मंगळवार, २६ मार्च, २०१९

माझा प्रपंच


माझा प्रपंच

झाली सांजवेळ
या सांजवेळी
सूर्यदेव दुर गेला
बुडाला डोंगरापार
झाकाळली धरती
पसरली सावली
झाला अंधार
झाला अंधार
मला देवाजीचा आधार
एकच मागण माझ
होऊदे सुखाचा संसार
होऊदे सुखाचा संसार

    
सायंकाळची वेळ अंगणात हातात झाडू घेऊन म्हातारी आजी अंगण झाडत झाडत मनाशीच पुटपुटत असते. सूर्य पार डोंगराच्या पल्याड बुडाला.... सांजची वेळ झाली थोड्याच येळात काळोख पसरल.... माझा किसना आजुन कसा बर आला नाय. हि शेवंती कधी येऊन उरकायची सगळी काम ह्या काळजीत म्हातारी इकड काम उरकीत असती.....
तिकड किसना आणि त्याची बायको शेवंता रानातल आवरून थोडसं सरपण आवळून घेत असत्यात
ये शेवंते आग उरीक जायला उशीर होईल तीन चार मैलाच आंतर तोडायचंय आजुन....!  माझं उरीकलय तुमचच आवरा...... आन मला उचलु लागा थोडं.
किसना आपल्या युवराज्या आणि मस्तान्या बैलाला सोडत. चल हट युवराज्या म्हणत युवराज्याला पुढ घेत मस्तान्याला ओढीत शेवंताला सरपण उचलु लागतो. तोवर सूर्य पार डोंगराआड जातो.
किसना बैल घेऊन पुढ चालतो... शेवंता सरपणाचा भारा डोईवर घेऊन माग माग चालत असते.
दोघेही घराच्या ओढीन झपाझप अंतर उरकीत असताना गप्पा मारीत असतात.
शाळू दिस कसं निघून जात तेबी कळत नाय... अजुन थोडा येळ मिळाला असता तर दोन सऱ्या खुरपुन झाल्या असत्या...
म्या काय म्हणतो शेवंते आपुन उद्याच्याला दोन बाया घेऊ म्हंजी सरीन सरी पटदिशी उरकुन जाईल खुरपणी परत पुढ्बी काम येत्याल.
बगा न मग... तेव्हढच एकाला दोघी दोघीला तिघी काम बी उरकलं... मलाबी एकटीला उरकाना झालय. दिस पुराना आन काम उरकाना अशी गत झालीय माझी.
चल झपाझपा म्या सकाळ बघतो दोन बाया....
चला चला आजुन घरी जाऊन बी लई काम हाय..... आत्यानी झाडलोट केली असलं पण सयपाकाला पार उशीर होतो तवर पोर बी झोपुन जात्यात. मग पहाटच भुक भुक करत्यात.
असचं गप्पा मारत मारत दोघ घरी पोहचतात..
     किसना दावणीला बैल बांधतो. शेवंता सरपण टाकून थोडं चुलीसाठी घेऊन घराकड येती... किसना वैरणीच्या गंजीतून दोन पेंड्या कडबा काढुन सरपणातील कुऱ्हाडीने तोडुन बैलांना टाकतो.
शेवंता घरी जाताच तुका आणि सई आईला बिलगतात... शेवंता त्यांना गोंजारीत चुलीपुढ सरपण टाकुन चुल पेटवती.
शेवंताची सासू घरातुन बाहेर येत.... अग किती उशीर करता येईला..... घर प्रपंचा यामधी पोर सोर बी असत्यात त्यांना काय उपाशी झोपु द्यायचं काई....
आत्या दिस जातो भरदिशी रानातली काम बी उरकत नाही आणि त्यात रान जवळ नाही....
बर बर बया आता भात घाल पटदिशी परत झोपतील उपाशी...
तेवढ्यात किसना येऊन हातपाय धुवायला पाणी घेतो... तीकडून आवाज देतो ..... शेवंते जरा च्या ठिव.... आज लई कटाळा आला बग....
ठिव थोडा च्या त्यो बी पिईल मलाबी घोटभर दे आन पोरांना ती पिशवीतली बटरं दे च्याबर....
ठिवती आत्या तुम्ही तेवढा देव्हाऱ्यात दिवा लावा देवापूढ.....
म्हातारी उठुन घरात जाऊन दिवा लावते. किसना घड्यामधून जान काढुन ओसरीवर खुल्या आभाळा खाली टाकुन जानावर अंग टाकून पडतो. पोरबी त्याच्याकडला येऊन खेळतात बापलेकरामध्ये गप्पा रंगात म्हातारी आजीही शेजारी बसुन त्या गप्पा मध्ये रंगुन जाते.
शेवंता भारी कडाक काळा च्या बनुवून आत्याला तिचा धनी किसनाला देती. पोरांना च्यात बटरं भिजवुन खायला देती. आणि स्वतः घोटभर च्या घेऊन सयपाकाला सुरुवात करते.
इकड खुल्या आभाळाखाली आजी नातवंड आणि ल्योक यांच्या गप्पा गोष्टी रंगात आलेल्या असतात... आणि शेवंताची आपला प्रपंच जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.... चुलीच्या धुरात डोळ पुशीत भाकरी कालवण मोठ्या प्रेमान बनविते. आणि सगळ्यांना जेवणासाठी आवाज देते.
आजीच्या गोष्टी ऐकत झोपी गेलेली लेकर त्यांना जेवणासाठी बळच उठवुन सगळेजण जेवायला बसतात. किसना, आत्या यांना ताट वाढून शेवंता पोरांना जेवण भरविते. सगळ्याचं जेवण झाल्यावर शेवंता स्वताच ताट वाढुन जेवण करते. आणि सगळे पुन्हा अंथरूनावर अंग टाकून झोपी जातात. शेवंता आपली प्रपंच जपण्यात दंग असते. चंद्राच्या मंद प्रकाशात चांदण्यांच्या चमचमण्यात मोठ्या उत्सहात सगळ आवरून भांडी घासुन झोपलेल्या पोरांच्या अंगावर पांघरून घालून आत्याच्या उशाखालची मोठी जाड उशी आत्याच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन अलगद काढून मनात एकच प्रार्थना करते " हे देवा माझं जिण माझा प्रपंच तुला एकच मागण सुखी होऊदे माझा संसार" पोरांच्या अंगावरून हात फिरवत उद्याचा विचार करत शेवंता झोपी जाते.....

© लेखक राहुल दादा बिचकुले
८८८८८९७५३३    

शनिवार, २३ मार्च, २०१९

शब्दचोर





जमाना पार बदलला
विद्या जात नाही चोरीला
पण चोर लै हुशार
चोरतात फक्त शब्दाला


लेखकांचे श्रम 
रचतात शब्दांचा इमला
चोर तो चोरच
करतो त्यावरही हमला


जमाना ऍडव्हान्स
इथं उत आलाय कॉपी पेस्टला
लेखक जातो लिहुन 
ताण नाही शब्दचोराच्या डोक्याला


आम्हा लेखकांची
नाही काही अपेक्षा
शब्द चोरा तुम्ही खुशाल
पण काढु नका त्यातुन आमच्या नावाला


शब्द हेच धन आमचे
शब्दच आमची श्रीमंती
कॉफी पेस्टच्या जमान्यात
समजत नाही आम्हाला
आमचे शब्द कुठे करतात भ्रमंती
आमचे शब्द कुठे करतात भ्रमंती

    © कवी : राहुल दादा बिचुकले


शुक्रवार, २२ मार्च, २०१९

मार्ग अंधश्रद्धेचा

मार्ग अंधश्रद्धेचा




मंदिर, प्रार्थनास्थळ हि माणसाच्या श्रद्धेची ठिकाणे आणि भारतीय संस्कृतीची वारसा स्थळे हि ठिकाणे आज विकासाच प्रतीक ठरत आहेत आणि समाजप्रबोधनाच एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत. येथे देवावरील विश्वासापोटी अनेक श्रद्धाळू भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे एकत्र येतात परंतु अनेक अंधश्रद्धाळू बुवा बाबा जे अंधश्रद्धेच्या बाजारातील एक्सपर्ट व्यापारी भक्ताच्या श्रद्धेच्या फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात सहज ओढतात.....

     बोलणं तर किती गॉड ...... ये अजाण बालका तुला जाण नाही तुझ्या आयुष्यात काय चाललंय तू चांगल्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण वाटेतील काटे काही दूर होत नाही.....
    माणसाला पूर्ण घोळून घेतात मग पुढचं शस्त्र.....
तुझे शेजारी त्यांना तुझं पाहवत नाही काही काळापूर्वी सगळं काही चांगलं चाललं होतं पण आता त्या एका वाईट करणीमुळे तुझा संसार भरकटत चालला आहे... आणि पुढे अनेक संकट येणार आहेत.....
     संकटाच नाव काढलं तर लगेच श्रद्धाळू मनातुन घाबरतो आणि उपाय विचारतो....
महाराज उपाय काय यावर ......
   मग येतो उपाय 
हा घे गंडादोरा तुझ्या डाव्या दंडाला बांध..... आन हि बाहुली दरवाजावर बांध ...  तात्पुरती संकट रोखली जातील.....
     पुढचा उपाय जालीम करावा लागलं 
अमुक तमुक वारी भेट देवाला सुक्या निवदाच ताट
दंड म्हणुन दक्षिणा आन या बाबाला अंगी वस्त्र उपरणा घेऊन ये बाबा सारी संकट होतील दूर नाही पडणार घरावर वाईट नजर समोरच्याला करून टाकीन बेजार लोटांगण घालील तुझ्या पायावर......
   मग श्रद्धाळू भाविक मनातुन समाधानी होतो बाबाला दक्षिणा देतो घरी येतो सांगितलं ते सारं करतो आणि समाधानी माणुस मनातुन सूडान पेटतो....  ह्या शेजाऱ्यावर संशय त्या शेजाऱ्यावर संशय त्यातून नसतं वैर पत्करतो... एकाकी जीवन जगु लागतो.... आता आधार फक्त बुवा बाबांचा...... अशाप्रकारे अंधश्रद्धेच्या जाळ्यात पुरता गुरफटून जातो........

     लेखक : राहुल बिचकुले

बुधवार, २० मार्च, २०१९

तुळसा व्हय म्या तुळसा





व्हय म्या तुळसा
कमरी घेऊन कळसा
चालते बाई झपझप

डोईवर तळपतो सूर्यदेव खुप

पायी पैंजण

करी रुणझुण
कशी डुलते झुलते
देहाची कमान

चाल रुबाबदार

कमरी घागर
शोभते गवळण
चपळ नार

उन्हाच्या झळा
अंगी झेलते
तप्त अंगार पायी
तुडवीत चालते

मुखी हावभाव
जणु मुरलेली सुगरण
सुगरणीला देईल तोड
असं आहे हे वागणं

व्हय व्हय म्या तुळसा
कमरी घेऊन कळसा
चालती झपझप वेगानं
भागविण्या तहानलेल्याची तहान

©  कवी : राहुल दादा बिचकुले

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

नारी शक्ती







एक तीच ती नारी

साऱ्या जगता उद्धारी
दुर्गा ती नवशक्ती ती
आदिमाया भवानी ती

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

कलियुगात अवतार तिचा
प्रचंड शक्तीचा तो साठा
भेदभाव ही दुर झाला
घाली गवसणी ती गगनाला

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

जगी महान ती होऊन गेली
विविध रूपे तिने दाविली
माळ यशाची तिने ओविली
नारी शक्ती दाखवून दिली

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

तीच जिजाऊ
तीच अहिल्या 
सावित्री ती होऊन गेली
असंख्य रूपे तिने घेतली

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

तीच महिला 
नाही अबला
स्त्री शक्तीचा डंका वाजला
तोड नाही त्या स्त्री शक्तीला

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

स्त्री शक्तीचा सन्मान करा
शिवबाची शिकवण मनी धरा
नका समजु ती आहे महिला
नाही राहिली ती आता अबला

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

कला विज्ञान वाणिज्यात
कमी नाही कोण्या क्षेत्रात
देश रक्षणी सज्ज महिला
कलियुगात देती दाखला

हे नारी हे नारी हे नारी
हे नारी हे नारी नारी

© कवी : राहुल दादा बिचकुले

रविवार, ३ मार्च, २०१९

झेंड्याचे राजकारण

झेंड्याचे राजकारण

भाऊ वातावरणात लई बिघाड झाला बग !
आता पाऊस टाइमाव पडत नाय की पिक मोसमात येत नाय... 
निसर्गाचं चाळींदर बिगडल पार... लई आवघाड होऊन बसलंय बग. 

याला कारण काय र दादा ?

माणुस अन दुसरं काय ? 

कसं?

आरं पुर्वी माणसं कशी होती... विरोधक होती पण स्वतःच्या स्वराज्याबद्दल अभिमान होता.
आपलं ह्रदय छत्रपती शिवाजी राजं यांचं काम आणि त्यांचं इचार बग. 
झेंडा एकच भगवा.... हिंदुत्वाच प्रतिक पण त्याच्या सावलीत अठरापगड जातीच मावळ जीवाला जीव लावून लढत होतं.... या भूमीचं आणि स्वराज्याच रक्षण करत होतं. सगळी कशी गुण्यागोविंदाने राहत होती. तव्हा काळ आणि निसर्ग ही त्यांच्या या एकीकडे पाहुन आनंदानी बिलगायला यायचा....
    पण आज ? आज फार येगळ चाललंय प्रत्येकांनी आपापला झेंडा शोधलाय.... आणि आपल्यातच वैर पेरून बसलाय....
    प्रत्येकाच्या धर्माचा झेंडा येगळा....
    प्रत्येकाच्या जातीचा झेंडा येगळा....
   आन प्रत्येकाच्या पक्षाचा झेंडा येगळा....
   यात पार इसरून गेली त्या दोन झेंड्याला एक आपल्या भारताचा तिरंगा आन दुसरा आपल्या राजाच्या स्वराज्याचा भगवा ....
माणुस फार स्वार्थी झाला......
देशावर कोणतंही संकट येऊद्या तरी त्या काळात हे जातीपातीचे, धर्माधर्मांचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकवीत असतात हि माणसं.... फक्त माणुस म्हणता येणार नाही तर विशिष्ट गटांची माणसं म्हणावी लागेल..... 
आज जाती पातीच सोडा घराघरात दोन तीन झेंडे घुसायला लागलेत.... पोरगा एका पक्षात, बाप दुसऱ्या पक्षात तर आजा तिसऱ्याच पक्षात...

कसा माणुस एक व्हायचा.......

जोवर हे झेंड्याचे राजकारण माणुस नावाच्या प्राण्याच्या डोक्यातुन जाणार नाहील
तवर ना गावाचा... ना राज्याचा.... ना देशाचा कुणाचाच ईकास होणार नाही.

जोवर माणुस मनातील हे झेंड्याचे राजकारण मनातुन काढून या देशासाठी आपल्या माय भूमीसाठी एकत्र येणार नाही तोवर....
आपल्याला आस्मानी सुलतानी संकट त्याचबरोबर आपल्यातील वैराला तोंड द्यावेच लागेल. मग शेवटी ठरलंच आहे..

काय ?

आपुनच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आन दुसरं काय....

म्हणुन एक व्हा आणि एका झेंड्याखाली एकत्र या हे शिवतंत्र अवलंबाल तर कोणत्याही संकटात तराल.....

लेखक : राहुल दादा बिचकुले

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...