मंगळवार, ३० जुलै, २०१९

कल्पवृक्ष कथा भाग ५


कल्पवृक्ष भाग पाच 




विजय सम्राट विजय नगरात पोहचताच नगरात दवंडी पिटतो. व सर्वत्र वृक्षलागवड करण्यात यावी. पशु पक्षांना आसरा देण्यात यावा. व आपल्या विजय नगरात एक जंगल तयार करण्यात यावे असे फर्मान काढतो. सर्व प्रजा, मंत्रीमंडळ, खुद्द राजा व राजकन्या या वृक्षलागवड चळवळीत सहभागी होतात. जंगलाची जागा राखली जाते. तेथे एक मंदिर उभारून ते वन देवाच्या नावाने देवराई म्हणुन राखले जाते. या वनाला कुणीही हानी पोहचवायची नाही. याचे संगोपन करायचे व यातुन मिळणारी वनसंपती फळे, फुले, औषधी वनस्पती यांचा व्यापार करायचा असा नियम केला जातो.
विजयनगरला एक खलिता येतो....
मी वनराई नगरचा राजा सम्राट देवराय आपल्या वन निर्मितीच्या कार्याने खुश आहे. व माझ्या राज्याची महाराणी म्हणुन मी आपल्या कन्येचा स्वीकार करण्यासाठी येत आहे.
    संपूर्ण विजय नगरमध्ये आनंदाचे वातावरण होते. सम्राट देवराय च्या स्वागताची तयारी करण्यात येते. विजय नगरच्या प्रवेशद्वारापाशी सम्राट विजय राजकन्या विजया आणि मंत्रिमंडळ व सर्व प्रजा वाट पाहत असतात. दुरूनच वनराई नगरचा ध्वज दिसु लागतो. सगळीकडे वाद्यांचा आवाज घुमू लागतो. मोठ्या उत्साहात सम्राट देवरायचे स्वागत होते. सम्राट देवराय व राजकन्या विजया यांच्या लग्नाची तयारी होते. मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह लावुन दिला जातो. व हुंडा म्हणुन सोने नाणे दिले जाते.
     तेव्हा देवराय विजय सम्राटशी बोलतो. माझ्या राज्यात माझी देवराई, वृक्ष, वेली, पशु, पक्षी हेच माझं सोन आहे त्यामुळे द्यायचे असेल तर भेट म्हणुन वृक्ष वेली द्या.
    तेव्हा विजय सम्राट आपल्या राज्यातील रोपवाटिकेतुन अनेक वृक्ष भेट म्हणुन देतात. व आनंदाने पाठवणी करतात.
    राजकन्या विजया आनंदाने सम्राट देवराय सोबत जाण्यास निघते.
वनराई नगरच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होताच. विविध वाद्य वाजू लागतात. नव्या महाराणीचे व सम्राट देवरायांचे स्वागत होते. संपुर्ण नगरात पाठवणी सोबत आलेली रोपे वाटली जातात. आणि रथ राजमहालाची वाट चुकवत जंगलाच्या दिशेने घेण्यास सम्राट देवराय सांगतात. सोबत मंत्रीमंडळ व प्रजा ही असते. रथ जंगलातुन तळ्याकाठी येऊन थांबतो. सम्राट देवराय त्या कल्पवृक्षाच्या झाडाला कडकडून मिठी मारतो. डोळ्यातुन अश्रू धारा येतात.
तेव्हा विजया प्रश्न विचारते.
तुम्ही या झाडाला मिठी का मारली ?
तेव्हा देवराय विजया बरोबर सर्व प्रजेला सांगतो.
    हि ती देवता आहे. जिने हे जंगल घडवले, एका आजीचे वचन पुर्ण केले, एका सामान्य मुलाला राजा केले, आणि विस्थापित झालेल्या नगरवाशीयांना पुन्हा आपल्या राज्यात आणले. व एक नवे राज्य निर्माण केले. हाच तो कल्पवृक्ष ज्याने आजवर मला माझ्या कार्यात मदत केली. माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. आता तुम्हीही या वृक्षाची पूजा करा व वन रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या.
    सम्राट देवराय व राणी विजया कल्पवृक्षाची पुजा करतात. व वृक्षातून आवाज सम्राट देवराय तुझे कार्य महान आहे. आणि पुढेही असेच चालु ठेव. जर निसर्ग जपला तर तोही तुम्हाला जपेल. आणि निसर्गाला हानी पोहचवाल तर तोही तुमच्यावर कोपेल. आता माझे कार्य संपले. आता तुम्हीच अंतर्मनातील शुद्ध विचाराची ज्योत पेटवा व  कार्य करा. तुमच्या मनाला जे चांगले वाटेल ते करा. निसर्ग संवर्धन करा. पशु पक्षांना आसरा द्या. तुम्ही सर्व सुखी होताल. आणि आवाज बंद होतो.
    सम्राट देवरायाच्या डोळ्यात पाणी येते. आणि एक घोषणा करतो. या कल्पवृक्षाच्या शेजारी एक वनदेवीचे मंदिर बांधण्याची.
    मंदिराचे काम पुर्ण होते. राजा - प्रजा सर्व वनदेवीची पूजा करतात. उत्सव म्हणुन आपल्या राज्याबरोबर शेजारील राज्यातही वृक्ष लागवडीची चळवळ उभी करतात. आणि सम्राट देवराय राणी विजया आणि वनराई नगरची प्रजा या वनराई नगरात सुखाने राहतात. आणि उगवत्या सूर्याच्या प्रतिमेच्या मध्ये कल्पवृक्ष हा ध्वज “निसर्ग संवर्धन करा ती काळाची गरज आहे” हा संदेश देत अखंड वनराई नगरच्या राजमहालावर व वनदेवीच्या मंदिरावर व या वनराई नगरात फिरायला जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात फडकत आहे.

तात्पर्य :- मन हेच कल्पवृक्ष आहे. शुद्ध मनाने घेतलेले निर्णय आमलात आणा तेव्हा काहीतरी चांगले घडेल. निसर्ग संवर्धन करा ती बदलत्या काळाची गरज आहे.   

    लेखक : राहुल दादा बिचकुले
मो. ८८८८८९७५३३        .

कथा आवडल्यास आवर्जुन प्रतिसाद द्या......

धन्यवाद !!!

कल्पवृक्ष कथा भाग ४


कल्पवृक्ष भाग चार 



कल्पवृक्षाने सांगितल्याप्रमाणे राजकुमार वनराई नगरवाशीयांना पुन्हा परत येण्याचे आव्हान करतो. व नगरवासी पुन्हा परत येतात. व वनराई नगरला राज्य म्हणुन घोषित करतात. राजकुमारला सम्राट देवराय म्हणुन घोषित करतात. सम्राट देवराय जनतेमधून राज्यकारभार करण्यासाठी योग्य माणसांची निवड करतो. तसेच सैनिक तुकडी हि निर्माण करण्यात येते. सम्राट देवराय आपल्या जनतेला सर्व नियम बंधने घालुन देतो. व एक आदर्श राज्य निर्माण होते. जंगलातील फळे, फुले, औषधी वनस्पती व शेतीमाल यांची बाजारपेठ निर्माण होते. व या बाजारपेठेत शेजारील विजयनगर तसेच इतर राज्यातील व्यापारी हि येथे खरेदी साठी येऊ लागतात. व वनराई नगरची नावलौकिकता आसपासच्या सर्व राज्यामध्ये पोहचते. राजकन्या विजयाच्या कानीही हि बातमी पोहचते.
    राजकन्या विजया भेटीसाठी आतुर होते. आपले वडील विजय सम्राट यांना वनराई नगर राज्यभेटीचा प्रस्ताव मांडते. विजय सम्राट आपल्या मुलीच्या प्रस्तावाला नकार देऊ शकत नाही. तोही तयार होतो.
 आणि वनराई नगरला राज्य भेटीचा खलिता पाठवण्यात येतो. राजा देवरायही होकाराचा खलिता पाठवतो . राजकन्या विजया येणार या आनंदात राजा देवराय वनराई नगर शुशोभित करण्यास सांगतो. वनराई नगरच्या प्रवेशद्वारावर सूर्याच्या प्रतिमेत कल्पवृक्ष असणारा मोठा ध्वज लावण्यात येतो. संपुर्ण नगर विजय सम्राट व राजकन्या विजया यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.  
 इकडे विजय सम्राट तयारीला लागतो. पाच घोड्यांचा मोठा रथ सजवला जातो रथावर विजयनगरचा मोठा ध्वज लावण्यात येतो. रथामध्ये विजय सम्राट व राजकन्या विजया सोबती सैनिक दास दासी यांचा मोठा समुह घेऊन वनराई नगरकडे प्रस्थान करतो. विजय नगरची सीमा ओलांडताच थंड हवेची झुळूक स्वागत करते. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट वनराई स्वागतास सज्ज. विविध फळाफुलांनी लगडलेली झाडे राजकन्या विजया विजयनगरचा राजा विजय सम्राट सम्राट मन मोहून टाकतात. राजकन्या व राजा प्रवेशद्वाराजवळ येताच विविध पशु पक्षी आपल्या आवाजात त्यांचे स्वागत करतात. वनराई नगरात शिंग, तुताऱ्या, ढोल यांच्या आवाजात राजकन्या आणि राजा यांचे स्वागत होते. खुद्द सम्राट देवराय व प्रजा त्यांचे स्वागत करते. या स्वागताने राजकन्या विजया व राजा विजय सम्राट भारावून जातात. राजा देवरायशी चर्चा करता करता महालात पोहचतात.
राजा देवराय यांच्या राजदरबारी सम्राट विजय व राजकन्या विजया यांचा शाही पाहुणचार होतो. सभागृहात बैठक बसते. सम्राट विजय जेव्हा वनराई नगर मध्ये पोहचला होता तेव्हा पासुन त्याच्या मनात एक विचार घोळत होता. राजकन्या विजया या राज्यांची राणी व्हावी. आणि तो विषय देवराय बोलतात.
सम्राट देवराय ... आमच्या मनी एक मानस आहे तो तुम्ही स्विकारावा.
बोला विजय सम्राट !
आमची कन्या आपण आपली महाराणी म्हणुन स्विकारावी.
हे ऐकून राजकन्या लाजते. आणि देवरायच्या मनात आनंद होतो. परंतु तो चेहऱ्यावर न दाखवता प्रश्न करतात.
पण ?
पण काय ? बोला देवराय ...
आमची एक अट आहे. विजय सम्राट...
कसली अट ?
आम्ही लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वाढलो. आणि निसर्गाची आवड निर्माण झाली. आज मी तुमच्या कन्येशी विवाह केल्यास आपला जावई होणार. आणि जावई म्हटलं आमची तुमच्या राज्याला भेट नक्की.
हो बरोबर. तुम्हाला यावच लागेल विजय नगरला...
पण आम्ही जिथे निसर्गाची हानी झाली आहे तेथे भेट देत नाही.
मग यावर उपाय सांगावा सम्राट देवराय ! कारण आमची कन्या आम्हाला जिवापेक्षा प्रिय आहे. व या नगरात आल्यापासुन तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला. असा आनंद यापूर्वी कधीही पाहिला नाही.
तुम्हीही विजयनगर मध्ये जंगलासाठी जागा राखावी व तेथे सुंदर वन उभारावे. व संपूर्ण नगरात झाडे लावण्यात यावी. पशु पक्षांना आसरा दिला जावा.
ठिक आहे. सम्राट देवराय ! आम्ही आताच आमच्या राज्यात गेल्यावर हा उपक्रम हाती घेतो. आणि तुम्हीही त्वरित आपल्या राज्याच्या महाराणी ला न्यायला वरात घेऊन आमच्या नगरात यावे.
विजय सम्राट व राजकन्या विजया आपल्या राज्यात जाण्यासाठी निघतात. तेव्हा विजय सम्राट त्यांच्याबरोबर असंख्य वृक्षांची रोपे व बिया यांचा नजराणा पाठवतो. विजया देवराय कडे आनंदाने पाहत होती. व नजरेने नजरेशी संवाद साधत होती. अशाप्रकारे राजकन्या विजया व विजय सम्राट यांना सम्राट देवराय निरोप देतात. 
क्रमश ....

कल्पवृक्ष कथा भाग ३

कल्पवृक्ष भाग तीन 





पण काय ? कल्पवृक्षा !
    अरे तिला आपली करून घेणे म्हणजे लग्न करणे. आणि लग्न करत असताना हा पण ठेवायचा कि, मुलीकडून हुंडा म्हणुन सोने नाणे, दागदागिने घ्यायचे नाही फक्त आपल्या जंगलाएवढे मोठे जंगल निर्माण करून त्याचे रक्षण करण्यास सांगायचे. कारण राजाची कन्या फार लाडकी आहे, राजा तिच्यासाठी काहीही करू शकतो.
    ठिक आहे ! जंगलचा राजा तयारीला लागला त्याने राजमहाल अतिशय सुंदर पद्धतीने सजवला. राजमहालासमोर अलिशान बगीचा, सुंदर छोटे तळे, तळ्यात सुंदर कमळे, सुंदर राजहंसाचा मुक्त विहार, सर्व पशुपक्षांचा मुक्त वावर सुंदर असा राजमहाल तयार झाला. व मनात त्या राजकन्येचा विचार करू लागला.
    राजकन्याही आपल्या महाली गेली व जंगलच्या राजाचा विचार करू लागली. तिला सतत तो राजमहाल व तो राजा दिसत होता. राजकन्येला ती आठवण सतावू लागली. राजाही तिच्या येण्याची वाट पाहू लागला त्याला विश्वास होता कि, राजकन्या एकदा तरी येईल म्हणुन जंगलच्या राजाने राजमहाल अतिशय सुंदर पद्धतीने सजवला.
    राजकन्येलाही राजाच्या भेटीची ओढ लागली त्यामुळे ती एक दिवस दासीला सोबत घेऊन त्या राजमहालाकडे निघाली. राजमहालाजवळ येताच तिचे लक्ष राजमहालाच्या प्रवेशद्वारावर गेले. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेले प्रवेशद्वार व राजमहाल पाहुन तिला खुप आनंद झाला. आणि प्रवेशद्वाराजवळ वाट पाहत असलेला राजा तिला दिसला. मनात आनंद झाला नजरेला नजर भिडली व तिला जाणीव झाली कि, राजाला सुद्धा आपल्या भेटीची ओढ लागली आहे. राजकन्येला भेटीची ओढ लागली होती म्हणुन राजकन्या विचार करू लागली कि, तिने त्या जंगलच्या राजाजवळ जावून विचारले कि, तुम्ही या जंगलाचे राजा आहात का ? हा राजमहाल तुमचा आहे का ?
    होय ! राजमहाल माझा आहे. व मी या जंगलाचा राजा जंगलातील पशु पक्षी माझी प्रजा आहे. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. पण तुम्ही कोण?
    मी ! शेजारच्या विजयनगरच्या राजाची कन्या विजया आहे. माझ्या वडिलांचे नगर खुप मोठे आहे. परंतु तेथे एवढे मोठे जंगल नाही. म्हणुन आम्ही या जंगलाच्या दिशेने आलो होतो. आणि हे सुंदर जंगल आवडले आणि अधून मधुन येतच राहिलो. आम्ही महालात येऊ शकतो का ?
    का नाही ? राजा म्हणाला.
    राजकन्या विजया आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन राजाबरोबर राजमहालात प्रवेश करतात. व सुंदर राजमहाल पाहुन आनंदीत होतात. विजया विचारते. तुम्ही येथे एकटेच असता ?
    नाही ! मी एकटा नाही येथील पशुपक्षी माझ्याबरोबर असतात.
तसे नाही, कि येथे कोणी मनुष्य राहत नाही का?
आता नाही, पूर्वी होते!
पुर्वी !
होय पुर्वी ! येथे एक नगर होते. व असेच सुंदर जंगल या नगरातील लोक खुप चांगले व श्रद्धाळू होते. पण पैशाच्या मोहापायी त्यांनी जंगल तोडुन संकट ओढावून घेतले.दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर नगर सोडुन गेले. पण माझी आजी दुष्काळाला न घाबरता येथे मला घेऊन राहिली व मला संकटात जगायला शिकवुन देवाघरी गेली. नंतर मी हे जंगल निर्माण केले व जंगलाचे रक्षणही करण्याची जबाबदारी माझ्याकडे घेतली. कारण जंगल हा एक निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. तुमच्या विजय नगरचे साम्राज्य खुप मोठे असेल ना ?
    होय माझे वडील विजय सम्राट यांचे राज्य खुप मोठे आहे. परंतु आमच्या विजय नगरात असे मोठे जंगल नाही.
    परंतु विजय सम्राट जंगल निर्माण करू शकतील ना ?
    होय ! माझे वडील फार जिद्दी आहेत.
    विजया ! तुम्हाला या जंगलात राहायला आवडेल का ? या जंगलची राणी म्हणुन !
असेच बोलता बोलता राजा त्या राजकन्येला आपले प्रेम व्यक्त करून दाखवतो.  
    राजकन्या विजया विचार करत...... माझी प्रेमाला समंती आहे. पण ?
    पण काय ? राजकुमार विचारतो.
    मी विजयनगरची राजकन्या मैत्रिणीच्या सहवासात वाढलेली. आजुबाजुला लोकांचा वावर असलेल्या राज्यात लहानाची मोठी झालेली आहे. येथे पशु पक्षांच्या सहवासात माझे मन जास्त दिवस रमायचे नाही. तेव्हा तुम्ही येथे एक सुंदर नगर निर्माण करा.
राजकुमार होकार दर्शवतो.
राजकन्या त्याच्याकडे पाहत आपल्या मैत्रिणीबरोबर आपल्या नगरात निघुन जाते.
    जंगलचा राजा विचार करून चिंतेत पडतो. व कल्पवृक्षाकडे जातो.
    हे कल्पवृक्षा ! आता पुन्हा नगर वसवायचं... ते कसं. आणि पुन्हा हि मानस जंगलाला हानी तर पोहचवणार नाही ना.?
    हे जंगलच्या राजा आपल्या जंगलाच्या कोपऱ्यावर जिथे राजमहाल बांधला आहे तिथे अमाप जागा अजुन शिल्लक आहे. तेथे एक सुंदर नगर निर्माण कर. शेजारच्या नगरात आपल्या वनराई नगरचे जुने नगरवासी आहेत. त्यांना पुन्हा परत येण्यास आव्हान कर. आणि या वनराई नगरचे राज्य घोषित करून तु राजा सम्राट देवराय म्हणुन येथील राज्यकारभार सुरळीत पणे पार पाड. लोकांना बंधने, नियम घालुन दे या जंगलाला कोणतीही हानी पोहोचवायची नाही. येथील जंगलातुन मिळणारी फळे, फुले, औषधी वनस्पती यांचा व्यापार करा. जंगलाशेजारील पडीक जमीन शेती साठी वापरा. पशु पक्षांना त्रास देऊ नका. आणि या नगरवासियामधुन राज्याचे मंत्रिमंडळ, सैनिक,यांची निवड कर.
क्रमश ....

कल्पवृक्ष कथा भाग २

कल्पवृक्ष भाग दोन 



हे कल्पवृक्षा मी आताच सुरुवात करतो. मुलगा संपूर्ण जंगलभर फिरून फळे गोळा करू लागला त्याने फळे गोळा करता करता संपुर्ण जंगल सिमेचा अभ्यास केला. व काही दिवसात संपुर्ण जंगलातील फळे गोळा करून घेतली व ती फोडुन बियांचा मोठा ढिग लावला. व कल्पवृक्षाकडे जाऊन त्याला विचारू लागला कि फळे गोळा करून फोडुन झाली. आता काय करू?.
    आता हे गोळा केलेले बि संपूर्ण जंगलात पसरून टाक. कारण आता पावसाळा सुरु होईल. व तुझ्या श्रमाची जाण ठेऊन वरुणराजा प्रसन्न होऊन धावत येईल.
    मुलाने संपूर्ण बि जंगलात पसरवले. थोड्याच दिवसात सर्व बिया पसरवण्याचे काम पुर्ण झाले. व पावसाळा सुरु होऊन पाऊस पडु लागला मुलगा खुप आनंदीत झाला व त्या कल्पवृक्षाच्या झाडाला कडकडून मिठी मारली.  “ हे कल्पवृक्षा आज मला वाटते तुझ्या मदतीने मी माझ्या आजीचे वचन सत्यात उतरवत आहे”.
    “हे बघ बाळा तु निस्वार्थी वृत्तीने काम करतो आणि मीही निस्वार्थी वृत्तीने काम करतो दोघांचा हेतु एकच आहे. आणि जो निस्वार्थी वृत्तीने काम करतो तो स्वताच्या मनाचा राजा असतो व तो एक दिवस सर्वांच्या मनात स्थान निर्माण करतो. त्याचप्रमाणे मी आज तुला एक वचन देतो कि, ‘ तुला मी सदैव साथ देईल व तु मला काय मागशील त मिळवण्याचे मार्ग मी तुला स्वतः सांगेल ते तु स्वतः मिळवायचे. कारण ‘स्वतः मिळवण्यात जो आनंद अनुभव असतो तो आयते मिळण्यात नसतो’. पण त्याच बरोबर एक सांगतो कि, तु या जंगलाचा एक दिवस राजा होशील व सर्व प्राणी, पक्षी व झाडे या जंगलात तुझ्या सोबतीला येतील”.
    यावर मुलगा म्हणाला ठिक आहे.
बरेच दिवस निघुन जातात, पावसामागून पाऊस पडून जातात. जंगलामध्ये अनेक ठिकाणी तळी साचतात पाण्याची उपलब्धता भरपुर होते. व पसरलेले बि हळूहळू उगवू लागतात व हे उगवलेले बि पाहुन मुलाच्या मनात आनंद होतो. थोड्याच दिवसात संपुर्ण जंगल हिरवेगार दिसु लागते. झाडे भरभर वाढू लागतात. वाढलेले जंगल पाहुन पक्षी आकर्षित होतात. तसेच हळूहळू छोटे मोठे प्राणी आश्रयाला येतात. सर्व प्राणी पक्षी या जंगलात त्याच्या बरोबर राहु लागतात.
    पण एके दिवशी शेजारच्या राजाची मुलगी आपल्या मैत्रिणीबरोबर फिरत असताना तिची दृष्टी या जंगलावर पडते. व ती दासीबरोबर जंगल पाहायला जंगलात प्रवेश करते. तर हा जंगलचा राजा मुलगा पशु पक्षी यांच्या घोळक्यात जंगलात बसलेला असतो. तेव्हा त्याचे लक्ष त्या राजकन्येवर पडते व मनामध्ये विचार करतो कि, आजपर्यंत या नवीन जंगलात कुणीही माणुस येत नव्हते, पण आज हि मुलगी आपल्या मैत्रिणीबरोबर जंगलात कशी आली. याचा विचार करत तो कल्पवृक्षापाशी जातो. व विचार करतो कि, ती मुलगी कोण ? ती जंगलात कशी आली ?
    यावर कल्पवृक्ष बोलतो कि, तु आजपर्यंत याच जंगलात राहिला व येथीलच विचार केलास पण आता या जंगलाबरोबरच जरा जंगला बाहेरही काही पाहण्यासारखे आहे ते पाहुन घे. कारण ती मुलगी आपल्या शेजारील राज्यातील राजकन्या आहे. ती फिरत असताना तिने हे सुंदर जंगल पाहीले तेव्हा तिला या जंगलाचे आकर्षण निर्माण झाले. तु आता या जंगलाच्या कोपऱ्यावर एक सुंदर राजमहाल तयार कर. कारण तु या जंगलाचा राजा आहे.
    कल्पवृक्षाने सांगितल्याप्रमाणे तो काही दिवसात बाहेरचे जग पाहण्यासाठी जंगलाबाहेर पडला.  तेव्हा त्याला सुंदर घरे, राजमहाल व वेगवेगळी माणसे पाहायला मिळाली . व तो स्वताबद्दल विचार करू लागला, मी या जंगलाचा राजा. जंगलातील पशु पक्षी माझी प्रजा त्यांचे रक्षण मी करणार यासाठी मला बदलायला पाहिजे. कारण मला जंगलाचे, प्राणी, पक्षांचे महत्व समजावून देण्यासाठी त्यांच्यात मिसळले पाहिजे. म्हणुन या जंगलच्या राजाने स्वताच्या अंगावरील रानटी वेश काढून टाकला पाहिजे. व माणसाची कपडे घालुन वावरू लागला. व जंगलाबाहेरील जगाचा अभ्यास करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले कि, जंगलातील पशु पक्षाच्या बद्दल येथे फार गैरसमज आहेत. त्यांचा अन्नासाठी वापर केला जातो. स्वार्थापोटी शिकार केली जाते. झाडे इंधनासाठी तोडली जातात. यावर तो विचार करू लागला व कल्पवृक्षाने सांगितल्याप्रमाणे जंगलाच्या एका कोपऱ्यावर तो एक सुंदर राजमहाल बांधुन घेतो आणि येथुन जंगलाचे व पशु पक्षांचे रक्षण करण्याचे ठरवतो.
    पुन्हा एके दिवशी ती राजकन्या आपल्या मैत्रिणीबरोबर जंगलाच्या दिशेने निघालेली असते. व जवळ आल्यानंतर तिला हा भव्य राजमहाल नजरेस पडतो. व ती राजकन्या मैत्रिणीबरोबर राजमहालात प्रवेश करते. तेव्हा जंगलचा राजा हाच विचार करत असतो कि या माणसात मिसळायचे कसे ? व त्यांना महत्व पटवून द्यायचे कसे ? तेवढ्यात हि राजकन्या एकदम जंगलच्या राजासमोर येते. तेव्हा राजा हा फक्त त्या राजकन्येकडे पाहत राहतो. व राजकन्याही या जंगलच्या राजाकडे पाहत राहते. दोघांच्याही मनात आकर्षण निर्माण होते. आणि ती राजकन्या लाजुन माघारी निघुन जाते. परंतु राजा हा कर्तव्य विसरलेला नसतो. त्याला माहित असते कि आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा. तो कल्पवृक्षाची भेट घेण्यासाठी जंगलात जातो. व विचारतो.  हे कल्पवृक्षा ! तु मला एका सर्वसामान्य मुलापासून जंगलाचा राजा बनवले त्याचबरोबर जंगलाबाहेरील जगातही वावरायला शिकवले. पण मला आता काळजी वाटते कि, मी या जंगलाचे रक्षण करू शकेल का ?
    हे जंगलच्या राजा तुला मी एक मार्ग सांगतो. कारण मार्ग सांगण्याचे काम माझे आहे. त्यावरून चालायचे तुला आहे. तु त्या राजकन्येला आपली करून घे. पण?
क्रमश ....

कल्पवृक्ष कथा भाग १


कल्पवृक्ष  भाग एक 






    वनराई नगर नावाच एक गाव होते. त्या गावातील लोक खुप देवभोळे होते. त्यांनी देवाच्या नावाने एक जंगल राखले होते. हि देवराई खुप मोठी होती कि या देवराई मुळे  संपूर्ण गावातील लोकांना अन्नाची कधीही कमतरता भासत नव्हती. गावातील लोकही खुप श्रद्धेने या देवराईचे  रक्षण करत ते कधीही या देवराईतील वृक्ष तोडत नसत. या जंगलातून मिळणारी फळे, फुले, औषधी वनस्पती पासून औषधे व वाळलेल्या फांद्यापासून इंधन म्हणून लाकूड मिळत असे त्याचा उपयोग करून संपूर्ण गावकरी आपला उदर निर्वाह करत असे. एके दिवशी एका लाकूड तोड्याची नजर या जंगलावर पडली व त्याच्या मनात विचार आला कि आपण या जंगलातील झाडे तोडली तर आपल्याला लाकडासाठी दूरवर जावे लागणार नाही. असा विचार करून लाकूडतोड्याने झाड तोडले. व ते विकुन त्याने भरपुर पैसे कमावले हे गावातील लोकांनी पाहीले. व त्या लाकुड तोड्याची भेट घेतली व त्याला विचारले तु या जंगलातील झाड तोडले तेव्हा तुला भीती वाटली नाही का ? यावर लाकुड तोड्याने उत्तर दिले कि, नाही ! त्यामुळे गावातील लोकांच्या मनामध्ये पैश्यामुळे मोह निर्माण झाला व त्यांच्याही मनामध्ये झाडे तोडुन पैसे कमावण्याचा विचार आला. व त्यांनी झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्यांनी काही दिवस झाडे तोडली. पावसाळ्याचे दिवस आले. सर्वांना पावसाची आतुरता लागली. पण या जंगलातील झाडे तोडल्यामुळे वातावरण बदलुन गेले. पाऊस पडेनासा झाला. त्यामुळे जंगल वाळून जाऊ लागले लोकांना जंगलातून मिळणारे उत्पन्न कमी झाले लोकांना अन्नाची कमतरता जाणवु लागली पाणीही कमी पडू लागले लोक इकडे तिकडे भटकू लागले व अन्न पाण्यासाठी गाव सोडुन जाऊ लागले. सर्व गावकर्यांनी हळूहळू गाव सोडले. परंतु एका वयोवृद्ध आजीने तिच्या एका लहान नातवासह गावातच राहण्याचा निर्णय घेतला.
    या भकास, भयाण, गावात आजी आपल्या नातवासह राहु लागली. नातु हा जंगलातील वाळलेली फळे गोळा करून आणत व त्यावर आजीचा व नातवाचा उदर निर्वाह होऊ लागला या फळाच्या शोधामुळे या नातवाने संपूर्ण पाहीले. तेव्हा त्याला या जंगलात छोटेसे तळे दिसले व त्या काठावर एक छोटेसे झाड उगवून आलेले दिसले. ते झाड हिरवे असल्याचे पाहुन व तळ्यात पाणी असलेले पाहुन त्या मुलाला आश्चर्य वाटले व त्याने घरी जावून हे सर्व काही आपल्या आजीला सांगितले त्यावर आजीने उत्तर दिले कि, बाळा ‘देव तारी त्याला कोण मारी’ ! आजी म्हणाली. देव कोणाला उपाशी मरून देणार नाही! तु आजपासुन रोज त्या तळ्यावर पाणी आणण्यासाठी जायचे. आणि त्या लहान झाडाची काळजी घ्यायची हे जंगल पहिल्यासारखे करण्याची जबाबदारी आता तुझी तु सांभाळशील ना या जंगलाला ? हो आजी ! मीच हे जंगल पुन्हा तयार करणार ! मुलगा म्हणाला.
    मुलगा नित्यनेमाने त्या तळ्यावर पाणी आणण्यासाठी जाऊ लागला. व त्या झाडाची काळजी घेऊ लागला झाडही मोठे होऊ लागले व त्याबरोबर मुलगाही मोठा होऊ लागला. मुलगा समजदार झाला. त्याच्या वयोवृद्ध आजीने त्याच्याकडे एक वचन मागितले. ‘तु हे जंगल निर्माण करून त्याचे रक्षण करशील कारण याने बऱ्याच लोकांना लहानाचे मोठे केले. त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना जगवले’. परंतु ‘स्वार्थी लोकांनी आपल्या मोहापायी हे जंगल नष्ट केले’. पण तु हे करू नको! तु हे जंगल निर्माण करशील ना ? यावर मुलाने आजीला वचन दिले कि मी हे जंगल निर्माण करील ! आणि आजीने प्राण सोडला. मुलाने दुख विरहात न बुडता आजीच्या त्या वचनाची जाणीव मनात ठेऊन कार्यास सुरुवात केली. तो जाऊन त्या तळ्याच्या काठावर झोपडी बांधुन राहु लागला. रोज नित्यनेमाने झाडाची देखभाल करू लागला व  मनात रोज जंगल वाढवण्याचा विचार करू लागला. दिवसामागून दिवस जावू लागले. आजीचे वचन त्याच्या मनाला सतावू लागले. त्याला जंगल वाढवण्याची कल्पनाच सुचेना त्याला दिवस रात्र झोप लागेना. मनाची अस्वस्थता वाढू लागली कारण संपूर्ण जंगलात फक्त एक तळ्याकाठचे झाड हिरवे होते. एक दिवस त्या झाडाची निगराणी करत असताना तो अस्वस्थ मनाने त्या झाडाखाली बसला. आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला. झाड त्याला बोलु लागले. असा निराश का झालास? तु या जंगलाचा राजा आहे. मुलगा घाबरला या वाळलेल्या भयाण जंगलात कोण बोलत आहे मला. असा विचार करत आजूबाजूला पाहू लागला. हे पाहुन झाड पुन्हा त्याला म्हणाले घाबरू नकोस ! मी आहे. तेव्हा मुलाने झाडाकडे पाहीले. व त्याने आश्चर्याने तोंडात बोटेच घातली. त्यावर झाड म्हणाले. आश्चर्य वाटून घेऊ नकोस मी तुझ्याच मदतीसाठी या जंगलात उदयास आलो आहे. मी “कल्पवृक्ष” आहे!. तु मला जे मागशील ते मी तुला देईल. पण स्वार्थी बनू नको. कारण या स्वार्थाची मुळे संकटाच्या जमीनीत रुतलेली असतात. स्वार्थ बाळगून संकट ओढवुन घेऊ नकोस. तुझे भाऊबंद हे पैश्याच्या मोहापायी व मोठे होण्याच्या स्वार्थापायी संकटात सापडले व हि अवस्था बनवून घेतली. तुला राजा व्हायचे असेल तर स्वार्थी बनू नको.
    हे कल्पवृक्षा ! संकटाचा सामना करण्याचे व निस्वार्थीपणाने काम करण्याचे संस्कार माल माझ्या आजीने शिकविले आहेत. व संस्कार हे असे असतात. ते वेळोवेळी आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात. मला तुझी साथ जरी लाभली नसती तरी मी माझे कर्तव्य व आजीचे वचन विसरलो नसतो! पण ?
    पण काय ?
हे कल्पवृक्षा मी निराश झालो होतो. मी आता तुला फक्त हेच मागतो कि मी या जंगलाची पुन्हा निर्मिती करील. असे काही सांग...
तु मला तुझी इच्छा सांगितली, तर तु असे कर या जंगलातील सर्व प्रकारची फळे गोळा कर व फळे गोळा करून टी फोडुन घे व पुन्हा माझी भेट घे.
क्रमश ......

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...