले असते तरी झाला नसता ! कारण तुझ्यासारखा स्पर्धक मला मिळाला आणि त्यामुळे मी एवढ्या मार्कने दुसरी आले. मी पहिली आले तेव्हा तू माझा सन्मान केला. आज तू पहिला आला आहेस आज मी तुझा सन्मान केला.  मला अभिमान वाटतो कि तुझ्यासारखा मित्र आयुष्यात प्रत्येक वाटेवर मिळाला पाहिजे.
ती माझ्या डोळ्यात पाहून एकदा गोड हसली आणि स्टेजवरून खाली निघून गेली. मी ही सर्वांचे आभार मानुन स्टेजवरून उतरून खाली आलो.
कार्यक्रम संपला...
सर्वजण घरी निघाले...
मीही निघालो....
तोच अपर्णाने आवाज दिला. रघु !
मी थांबलो. ती जवळ आली आणि बोलु लागली...
रघु सॉरी! वर्षभर मी खुप त्रास दिला तुला... पण तू मात्र माझ्या मनात घर केलंस. एक प्रेमाचा नवा अंकुर निर्माण केलास.
पण ?
पण काय !
मी आता आमच्या गावी पुढे शिकण्यास जात आहे. तुझ्यासारख्या मित्रमैत्रिणींना सोडून जाणं खरंतर जीवावर आलंय पण जावं लागेल. मी नाही विसरणार तुला या शाळेला. प्रत्येक वर्षी आपण एक दिवस नक्की भेटत जाऊ या शाळेत....
मीही मान डोलावून प्रतिउत्तर दिले.
शेवटी ती एवढंच बोलली....
तुझ्याबद्दल खुप आदर वाटतो...
मनात एक प्रेमाअंकुर रुजतो आहे. त्याला जपण्याचा प्रयत्न करीन. नशीब असेल तर भविष्यात पालवी फुटेल...
विसरु नकोस.. !
उज्वल भवितव्यासाठी खुप खुप शुभेच्छा..!!
नाही विसरणार म्हणत तिला शुभेच्छा देऊन मी आणि ती दुःखी मनाने आपापल्या रस्त्याने चालु लागलो....

आज आता वर्ष होत आलं आहे मी माझे ध्येय ठरवून वाटचाल करीत आहे. तिने दिलेला पेन आजही खिशाला दिमाखात लावुन 
 प्रेमाअंकुर जपण्याचा प्रयत्न करीत आहे.

ती सध्या काय करीत आहे ?



लेखक : राहुल दादा बिचकुले 


फोटो स्त्रोत - इंटरनेट 



प्रेमांकुर १

      आयुष्याच्या कॅलेंडर मध्ये रोजच्या जगण्याच्या तारखा पुढे सरकत होत्या त्याबरोबर माझे प्राथमिक - माध्यमिक शिक्षण ही सरून गेलं आणि जिवनात एकटं पडल्यासारखे वाटु लागले. जिंदगी बोअर वाटु लागली. ना मित्र ना मैत्रिणी कुठं जायचं कुठं यायचं मैदानी फिरायचं तेबी एकट्यानं....
दहावी सरून गेली होती आणि निकाल बी लागला होता. नाही म्हटलं तरी ६५℅ मार्क मिळाल्यामुळे घरचेबी खुश होते... माझ्या परस्पर त्यांनी पोरगं हुशार आहे म्हणत हॉस्टेलला ठेऊन मला शिकवायचं ठरवलं..
       होस्टेल म्हणताच मनात धस्स झालं कारण माझं आणि मित्राचं विचार कधीच जुळत नव्हते. मग आता जुळेल ते कशावरून म्हणून मी होस्टेलवर राहण्यास नकार दिला. आणि जवळच तालुक्याच्या मध्यवर्ती गावात घरापासून १०-१५ किलोमीटर अंतरावर अकरावीला ऍडमिशन घेतलं आणि रोज जाऊ लागलो . कॉलेजमध्ये गेलो पण या गावठी पोराबरोबर मैत्री कोणी करिना असे करत सहा महिने गेले. मीही दिवसेंदिवस खचतच चाललो होतो. सहामाही परीक्षा झाली निकाल लागला. कॉलेजमध्ये वर्गात अर्पणा नावाची मुलगी पहिली आली दुसरीही मुलगीच आली आणि तिसरा मुलगा आला. माझा निकाल मी पाहिला तर दोन विषयात अक्षरशः नापास झालो होतो. म्हणजे परिस्थिती आणखीच बदलली होती. दहावीचा निकाल पाहुन मिळालेले दोस्तही दूर झाले व थोडेफार उनाडक्या करणारे दोस्तही जवळ घेत नव्हते कारण मला उनाडक्या जमत नव्हत्या....
         शेवटी या खंगलेल्या मनानी एक निश्चय केला काही झालं तरी वर्षाच्या शेवटी आपण पहिलं यायचं आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं की, " हम भी किसींसे कम नही." आणि सुरुवात केली त्यापद्धतीने अभ्यास नियोजन करून मी वर्षाच्या शेवटी पहिला आलो...
    आणि बऱ्याच जणांचा मित्र झालो पण अपर्णाचा स्पर्धक झालो कारण तिला माझ्यामुळे दुसरं यावं लागलं.
     सुट्टी सरून गेली आणि बारावीचं वर्ष उजाडलं....

    आता जिंदगीत कुठेतरी इंटरेस्ट यायला सुरुवात झाली होती. सगळ्यांचा रघुनाथ आता रघु झाला होता. मित्र मला आताही मिळाले नसते पण आता मैत्रिणी माझ्याबरोबर बऱ्याच होत्या. सुकन्या आणि गीता या उनाड मुली अभ्यासाचा पुजारी मानायला लागल्या होत्या. दिसायलाही त्या टॉप होत्या आणि डॅशिंग ही होत्या. पण मन तर अपर्णावर भाळलं होतं दिसायला साधी सोजवळ, थोडीसी हट्टी आणि गोरीगोमटी त्यातच आपण आता तिचा विरोधक होतो.  पण मनात कुठेतरी वाटत होतं की, आजवर आपण खुप एकाकी जीवन जगत आलो पण आता आपण आपलं ध्येय ठेऊन जगायचं. आणि याही वर्षी पहिलं यायचं !
   सुरुवात तर जोरदार केली. एका वर्गात दोन गट झाले एक माझा तर एक अपर्णाचा तिच्या बाजुने मुलांची संख्या जास्त तर माझ्या बाजुने मुलींची संख्या जास्त होती ते प्लॅन करून एकत्रितपणे अभ्यास करू लागले आणि आम्ही एकत्रितपणे अभ्यास करण्याचा प्लॅन केला. यामध्ये अभ्यासही जोरदार पद्धतीने होऊ लागला पण या स्पर्धेत माझी आणि अपर्णाची एक खुन्नस निर्माण झाली ती वर्गात आल्यावर माझ्याकडे किंवा मी वर्गात आल्यावर तिच्याकडे न पाहिलेला एकही दिवस उजडेनासा झाला. त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांविरोधात खुन्नस निर्माण झाली पण माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम भावना जागी होत असे पण ध्येय होते पुढे जायचं त्यामुळे प्रेमाला ताडून पुढे जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो. असे करीत सहामाही संपून सहामाहीचा निकाल १००℅  लागला दोन्ही गट पास झाले आणि अपर्णा माझ्यापुढे ५% ने गेली. त्यामुळे चेहऱ्यावर तिच्या हसु आलं. मला अभिमान वाटला कारण तिच्यामुळे आज मला एक स्पर्धक मिळाला होता आणि त्यामुळेच मला मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या.
     निकाल जाहीर झाल्यानंतर मी अपर्णाच अभिनंदन करायचं ठरवलं  म्हणुन मस्त डायमंड चे खडे असलेला पेन गिफ्ट म्हणुन घेतला व दुसऱ्या दिवशी आमच्या गटाच्या वतीने म्हणुन मी तिला हे गिफ्ट वर्गात सर्वांसमोर दिले व तिचे अभिनंदन केले. तेव्हा तिच्या डोळ्यातील चमक मला आणखीच भुलवून गेली आणि मनात प्रेमाचा नवा अंकुर उगवु लागला.
तिच्याही मनात माझ्याविषयी प्रेमभावना असतील असं मन मला सतत सांगत होते.
तिच्यावरील प्रेमभावना कोमेजून न देता मी अभ्यासाची तयारी भरपूर केली आणि वर्षाशेवटी बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलो. आणि अपर्णा दुसरी आली. मन खुप आनंदुन गेलं. पण मनात एक सल निर्माण झाली. अपर्णा दुसरी आली म्हणून नाराज झाली असेल.
     कॉलेजमध्ये निकाल वाटपाचा दिवस उजाडला सर्वजण आनंदात उपस्थित होते. पण मी पहिला येऊनही आज नाराज होतो आणि सर्वांमध्ये फक्त एकच चेहरा शोधत होतो. अपर्णा कुठे दिसतेय. पण अपर्णा कुठेच दिसत नव्हती. सन्मानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि मला स्टेजवर बोलावले गेले. मीही इकडे तिकडे पाहत स्टेजकडे जाऊ लागलो. तोच दुसऱ्या बाजुने अपर्णा एक पुष्पगुच्छ घेऊन स्टेजकडे येत होती. चेहऱ्यावर खुप आनंदही दिसत होता. दोघेही स्टेजवर आलो. शिक्षकांनी दोघांचेही अभिनंदन केले. आणि अपर्णाने पुष्पगुच्छ व सोबत एक सुंदर सजावट असलेला पेन मला गिफ्ट दिला.



फोटो स्त्रोत - इंटरनेट 


पुढील भाग प्रेमांकुर २ ....

रविवार, १ डिसेंबर, २०१९

नजरा दुषित व्हायला लागल्यात वासनेच्या डोहात बुडायला लागल्यात

नजरा

नजरा दुषित व्हायला लागल्यात
वासनेच्या डोहात बुडायला लागल्यात
तरुण आणि म्हातारा
काय पाहतो पाहणारा
विचित्र सारेच वागायला लागलेत

कधी होते छेडाछेड
कधी होतो बलात्कार
ज्याचं जळतं तेच पळतं
आज सारे मावळे हरवलेत
बाकी सारे फक्त पाहायला लागलेत

चार दिवस सारेच शोक करतात
ज्याला दुःख त्याला जवळ धरतात
शिक्षा होती का नराधमांना
शिक्षेचे प्रश्न प्रश्नच राहिलेत
उलट सरकार त्यांना पोसु लागलेत

कुठं गेली आपली संस्कृती
स्त्री म्हणजे आदिमाया पार्वती
जमाना बदलला पार बदलला
संस्कृती सारे विसरू लागलेत
स्त्रीला मादी म्हणुन पाहु लागलेत

आता डोळ्यांना दिसत नाही
लहान बालिका आणि वयोवृद्ध आजी
या वासनांध नजरेला दिसते फक्त मादी
हि वासनांध जनावरं मोकाट फिरू लागलेत
छेडछाड, बलात्कार आणि अत्याचार करू लागलेत

शिवकाळ आठवा
आठवेल तेव्हाचा न्याय आणि शिक्षा
कसा होता राजांचा मावळा
कशी करीत होता माता भगिनींची सुरक्षा
आता राजांचे विचार विरु लागलेत
आणि मावळे फक्त नावालाच राहिलेत

जेव्हा घडेल असा गुन्हा
भरचौकात ठेचा त्या नराधमांना
सारेजण एक व्हा आणि अशी शिक्षा द्या
करा भरचौकात चौरंग, किंवा फाशीला लटकुया
साऱ्या जगाला कळुदया
पुन्हा आपण सारे शिवकाळ निर्माण करूया

काय घडतंय काय बिघडतय
हे तर समजेना झालंय
घडतात गुन्हे राजरोसपणे
निर्भया, कोपर्डी, हैद्राबाद
कोडीत, दिल्ली आणि गावागावात
घडतात अशी प्रकरणे
एक्कावन्न टक्के दिली आरक्षणे
पण जगात फिरू शकते का महिला सुरक्षित पणे

रोजच्या वर्तमानपत्रात
दरदिवशी बातमीपत्रात
घडतात गुन्हे लाजिरवाणे
विनयभंग, बलात्कार, खून आणि जाळणे
कधी घडतात बाप, भावाचे कृत्य किळसवाणे
आपण मावळे स्वराज्याचे
होऊन एक रोखु अशी प्रकरणे
पुन्हा फिरू शकेल परस्त्री माता बहीण
आपल्या स्वराज्यात सुरक्षितपणे

आठवु छत्रपती शिवरायांचा काळ
एक व्हा मावळयांनो हि तर धोक्याची वेळ
आपल्या विचारातील शत्रुला प्रथम दुर धाडा
वाईट विचारांची प्रवृत्ती दृष्टीस पडता हाणून पाडा
नारीस देऊन सन्मान, बसवा स्त्री संरक्षणाचा मेळ
चला पुन्हा आणूया स्वराज्याची सुंदर नवी सकाळ







फोटो स्त्रोत - इंटरनेट
© राहुल.

      काय घडतय महाराष्ट्रात महाराष्ट्राबरोबरच देशात. रोज एकतरी बातमी बलात्कार, विनयभंग, छेडछाड, आणि मनात वाटत. काय हि वेळ आली आहे. घरी आणि घराच्या बाहेरही स्त्री सुरक्षित नाही. याला कारणीभूत काय? महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार आहेत. मग अशा घटना का घडाव्यात. तर याला कारणीभूत वाटते ती या घडणाऱ्या गुन्ह्यांना मिळणारी शिक्षा. घटना घडते तिचा पंचनामा होतो आरोपीची शोधाशोध आणि शेवटी सिद्धता. हि झाली प्रक्रिया पुढे काय ? ठराविक कालावधीची शिक्षा कारण आपला असा समज आहे कि एकदा शिक्षा मिळाल्यावर तो आरोपी सुधारेल. ज्याला शिक्षा मिळाली तो सुधारेल हो, पण या शिक्षेचे स्वरूप पाहता नवीन निर्माण होतोय त्याचं काय? यासाठी शिक्षेचे स्वरूप गंभीर असावे.
शिवकालीन चौरंग शिक्षा -फोटो स्त्रोत - इंटरनेट 

      जरा आठवा शिवकाळ आणि स्वराज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात गुन्हा घडला कि तत्पर आणि कठोर शिक्षा होती. त्यातीलच एक प्रकार चौरंग. हात पाय कलम करून भर चौकात सोडुन देणे जेणे करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला समजलं पाहिजे याचा गुन्हा काय आणि त्या गुन्ह्यावर शिक्षा काय. म्हणतात ना शिक्षेपुढे भूतही भिते पण त्या शिक्षेचे स्वरूप तसे असले पाहिजे. 
      म्हणुन म्हणतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळ्यांनो आता तरी सावध व्हा. आपण सारे एक व्हा. मनात शिवविचारांची ज्योत रोज तेवत ठेवा. आणि एक प्रतिज्ञा करा. 
स्वराज्याची प्रतिज्ञा - फोटो स्त्रोत - इंटरनेट 

मी छत्रपती शिवरायांचा मावळा. हे स्वराज्य माझे आहे. या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री मला माते भगिनीसमान आहे. माझ्या स्वराज्यातील आठरापगड जाती धर्मातील बांधव म्हणजे शिवमावळे मला बंधूसमान आहे. त्या सर्वांना एकत्र करून मी पुन्हा शिवविचार जागृत करून या स्वराज्यात घडणारे गुन्हे यावर शिवविचार अस्त्राचा प्रहार करून स्वराज्याचे रक्षण करीन. परस्त्री मातेबहिणी समान हि महाराजांची शिकवण सदैव अंगीकारून महाराजाच्या विचारांशी प्रामाणिकपणे लीन राहील. आणि या स्वराज्याचे रक्षण हेच माझे आद्य कर्तव्य राहील..

महाराज आज स्वराज्य धोक्यात आहे असे वाटते ! मावळ्यांना जागे केले पाहिजे !!


 जय भवानी  जय शिवराय !!!   

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...