शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

माझा समाज आणि शिक्षण ( धनगर समाजाची काव्यात्मक कथा )

माझा समाज आणि शिक्षण 

मनामध्ये येई विचार
माझा समाज धनगर
शिक्षणाची जरी इच्छा फार
परी जिवनाचा प्रवास खडतर
आम्ही राखतो मेंढर
होऊनी जीवावर उदार
आम्ही समजतो कर्तव्य थोर
लक्ष्मी आहे आमची मेंढर
माझा समाज धनगर
शिक्षणाची जरी इच्छा फार
परी जिवनाचा प्रवास खडतर .......

      माझ्या मनामध्ये विचार येतो कि, मी धनगर समाजाचा आहे आणि माझा समाज शिक्षणाच्या बाबतीत खुप मागे आहे. माझ्या समाजाला शिकण्याची इच्छा खुप आहे. पण जिवन जगण्याचा प्रवास अवघड आहे. रोज पायाला भिंगरी बांधल्यागत या गावातुन त्या गावात आणि त्या गावातुन पुढच्या गावात अशी रानोमाळची  भटकंती सतत चालु आहे. त्यामुळे शिक्षणाची खुप हेळसांड होत असते. कधी आपल्या बकऱ्याकडे पासारी ( आधार ) म्हणुन आपल्या शिकत असलेल्या पोरांना शिकवायची  इच्छा असूनही आईबापाला नाईलाजाने शाळेतुन काढून बकऱ्याकडे ठेवावे लागते. कारण आम्ही आमच्या मेंढरांना आमची लक्ष्मी समजत असतो. व त्या मेंढरांच्या जिवावरच हे एका इताच पॉट भरीत असतो. आणि बकरी सांभाळणे हेच आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हाला जगवणारी आमची बकरी आणि त्या बकऱ्यांचा सांभाळ करणारा हा धनगर समाज.... शिकण्याची जरी खुप इच्छा असली तरी आमच्या जगण्याचा प्रवास अवघड आहे....

लावुन भाळाला भंडार
मुखी खंडोबाचा जयजयकार
करुनी अहिलेचे स्मरण
जगतो आमुचे जिवन
देतो जरीपटक्याला मान
भगव्याचा उरामधी अभिमान
पिवळ्या ध्वजाची राखतो शान
राजा शिवछत्रपती राजा महान
महाराजा यशवंतराव होळकर प्रेरणास्थान .......





समाजभुषण आदर्श  महाराणी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 



      आमच्या समाजात भंडार ( हळद ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा हे आमचं रानोमाळी हिंडत असताना मनातली भीती दुर करणार शक्तिशाली देवस्थान या देवाची साया ( सावली ) म्हणुन सतत भाळावर ( कपाळी ) लावला जातो. तसेच आमच्या समाजातील थोर महाराणी पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांची  शिकवण सतत मनात राहावी यासाठी त्यांची आठवण काढुन आम्ही आमचे जिवन जगत असतो...
       आमच्या समाजातील राजे महाराजे यांच्याही मनात जरीपटक्याला मानाचे स्थान होते त्याचप्रमाणे आमच्याही मनात जरीपटका आणि हिंदु धर्माचा भगवा ध्वज याला मान आहे. आम्हाला भगव्या ध्वजाचा अभिमान आहे. कारण याच भगव्या ध्वजाच्या सावलीत राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करत स्वराज्याची निर्मिती केली. त्या महान राजाचा सर्वांनाच अभिमान आहे.
       समाजाला एक करण्यासाठी पिवळ्या ध्वजाचे मोलाचे कार्य आहे. त्याच पिवळ्या ध्वजाची शान राखण्यासाठी हा धनगर समाज त्या पिवळ्या ध्वजाच्या सावलीत एकत्र येत असतो. महाराजा यशवंतराव होळकर हे आमचे प्रेरणास्थान  आहे.
        या सर्व देवी देवतांच्या वरदहस्ताखाली आणि महापुरुषांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आम्ही हे आमचे भटके जीवन आजही आनंदाने जगत आहे...


खंडोबाची राणी 
आमची धनगराची बानू 
नवसाची कन्या 
आम्ही देवदासी मानू 
देवदासी घाली जागरण 
हेची तिचे शिक्षण 
अशी तिला शिकवण 
देवाचे महात्म्य सांगी 
समाजाला हसवुन 
संगे वाघ्याची हो साथ 
घाटी दिमडीचा नाद 
गीत देवाचे गाऊन 
करी कथा देवाची कथन 
देवदासी हो नाचुन 


     हिंदु धर्मात खंडोबा हे आराध्य दैवत मानले जाते व देवाची कृपा राहावी यासाठी घरोघरी जागरण घालतात. या जागरणात वाघ्या मुरुळी देवाची कथा नृत्य व गायन करून लोकांच्या समोर मांडले जाते. देवदासी व वाघ्या यांना या नृत्यांचे व गायनाचे शिक्षण दिले जाते. व नंतर त्या विद्येत ते पारंगत होऊन देवाचे महात्म्य समाजाला सांगत असतात. तसेच समाजाची करमणूक त्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे देवावरील भावना समाजात खोलवर रुजली जाते.
   वाघ्या हा देवाचा अवतार समजला जातो. आणि मुरुळी ( देवदासीला ) देवीसामान मानले जाते. हे खंडोबा देवाचे सेवेकरी असतात. ते घाटी दिमडी हे वाद्य वाजवून गीत गातात. व देवाची कथा समाजापुढे मांडतात. 
       खंडोबा हा देव आमच्या बानुसाठी धनगर झाला व तिला आपली राणी बनवली . आमच्या समाजात आजही अनेक प्रथा पाळल्या जातात. जर मुल होत नसेल तर खंडोबा देवाला नवस केला जातो... आणि नवसाने पहिली मुलगी जन्माला आली तर ती देवाची म्हणून तिला देवाला जागवण्यासाठी देवदासी ( मुरुळी ) समजली जाते....


धनगराची देवावरी श्रद्धा थोर देवासाठी एकत्र जमती लहान थोर करावा शिक्षणाचा प्रचारहोईल धनगर समाजाचा उद्धार जीवन होईल सुखकर जीवन होईल सुखकर 

   धनगर समाज हा श्रद्धाळू फार आहे. व त्याची देवावर मोठी श्रद्धा आहे,  यासाठी ते  दूरदुरून एकत्र येतात. तेव्हा या एकत्र समुदायाला शिक्षणाचे महत्व समजावून सांगुन त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या तर धनगर समाजाचा उद्धार होईल. व त्यांचे जीवन सुखी होईल.


खडतर धनगराचे जीवन त्यात महत्वाचे वचन मुले वयाने ती लहान आले त्यांच्यावर बंधन ठरविले जाते हो लगीन बाशिंग पाळण्याला बांधुन 

     धनगरांचे जिवन हे खडतर आहे पण या धनगर समाजात वचनाला खुप महत्व असते. दोन घरात मुले ( मुलगा आणि मुलगी ) जन्माला आली असेल, त्या मुलाचं लहानपणी ( पाळण्यात ) लग्न ठरवले जाते . म्हणजे पाळण्याला बाशिंग बांधुन लग्न लावलं जात. 


मुले मोठी झाली वयान
पूर्वीच्या वचनाची मला जाण
माझी कन्या आता तुझी सुन
वयानं अजुन लहान
सांभाळ तु प्रेमानं
तुमचीच आता शिकवण
नाही झाले हो शिक्षण
जपा तिला लेकीप्रमाण 


   मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना वचनाची जाणीव होऊ लागते. आणि मुलीचे वडील मुलाच्या वडिलांची भेट घेऊन माझी मुलगी आता तुझी सून झाली आहे याची जाणीव करू देतो व प्रेमान तिचा सांभाळ करा. कारण ती अजुन लहान आहे तिला संस्कार शिकवा ती नासमज आहे. तीच अजुन शिक्षण झालेलं नाही. असे वचन देऊन मुलीचं लहानपणी लग्न करून देतो.


असे हो धनगरी जीवन 
नाही घेता येत शिक्षण 
पण झाली आहे आता जाण 
समजले शिक्षणच आहे महान 
खडतर जगेल स्वतःचे जीवन 
आणि देईल मुलांना शिक्षण 
द्यावे मला वचन 
माझ्या या समाजान
लहान वयात नाही करणार लगीन 
आणि मुलांना मी शिकवीन 
करील अंधश्रद्धेच निर्मुलन 
देवावरी श्रद्धा ठेऊन 
एकत्र समाज करीन 
त्यातुनी समाजाचा विकास साधीन 
धनगर पाळतो वचन 
करील पूर्ण मुलांचे शिक्षण 
समाजाच्या  विकासासाठी एकत्र येईन .....


     धनगर जीवन फार वेगळे आहे. या समाजासाठी शिक्षण घेण्यासाठी फार अडचणी येतात. पण त्यांना या शिक्षणाची जाणीव झाली आहे.  कि शिक्षणाला आता महत्व आहे.  स्वताचे जिवन असेच अवघड जगु पण आपल्या मुलांना शिकवु ....
    मी वचन मागतो कि, माझ्या समाजाला  लहान वयात मुलांचे लग्न करू नका. त्यांना शिकवा. देवावर श्रद्धा ठेवा परंतु तिचे रुपांतर अंधश्रद्धेत होऊन देऊ नका. देवावर श्रद्धा ठेऊन एकत्र या कारण ते आपले एकत्र येण्याच मुख्य ठिकाण आहे. आणि या एकत्र येण्याचा फायदा समाजाला जागृत करण्यासाठी करा. त्यातून आपला समाज सुधारून या भटक्या जीवनातून थोडासा मुक्त होऊन स्थिर जिवन जगेल.......
    मेंढपाळ हा आपला पिढीजात व्यवसाय आहे.  आणि तो आपण जपला पाहिजेच. कारण तीच आपली ओळख आहे. परंतु बाहेरचे जग पहा. व आपले शत्रु  व मित्र ओळखा.. आणि आपले जिवन चांगल्याप्रकारे जगण्याचा प्रयत्न करा. 

© लेखक : राहुल दादा बिचकुले
(लेखन प्रपंच २०१३ )  

     धनगर समाज आज बदलतोय आणि जुन्या विचारांच्या जोखडातून मुक्त होत आहे. तरीसुद्धा आज त्यांना समाजप्रबोधन आणि शिक्षणाची गरज आहे. जुन्या विचारांचा आदर करा परंतु नवीन विचार आचरणात आणा. वादविवाद, मतभेद , गरीब श्रीमंतीची दरी बुजवून समाजाचा विकास साधा.....


धनगर समाज प्रेरणास्थान 
श्री महाराजा यशवंतराव होळकर 





1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...