माझा प्रपंच
झाली सांजवेळ
या सांजवेळी
सूर्यदेव दुर गेला
बुडाला डोंगरापार
झाकाळली धरती
पसरली सावली
झाला अंधार
झाला अंधार
मला देवाजीचा आधार
एकच मागण माझ
होऊदे सुखाचा संसार
होऊदे सुखाचा संसार
सायंकाळची वेळ अंगणात हातात झाडू घेऊन म्हातारी आजी अंगण झाडत झाडत
मनाशीच पुटपुटत असते. सूर्य पार डोंगराच्या पल्याड बुडाला.... सांजची वेळ झाली थोड्याच
येळात काळोख पसरल.... माझा किसना आजुन कसा बर आला नाय. हि शेवंती कधी येऊन उरकायची
सगळी काम ह्या काळजीत म्हातारी इकड काम उरकीत असती.....
तिकड किसना आणि त्याची बायको शेवंता रानातल आवरून थोडसं सरपण आवळून
घेत असत्यात
ये शेवंते आग उरीक
जायला उशीर होईल तीन चार मैलाच आंतर तोडायचंय आजुन....! माझं उरीकलय तुमचच आवरा...... आन मला उचलु लागा
थोडं.
किसना आपल्या युवराज्या आणि मस्तान्या बैलाला सोडत. चल हट युवराज्या
म्हणत युवराज्याला पुढ घेत मस्तान्याला ओढीत शेवंताला सरपण उचलु लागतो. तोवर सूर्य
पार डोंगराआड जातो.
किसना बैल घेऊन पुढ चालतो... शेवंता सरपणाचा भारा डोईवर घेऊन माग माग
चालत असते.
दोघेही घराच्या ओढीन झपाझप अंतर उरकीत असताना गप्पा मारीत असतात.
शाळू दिस कसं निघून जात तेबी कळत नाय... अजुन थोडा येळ मिळाला असता तर
दोन सऱ्या खुरपुन झाल्या असत्या...
म्या काय म्हणतो शेवंते आपुन उद्याच्याला दोन बाया घेऊ म्हंजी सरीन
सरी पटदिशी उरकुन जाईल खुरपणी परत पुढ्बी काम येत्याल.
बगा न मग... तेव्हढच एकाला दोघी दोघीला तिघी काम बी उरकलं... मलाबी
एकटीला उरकाना झालय. दिस पुराना आन काम उरकाना अशी गत झालीय माझी.
चल झपाझपा म्या सकाळ
बघतो दोन बाया....
चला चला आजुन घरी जाऊन बी लई काम हाय..... आत्यानी झाडलोट केली असलं
पण सयपाकाला पार उशीर होतो तवर पोर बी झोपुन जात्यात. मग पहाटच भुक भुक करत्यात.
असचं गप्पा मारत
मारत दोघ घरी पोहचतात..
किसना
दावणीला बैल बांधतो. शेवंता सरपण टाकून थोडं चुलीसाठी घेऊन घराकड येती... किसना
वैरणीच्या गंजीतून दोन पेंड्या कडबा काढुन सरपणातील कुऱ्हाडीने तोडुन बैलांना
टाकतो.
शेवंता घरी जाताच तुका आणि सई आईला बिलगतात... शेवंता त्यांना
गोंजारीत चुलीपुढ सरपण टाकुन चुल पेटवती.
शेवंताची सासू घरातुन बाहेर येत.... अग किती उशीर करता येईला..... घर
प्रपंचा यामधी पोर सोर बी असत्यात त्यांना काय उपाशी झोपु द्यायचं काई....
आत्या दिस जातो भरदिशी रानातली काम बी उरकत नाही आणि त्यात रान जवळ
नाही....
बर बर बया आता भात
घाल पटदिशी परत झोपतील उपाशी...
तेवढ्यात किसना येऊन
हातपाय धुवायला पाणी घेतो... तीकडून आवाज देतो ..... शेवंते जरा च्या ठिव.... आज
लई कटाळा आला बग....
ठिव थोडा च्या त्यो
बी पिईल मलाबी घोटभर दे आन पोरांना ती पिशवीतली बटरं दे च्याबर....
ठिवती आत्या तुम्ही
तेवढा देव्हाऱ्यात दिवा लावा देवापूढ.....
म्हातारी उठुन घरात
जाऊन दिवा लावते. किसना घड्यामधून जान काढुन ओसरीवर खुल्या आभाळा खाली टाकुन जानावर
अंग टाकून पडतो. पोरबी त्याच्याकडला येऊन खेळतात बापलेकरामध्ये गप्पा रंगात
म्हातारी आजीही शेजारी बसुन त्या गप्पा मध्ये रंगुन जाते.
शेवंता भारी कडाक
काळा च्या बनुवून आत्याला तिचा धनी किसनाला देती. पोरांना च्यात बटरं भिजवुन खायला
देती. आणि स्वतः घोटभर च्या घेऊन सयपाकाला सुरुवात करते.
इकड खुल्या
आभाळाखाली आजी नातवंड आणि ल्योक यांच्या गप्पा गोष्टी रंगात आलेल्या असतात... आणि
शेवंताची आपला प्रपंच जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.... चुलीच्या धुरात डोळ पुशीत
भाकरी कालवण मोठ्या प्रेमान बनविते. आणि सगळ्यांना जेवणासाठी आवाज देते.
आजीच्या गोष्टी ऐकत
झोपी गेलेली लेकर त्यांना जेवणासाठी बळच उठवुन सगळेजण जेवायला बसतात. किसना, आत्या
यांना ताट वाढून शेवंता पोरांना जेवण भरविते. सगळ्याचं जेवण झाल्यावर शेवंता
स्वताच ताट वाढुन जेवण करते. आणि सगळे पुन्हा अंथरूनावर अंग टाकून झोपी जातात.
शेवंता आपली प्रपंच जपण्यात दंग असते. चंद्राच्या मंद प्रकाशात चांदण्यांच्या
चमचमण्यात मोठ्या उत्सहात सगळ आवरून भांडी घासुन झोपलेल्या पोरांच्या अंगावर पांघरून
घालून आत्याच्या उशाखालची मोठी जाड उशी आत्याच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन
अलगद काढून मनात एकच प्रार्थना करते " हे देवा माझं जिण माझा प्रपंच तुला एकच
मागण सुखी होऊदे माझा संसार" पोरांच्या अंगावरून हात फिरवत उद्याचा विचार करत
शेवंता झोपी जाते.....
© लेखक राहुल दादा बिचकुले
८८८८८९७५३३

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी