ध्येयाची या केली पेरणी
कविता, कथा, लघुकथा, प्रसंगवर्णन, प्रवासवर्णन, चारोळ्या आणि विचार यांचा संमिश्र संगम.....
रविवार, २६ डिसेंबर, २०२१
सावलीचा आधार
उघडं बोडकं उजाड रान डोईवर तापतंय ऊन वारा सुटेना काही गार कुठे भेटेना सावलीचा आधार कसा बदलला हा काळ एकेकाळी होता सुकाळ आज पडला का दुष्काळ माणसाच्या कर्माची ही फळं बांद बांधुरे राहीले ना नीट झाड दिसेना दुरवर कुठं होती झाडे थोडीफार पण माणुस स्वार्थी फार चार पैशासाठी तोडली झाडं ना ठेवली बुंधा ना खोड आता झाडं लावण्या नाही सवड पण निसर्गाच्या ताकदीला नाही तोड नाही पडणार पाऊस इथं झाडं नसतील जिथं जिथं पक्षी होतील हद्दपार किडं खातील शेत शिवार जातील निघुन मधमाश्या फळ पिकांची होईल दुर्दशा नका ठेऊ तुम्ही आशा विकासाची सोडा आता भाषा विकास संपेल निसर्ग कोपेल मग येतील मरण कळा संपेन निसर्गाचा जिव्हाळा म्हणुन सांगतो ऐका निसर्गाला तुम्हींहो जपा ताकद मोठी निसर्गाची परीक्षा नको निसर्गाची तुम्ही लावा भरपुर झाडं नाही दिसणार उघडं बोडकं शिवार धरणी दिसेल हिरवीगार पक्षी येतील इथेहो फार नाही कीड पडणार पिकावर पिके येतील जोमदार मधमाश्या गोंगावतील बहरतील फळं नी फुल हि आहे निसर्गाची कमाल हे आहे झाडांचे मोल समजून घ्यावं आता थोडं प्रत्येकांनी लावावी झाडं नाही लागणार आता ऊन हिरवीगार दिसतील रान गोंगावेल वारा गारगार नाही लागणार शोधावा सावलीचा आधार नाही लागणार शोधावा सावलीचा आधार वृक्षमित्र कवी : राहुल दादा बिचकुले हरितवारी फाउंडेशन नाथ देवराई फाउंडेशन माणकोबा वाडा तसेच सर्व वृक्ष प्रेमींना हि कविता सहृदयी समर्पित ... झाडे लावा झाडे जगवा, धरणी माईला हिरवा शालू नेसवा....
व्हय म्या तुळसा
व्हय म्या तुळसा
कमरी घेऊन कळसा
चालते बाई झपझप
डोईवर तळपतो सूर्यदेव खुप
पायी पैंजण
करी रुणझुण
कशी डुलते झुलते
देहाची कमान
चाल रुबाबदार
कमरी घागर
शोभते गवळण
चपळ नार
उन्हाच्या झळा
अंगी झेलते
तप्त अंगार पायी
तुडवीत चालते
मुखी हावभाव
जणु मुरलेली सुगरण
सुगरणीला देईल तोड
असं आहे हे वागणं
व्हय व्हय म्या तुळसा
कमरी घेऊन कळसा
चालती झपझप वेगानं
भागविण्या तहानलेल्याची तहान

कवी : राहुल दादा बिचकुले
हल्ली प्रेमात खुप पडायला लागलेत
हल्ली प्रेमात खुप पडायला लागलेत
याच कारण समजेना झालय
प्रत्यक्षात न भेटताही
प्रेम उतु आलय
सोशल मिडिया खुपच प्रभावी
बोलण, व्यक्त होण, भेटण
खुपच सोईच झालय
त्यामुळे जग सार जवळ आलय
याचा वापर कशासाठी करावा
हेच समजेना झालय
ध्येय राहिलं बाजुला
जगण व्यस्त झालय
पुस्तक वाचतांना
अभ्यास करतांना
वाजते मोबाईलची बेल
राहवत नाही मनाला
कारण मन आहे चंचल
काचेवरून बोटे फिरवायची
एकमेकांना न भेटता बोलायची
गंमत खरच आहे भारी
विसरून गेलो आपण
हि दुनिया आहे भुलवणारी
आजकालच्या हाय बाय ने
मनात घर केलय
रोज येतो मॅसेज
म्हणुन परकंही
आपलसं झालय
दुरूनच पाहण
दुरूनच बोलण
याने मनाला भुरळ घातली
चित्रातून व्यक्त होण
स्टेट्स द्वारे मुड सांगण
याने तर कमाल केली
न बोलताही
मनातलं सांगता आलं
मनाला जिंकता आलं
आता राहिलं तरी काय ?
आजच्या घडीची
खरी प्रेमाची सुरुवात हिच हाय…
मॅसेजने सुरुवात झाली
फोटोमुळे मनात रुजली
व्हिडीओ कॉलने जागा घेतली
मने एकमेकांपाशी व्यक्त होऊ लागली
मनातलं हितगुज
आता कुजबुजु लागलं
सोशल जीवनातही
प्रेम बहरून आलं
बोलण चालण बदललं
आता भेटी होऊ लागल्या
प्रेमाच्या भावना
उफाळून येऊ लागल्या
कधीच न भेटलेली माणस
एकमेकांची झाली
रोज जवळ असणारी
मात्र दुरावू लागली
कसं असत हल्लीच प्रेम
जे आपले नव्हते
त्यांच्याशी नव्याने नात जोडलं
जे आपले होते
त्यांच्याशी मात्र
कायमचं नात तोडलं …..

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
झाडाशिवाय नाही जगणं
सर्वांनी बोलतं व्हा
झाडांविषयी बोलत रहा
सतत जो विचार कराल
तोच आचरणात येईल
स्वतः प्रेरित व्हाल
आणि दुसऱ्यांना प्रेरणा द्याल
कारण प्रत्येका जवळ एक उमेद असते
नवं काहीतरी करण्याची क्षमता असते
मनानं ठरवलं तर काहीही करू
पण आधी ठरवलं पाहिजे
स्वतःच्या मनावर बिंबवले पाहिजे
आपण करणार तरी काय आहोत
कारण जे कराल तेच शिल्लक राहील
त्यामुळं आपलं या विश्वात कुठेतरी नाव राहील
त्यामुळे जीवनात काहीतरी चांगलं करा
जीवन मिळालं तेव्हाच आपल्यावर उपकाराच ओझं लादलं गेलं
या निसर्गाचे आपण देणेकरी
त्यासाठी निसर्गाला काहीतरी देऊ
माणूस आहोत आपण
चला एकतरी झाड लावु…
निसर्गाचं एकच सांगणं
माणसा तुझं असं कसं रे वागणं
झाडांशीवाय नाही रे जगणं
नको तोडुस तु झाडं
झाडे लावुन वाढव
झाडं आहे रे माऊली
देते उन्हात उभे राहुन सावली
झाड देते रे बरंच काही
आपुलकी ठेव झाडांविषयी
अजरामर होईल तुझं नाव
जीवनात एक तरी झाड लाव…..
शेअर करा. चांगला विचार करा.
गावागावात एक होऊन वृक्षारोपण करा…
© राहुल बिचकुले
कवी- राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
स्त्री जन्म का नकोसा झालाय....
कोणतं पाप केलं ग माई
झाली जन्मा येण्याची घाई
मुलीचा गर्भ दिसता आई
तुझी माया विरून जाई
तुझा जन्म कोणता आई
का तु स्त्री जन्मा आली नाही
किती मायाळू तुझी ग आई
का झाली नाही कसाई
कसं दाखविले तुला हे जग
तु थोडं आईसारखं वाग
कसं झालं माझं तुला ओझं
पोटच्या गोळ्याला सोडताना
का हेलावलं नाही काळीज
माझा बाप ग कोण
त्याला जन्म नाही दिला का आईनं
का इतकी स्त्री जन्माची चीड
सोबती म्हणुन स्त्रीची कशी ग आवड
स्त्रीविना पुरुषांच जिवन अधुरे
तरी स्त्री जन्म का नकोरे
मुलगी येता जन्माला
मारून टाकती गर्भाला
मुलगा मुलगी समान
तरी का नाही राहिली जाण
कोणतं पाप केलं मुलीनं
येतं जन्मआधीच मरण
स्वतःला पहा त्या गर्भाच्या जागी
कळेल तुम्हाला त्या मरण कळा
स्वतःच्या क्षणिक सुखासाठी
तोडता मायेचा जिव्हाळा
मिळाला तुम्हाला मनुष्य जन्म
तुमच्या पुण्यवान नशिबानं
प्रगती केली विज्ञानानं
भरता पापाचे रांजण
मुलगी सांभाळण्याची
नसेल तुमची औकात
नका पाहु तुम्ही गोड स्वप्न
लाभूदे स्त्री जन्माची साथ

यवत, ता. दौंड, जि. पुणे.
स्त्री भ्रूणहत्या हा विषय जरी ऐकला तर मन हेलावतं कशी निर्दयी मनुष्याची हि जात कशी स्त्रीच्या पोटी जन्माला आली. देव जाणे…
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
स्त्री भ्रूणहत्या हा विषय जरी ऐकला तर मन हेलावतं कशी निर्दयी मनुष्याची हि जात कशी स्त्रीच्या पोटी जन्माला आली. देव जाणे…
शेतकरी समजुन घ्यायचा आसल ना
शेतकरी समजुन घ्यायचा आसल ना
तर रानात राबावं लागतं
उन्हातान्हात काम करून
घामाचं टिपूस गाळावं लागतं
उगाच नाही म्हणत
जगाचा पोशिंदा
दिस उजाडत नाही म्हणुन
कुस बदलतो कितींदा
उन्हात काम करताना
पाय पोळतं
पाण्यातून चालताना
काटं बोचतं
इचुकाटे किती तुडवत असेल
याचं त्याला भान नाही
स्वतःपरीस पिक मोलाचं
कारण कठोर त्याच मन नाही
शेतकरी हळव्या मनाचा
रानातलं घाईच काम
जोवर होत नाही
तोवर भाकरीचा घास
घशाखाली जात नाही
रात दिस त्याला सारखीच असते
तसा उन्हाळा पावसाळाही सारखाच
उन्हाळ्यात पिक जळतं
पावसाळ्यात पाण्याखाली जातं
चिंता काही मिटत नाही
कष्ट फार करतो
पण डोईवरचं कर्जाच ओझं
काही केल्या फिटत नाही
स्वतःबरोबर आख्या संसाराला
आशेला लावतो
चांगल्या दिसणाऱ्या पिकासाठी
जवळच्या धनाचा जुगार लावतो
नाहीच बसला डाव तर
जीवही पणाला लावतो
मातीला माय म्हणतो
रात दिस सेवा करतो
डोईवरचं ओझं उतरत नाही म्हणून
काळ्या आईला सावकाराच्या घशात घालतो
आता हाती काही उरत नाही
माय असताना सोबतीला
संसारात काही पुरत नाही
जरी असला जगाचा पोशिंदा
तरी जग विचार करत नाही
संकटाशी दोन हात करणारा
डोईवरच्या ओझ्याखाली दबला जातो
जवळ राहत नाही काही
म्हणुन तो शेतकरी ठरत नाही
आता बोलणार कुणाला
म्हणुन तो अबोलच राहतो…
कवी - राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
मकर संक्रांत
मकर संक्रांत
निसर्गाने जीवसृष्टीला दिलं एक वरदान
आला आला मकर संक्रांतीचा सण
सूर्याचे झाले मकर राशीत आगमन
सुरू झाले आता उत्तरायण
आता होईल अंधारातून प्रकाशाकडे प्रयाण
सूर्य करील अंधकारावर आक्रमण
देवही होतील जागे झोपेतून
धुरकट अंधुक भयदायक जिवन
नेई माणसाला मृत्यूकडे ओढून
उत्तरायणात यावे तेजस्वी प्रकाशमय मरण
जप करिती हिंदु धार्मिक महान विद्वान
संक्रांती म्हणजे संघ क्रांती महान
संघटनेत होईल मोठी शक्ती निर्माण
विजय मिळविणे नाही कठीण
घ्यावी स्नेहीजनांची भेट
हाती तीळ गुळाचे ताट
द्यावी मनाची स्निग्धता हृदयाचा गोडवा
मैत्रीच्या नात्यात आपुलकी वाढवा
निसर्ग नियमानुसार येती वनस्पती फळ
उपटून टाकती रोगराईचे मूळ
स्नेह देतो तो तीळ
गोडवा निर्माण करतो गूळ
तीळ गुळाचा लाडु केला
स्नेहीजनांना तो दिला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
दुखवू नका कोणाच्या मनाला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
दुखवू नका कोणाच्या मनाला!!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….!!!
- राहुल बिचकुले, माझीलेखणी.com
लक्ष्य असे असावे मोठे
लक्ष्य असे असावे मोठे
इतरांना ही हेवा वाटे
जरी असतील वाटेवर काटे
पुढे चालतच रहावे
अनेक भेटतील या वाटेवर
कुणी अडथळा बनेल
कुणी साथ निभावेल
विचार याचा ही करावा
पण मार्ग आपला ना सोडावा
जिवनाची वाटच खडतर
कुठे नसे आधार कुठे असे आधार
आपणच निर्माण करावा आधार
करावा नवा मार्ग साकार
पुन्हा येतील अनेक आपल्याच मार्गावर
पोहचतील तेही यशाच्या शिखरावर
तेव्हा आठवेल त्यांना
कोण पुढे हा गेला
ज्याने मार्ग दखविला
असा आहे तो थोर
आदर्श माझ्या समोर
कवी - राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
जीवनाच्या वाटेवरून चालताना
जीवनाच्या वाटेवरून चालताना
वळुन मागे पाहायचं नसतं
चांगल्या वाईट आठवणींची शिदोरी
सोबत घेऊन जगायचं असतं
पुढे चालताना नजर शिखराकडे ठेऊन
पुढे पुढे चालायचं असतं
येतील आडवी संकटे
खाचखळगे आणि काटे
चुकवत तुडवत चालायचं पुढे
कारण जिवन बिंधास्त जगायचं असतं
भरोसा स्वतःवर ठेवा
आत्मविश्वास दुनावत जाईल
आडवी येऊद्या कितीही संकटे
रस्ता निघतच जाईल
नको भीती संकटाची
अहंकार तर मुळीच नको
यशाने हुरळून जाऊ नका
अपयशाने खचुन
जिद्द ठेवा मनी
दाखवा यशाचे शिखर सर करून
उंच गेला म्हणुन
मातीला विसरू नका
हवेत जरी तरंगता येत असलं
तरी मातीशिवाय जगता येत नाही
हे विसरू नका
जीवनात पुढे पुढे चालत रहा
मागे वळून पाहु नका
चांगल्या वाईट आठवणींची शिदोरी
सोबत घेऊन चालत रहा
सोबत घेऊन चालत रहा….
कवी. राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
ऑनलाइनचा जमाना आला
ऑनलाइनचा जमाना आला
आणि माणुसच बदलून गेला
पूर्वी तोंडभरून बोलायचा
आवर्जून भेटायचा
पण हल्ली बदल झाला फार
भेटणं, बोलणं राहिलं बाजुला
व्यक्त होण्यासाठी फक्त चित्राचा वापर
विज्ञानाने प्रगती केली
आणि माणुसकी कमी झाली
साध्या मोबाईलचं परिवर्तन
अँड्रॉईड फोनमध्ये झालं
कॉलिंग झालं कमी
आणि चॅटिंग आलं
कोण कोणाशी गप्पा मारतोय
हे कळेना झालंय
मनातील भावना व्यक्त करणं
यासाठीसुद्धा चित्र आलंय
स्टेट्स मूड सांगतो
हॅप्पी का अनहॅपी
पण प्रत्यक्षात मात्र वेगळं असतं
जसं दिसतं तसं नसतं
जरी असलं दुःख
तरी मनात दाबलं जातं
उगाच आणलेलं आनंदाचं आव
मात्र ओसंडून वाहतं
हे सोशल मीडिया
खुपच सोशल आहे
समोरच्याला भावनिक बनवता येतं
इतकं स्पेशल आहे
आपण कसेही असेना
पण सगळं काही सुंदर दाखवता येतं
मनातले डावपेच मनात दाबुन
समोरच्याला गंडवताही येतं
खोटं तर खुप बोललं जातं
इमोजी दाखवून भावनिकही होता येतं
असा आहे हा ऑनलाइनचा जमाना
कुणी कुणाला भेटेना
भेटणं राहिलं दूर
दोन शब्द सुद्धा बोलेना
शेजारी बसलं तरी
मोबाईल मध्ये पाहतय
काही विचारलं तरी
न पाहता होकार देतंय
चॅटिंग द्वारे बोलतंय
व्हिडीओ कॉलद्वारे पाहतय
जवळ आल्यावर मात्र
लांबुनच जातंय
असला कसला ह्यो जमाना आलाय
आणि माणुसच ऑनलाइन झालाय
ऑनलाइनच्या दुनियेत मात्र
विज्ञानाने कमाल केली
माणसाची माणुसकी मात्र
इथे सारी कमी झाली…
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
सखे
सखे… सखे
तुझी आठवण फार येते
तू नसते जेव्हा सोबत
पण डोळ्यासमोर चित्र उभे राहते
आठवतात रोजचे दिवस
आठवते तुझी सोबत
तुझा सहवास जणु
गुलाबाचे फुल
मऊ मुलायम स्पर्श
आणि मोहक अदाकारी
सतत आठवते
आणि मन भेटीसाठी व्याकुळ होते
तुझी हवी सदा सोबत
आज, उद्या आणि कायमची
हिच साथ ग जन्मोजन्मीची
नको दुरावा
नको ग रुसवा
तुझ्याविना दिवस सरकत नाही
तु थोडी दूर जाता
मन व्याकूळ होई
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
म्होरपं
मेंढराच्या खांडात एकतरी म्होरपं असतं..
म्होरपं म्हंजे म्होरक्या-पुढारी-नेता-तर सदर पुढारी नर किंवा मादीही असु शकते..
नर असेलतर त्याला आधीच खच्ची केलेला असतोय..म्हंजे नसबंदी. तर मेंढराचा मेंढका(मालक)(पालक) त्याला थोडीशी भाकर रोज चारतो..मग ते तथाकथीत म्होरपं भाकरीच्या तुकड्याच्या आशेनं मालकाच्या मागं मागं हिंडत असतय..बाकीची मेंढरं बिन भाकरीची त्या म्होरप्याच्या मागं हिंडत्यात..
मालक म्होरप्याच्या गळ्यात घुंगराचं चाळ घालतो..म्होरपं खुश व्हतय..इमानदारीत मालकामागं नेईल तिकडं चालत तर कधी पळत जातय..
म्होरपं जुनं झालं की नवं म्होरपं तयार केलं जातय..जुन्याला खाटकाच्या हवाली केल जातय…
राजकारण "समाजकारण"सगळीकडं म्होरपे असत्यात फक्त तुमच्या डोळ्याची आण मेंदुची अवस्था ठिक असावी..
म्होरपं ओळखता आलं पाहीजे..

लेखक - आनंद नामदेव कोकरे
दिवे ता.पुरंदर
जय जवान जय किसान
वंदन भारतभूमीला
वंदन भारतमातेला
भारतमाता, राष्ट्रध्वजाला
करितो वंदन
शूरवीर जवान अन्नदात्या किसानाला
भारतमातेचे दोन पुत्र
देशसेवेत वाहुन घेती स्वतःला
एक वाचवितो देश भूमीला
एक जगवितो देशाला
हिमगिरी सागरकिनारी
असो कोणती प्रसिध्द नगरी
या भूमीत पाय ठेवील काय वैरी
करुनी छाताडावर बंदुकीची फैरी
गाडील मातीत दुश्मनाला
सलाम या भारतमातेच्या सुपुत्राला
शूरवीर जवानाला
मातीमध्ये गाळूनी घाम
करितो कष्टाची कामं
करुनी रक्ताचं या पाणी
पिकं पिकवितो मोत्यांवाणी
असा जगाचा पोशिंदा शेतकरी
जगवितो साऱ्या जगाला
सलाम या भारत मातेच्या सुपुत्राला
अन्नदात्या किसानाला
तुम्ही आम्ही देशाचे सुपुत्र
देशासाठी कार्य करू
देशसेवा जागी ठेऊन मनात
देशसेवेत वाहून घेऊ
करू देशाच्या जवानांचा आदर
देऊ जगाच्या पोशिंद्याला आधार
करुनी सलाम भारतमातेला
देश सेवेत वाहून घेऊ स्वतःला
भारतभूमी आमुची शान
जय जवान जय किसान
चला करू एकच नारा
करू सुंदर भारत देश हा सारा
जय हिंद.... जय महाराष्ट्र...

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
यशाच्या वाटेवरील वारकरी

ध्येय माझे पंढरी
विठु ध्येयाच्या शिखरी
मी यशाच्या वाटेवरी
आहे ध्येयवेडा वारकरी
संप्रदाय आहे शिक्षण
अभ्यास माझा भजन कीर्तन
आणि प्रवचन
अभ्यासात रमवितो मन
सदा ध्येय शिखाराचेच ध्यान
करणे विद्या धारणा
समजाविणे या मना
जाणे आहे अजुनी दुरवरी
आहे तू विध्यार्थी
यशाच्या वाटेवरील तु वारकरी
यश आणितो उत्साह
अपयश थकवा
तेव्हा मनाला सावरा
पोहचायचे आहे ध्येय शिखरा
तु यशाच्या वाटेवरील वारकरी
तुझे ध्येय असुदे पोहोचणे शिखरी
नको घेऊस माघार
सापडेल ध्येयाची पंढरी
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
एक झाड
एक झाड
बाबाहो मी एक झाड
माझ्यापाशी द्यायला आहे तरी काय ?
जरी मी आता देऊ शकलो नाही तरी
मी देऊ शकतो बरच काही
बालपणी माझी कुवत
असते छोटीसी
पण दान करण्याची परंपरा
विसरलेलो नाही.
मी देऊ शकतो अन्न
मी देऊ शकतो सावली
भागेल तुमची भुक
आणि विसावा मिळेल तुम्हाला
अरे मी देऊ शकतो ऑक्सिजन
ज्याने वाचेल तुमचे जीवन
मी देऊ शकतो निवारा
मिळेल सजीव सृष्टीला आसरा
मीच बहरवू शकतो सृष्टी
मी बरच काही करू शकतो
नुसत्या सांगत नाही गोष्टी
फक्त माझा एक वाईट गुण आहे...!
मी देऊ शकतो
पण माणसापासून
स्वताला वाचवू शकत नाही...!
मी आजवर खुप काही दिलं माणसासाठी
पण माणूस आजही केपटात माझ्या
घालतो आहे धोपाटी
स्वताच्या हाताने
स्वताच्या पायावर
कुऱ्हाड मारून घेत आहे माणुस
जेव्हा झाड म्हणुन
माझे अस्तित्व राहील
तेव्हाच जंगल अस्तित्वात राहील
जंगल राहिले तर
इतर सजीव सृष्टी जागेवर राहील
जर नाही राहिले
जंगलाचे अस्तित्व तर
तेही मानववस्तीत येईल
मग काय ?
ठरलेलच आहे... अस्तित्वाची लढाई
माणूस आणि पशू लढत राहतील
माणसाच्या वस्तीचीही
सिमेंटच्या जंगलासारखी
स्मशानं होतील....
आणि संपेल मग सार
संपेल माणुस अवतार
पण ज्याची करणी
त्यालाच भरणी येईल
माणुस जाईल संपून
स्वार्थी सजीवसृष्टी संपुष्टात येईल
आणि पुन्हा निसर्ग
नवीन भरारी घेईल
मातीत गाडलेल्या बिजाला
नवा अंकुर फुटेल
माणसाने निर्माण केलेल्या
सिमेंटच्या जंगलात
निसर्ग निर्माण होईल
तेव्हा माणसाचा पराजय
आणि निसर्गाचा विजय होईल....
नको हि भविष्यवाणी खरी ठरायला
यासाठी माणसा आताच तयार हो....
घेऊन नवी रोपटी हाती
झाडांचे अस्तित्व जपायला शिक
नको निसर्गात करू हस्तक्षेप
नाही होणार मग
निसर्गाचा कोप
आहे त्यातच रहा समाधानी
काहीतरी द्यायला शिक
माणसा तु निसर्गावाणी
नको होऊस गड्या तु स्वार्थी
शेवटी देह निसर्गाची देण
होईल त्याची माती
हि संधी फक्त जीवन जगण्यापुरती
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
रानवाटा
गावाकडच्या रानवाटा
दूर दूर जाती
फुटले जरी फाटे
जोडून आहे नाती
कुठं दुरवरी
उंच डोंगरी
हि वाट कुठवर जाती
ना थांग अशीच हि भटकत राहती
किती सुंदर हि वाट
सोबती निसर्ग
हिचा वेगळाच थाट
वृक्ष वल्लरी आहे सोबती
मनाला आनंद हि देती.
अशा या गावच्या रानवाटा
रानावनात विखुरलेल्या
जरी जाती या दुरवरी
जोडून आणती माणसाला
थंड हवेची झुळुक
मधुर मातीचा तो गंध
कधी लागती उन्हाच्या झळा
आठवतो गावचा जिव्हाळा
अशा या सुंदर रानवाटा
जरी काट्याकुट्यांनी भरलेल्या
शहरी डांबरी रस्त्यापेक्षा
मायेने मोहरलेल्या

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
शेतकरी जगाचा आधार
दिस आला माथी
बाप करतोया घाई
नाही गेलो शेता लेका
जग उपाशी ते राही
जगाचं ते पॉट
आहे आपल्याच हाती
कष्ट केल्यावर आपुन
काळी आई सोनं देती
नाही बसुन चालायचं
सपान बांधलं उराशी
जगाचं हे ओझं पाठी
कुणी राहो ना उपाशी
संकटं ती किती
येती आणि जाती
तरी माघ हटायच नाही
आपुन पिकवायची ही शेती
कितीही होऊदे दुःख
नको वाकडा विचार
कर्तव्य हे आपलं
आपुन जगाचा आधार
आपुन जगाचा आधार
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत ता. दौंड, जि. पुणे.
आज ते रेडीओ दिवस का काय हाये..
आज ते रेडीओ दिवस का काय हाये..
रेडीव" तसा आमच्याकडं आंम्ही साळत होतो तवापस्नं होता,टेप" आण रेडीव" एकाच खोक्यात होता क्याशीटं आयकायचा कटाळा यायचा,आण सारखी सारखी नवी क्याशीटं आणाय पैसं नसायचं मग निळ्या शिलांवर आमचा रेडीव चालु रहायचा,माझ घर माझ शेत सुरवातीच्या म्युझीकसहं आठवतय..दिवस मावळता गाणी लागायची ..चालु जमाना ही कौटुंबीक श्रोतीकाबी लागायची…एम आकाशवाणी प्रवाचकाह बलदेवानंद सागराह, हे येवढच संस्क्रुत आंम्हाला पाठ झालं,आता ह्या बलदेवानंदांना भेटायची आजही ईच्छा आहे,सकाळी पहाटच रेडीव लावला की आधी चि …ईईईई असा आवाज यायचा आण मंग टुळुळू टुळूळूळू अस संगीत चालु व्हत रेडीवचा दिवस चालु व्हायचा..मग भक्ती संगीत, आण मधीच जाहीरातीबी असायच्या..चंगा.. चंगा ..चंगा चंगा चहा तुमचा आमचा चंगा चहा…मानके हेअरींग सर्वीस ..दुर्वांकुर डायनींग हॉल..अशा एक ना अणेक मायंदाळ्या जाहीराती असायच्या….दिवसभर न कटाळता रेडीव अखंड बडबडत रहायचा…शेवटी ते शास्रीय संगीत रात्री ऊशारा लागायचं ,त्यात राग अमका- तमका..मग ते ह्या..ह्या…ह्या….ह्या हा…हँ ..असलं राग असायचं राग म्हंजी काय हे कधीच कळलं नाय…रेडीव वरच्या लोकांनला दिवसभर वरडुन बडबडुन राग आला की सांच्याला अशी ईवळत्यात असा आमचा तवाचा समज…
शिलं ऊतारली की चुलीत वाईच भाजायची, परत पावर येती असं कुनीतरी सांगीतल्यालं आंम्ही बर्याचदा चांगल्या निखा-याच शिलं भाजली पण बिचारी चार्जींग कवाच झाली नाहीतं…
नंतर तिसरीतुन आमचं प्रमोशन मेंढराकडं झाल्याव खीशात बसन असा सत्तर रुपायाचा बारका रेडीव तिंचार वर्ष वापरलं..
बरेच दिवस लिहावं वाटत न्हवतं आज रेडीवचा बड्डे म्हणुन लिहीलं…..।

आनंद नामदेव कोकरे
दिवे ता.पुरंदर जि.पुणे
व्हॅलेंटाईन डे
आवडते तू मला
पण कुटुंब माझंही आहे
प्रेम करतो तुझ्यावर
पण कुणीतरी माझ्यावरही
प्रेम करत आहे
काही महिने झाले असतील
तुझ्या माझ्या भेटीला
काय जादु झाली
अन ओढ लागली मनाला
भेटी गाठी होत गेल्या
आणाभाका ही झाल्या
शेवटपर्यंत देईल साथ
अशी आश्वासन ही दिली
याच आश्वासनापोटी
नाती सारी विसरून गेली
ना विचार केला तु
ना विचार केला मी
जमेल आपली जोडी
हे मलाही मान्य आहे
प्रेम व्यक्त करून
तुला जीवनभर साथ
देण्यासाठी मीही तयार आहे
पण माझा विश्वास डळमळतो
तो मला सांगत आहे
आजवर साथ दिलेले कुटुंब
याचा तुम्ही विचार करत नाही
तर काही महिन्यांची भेट तुमची
जीवनभर कशी टिकून राहील
किती विश्वास असतो प्रेमात
प्रेमाचा मलाही आदर आहे
आपण करतो ते प्रेम
मग आईवडील कुटुंब यांनी
आपल्याला जपले ते काय आहे
प्रेम जरूर करा
व्हॅलेंटाईन डे ही साजरे करा
त्याआधी थोडासा विचार करा
आपल्यावरही कोणीतरी
प्रेम करतंय
आपल्यासाठी आयुष्यभर
मर मर मरतय
चार दिवस जीव ओवाळून टाकणारे
अनेक भेटतील
गुलाब देऊन प्रेमाचे शिखर
सहजपणे गाठतील
पण आपलं आपुन ठरवा
ज्याने आजवर जीव लावला
त्याचे आधी व्हा

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
फुलपाखराचे मनोगत (निबंध)
फुलपाखराचे मनोगत (निबंध)
जिवन माझे इतुके
तरी आनंदी जगते
असते सौंदर्याची भीती
तरी स्वच्छंदी फिरते
मी फुलपाखरू माझे जीवन थोडेसे आहे. वर्ष नाही, नाही महिने तर आम्ही फक्त काही दिवस जगतो. निसर्गाचे वरदान आहे जीवन थोडे आहे परंतु अमाप सौंदर्य बहाल केले आहे या सौंदर्याचा आम्हाला गर्व होत नाही. मस्तपैकी कोषातून जन्म झाल्यानंतर आम्ही झाडांच्या पानाच्या गादीवर मस्त पहुडलेलो असतो. हळूहळू पंख येतात त्याबरोबर सूर्यकिरणांनी जणु सप्तरंगी रंगांची मुक्तहस्ते उधळण करून आम्हाला अंघोळ घातलेली असते त्यामुळे जणु काही आमच्या सौंदर्यात अनेक रंग भरून आम्ही विविध रंगी मनमोहक रुपात जगासमोर प्रकट होतो..
आमचा जन्मच मुळी आपण आनंदी राहायचे आणि इतरांनाही आनंदी ठेवायचे यासाठी झालेला आहे. दिवसभर या फुलावरून त्या फुलावर भटकत राहायचे मस्त मधुरस चाखायचा, फुलांच्या गादीवर बसायचे आणि दुसऱ्या फुलांवर जात असताना परागकण घेऊन सोबत जायचे त्या फुलांच्या जिवनातही आनंद पेरायचा म्हणजे आपणही आनंदी राहायचे आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवायचे यासारखे दुसरे समाधान मिळत नाही.
लहान मुले आम्हाला खुप आवडतात एखाद्या सुंदर बागेत आम्ही हुंदडत असतो तेव्हा ही मुले आम्हाला धरण्यासाठी आमच्या पाठीमागे दुडुदुडू धावतात आणि आम्ही त्यांना चकवत शिवणापाणी खेळ खेळतो. कधी चुकून त्यांच्या हाती लागलो तर खुप भीती वाटते परंतु ती निरागस गोंडस बालके आपल्या मऊशार हाताने अलगद पकडतात आम्ही त्यांना खुप आवडतो त्यामुळे ते आम्हाला सोडायला तयार नसतात पण पुन्हा अलगद फुलावर सोडून देतात. खुप काळजी घेतात. कधी चुकून अपघाताने आम्ही चक्कर येऊन पडलोच तर हिच लहान मुले आम्हाला उन्हातून सावलीला झाडांच्या पानावर नेऊन ठेवतात.
बागेतून फिरताना खुप मजा येते अनेक रंगाची वेगवेगळी फुले फळे त्यातून चाखायला मिळणारा स्वादिष्ट मधुरस मनाला मोहून टाकतो. आणि जीवन थोडेसे आहे याचा विसर पडून जगण्यासाठी बळ मिळते.
माणसाला माहीत झाले आहे की आमच्यामुळे सृष्टीला नवचैतन्य प्राप्त होते. त्यामुळे तो आमची खुप काळजी घेतो. आज आमच्यासाठी माणसाने उद्याने, बागा तयार केल्या आहेत. ज्यामध्ये आम्ही मनसोक्त खेळू बागडू शकतो.
त्यामुळे आमचे जीवन कसे संपत जाते हेच आम्हाला समजत नाही. पण आम्हाला मिळालेले थोडेसे जीवन आणि त्यासोबत मिळालेले अमाप सौंदर्य याचा खुप अभिमान वाटतो. कारण जगण्यासाठी आणखी काय हवे? म्हणून फुलपाखरू होऊन जगण्यात लहानग्यांना सुद्धा आनंद वाटतो. ते आईवडीलांपाशी हट्ट करतात फुलपाखरासारखे पंख मिळावे म्हणून आणि आईवडील आमच्यासारखे पंख असलेली कपडे घेऊन देतात. जसे ते आपल्या मुलांना प्रेमाने जपतात तसेच सारे जग आम्हाला प्रेमाने जपते.
मी फुलपाखरू
जीवन माझे थोडे
मिळाले अमाप सौंदर्य
म्हणुनी सर्वांना आम्ही प्रिय
रंग आमचे वेगवेगळे
सारे जग आमच्या प्रेमात खुळे…!

लेखक : राहुल दादा बिचकुले
घामाचच दाम ( शेतकरी कविता )
नको भिक मला
देरं घामाचच दाम
मीच शेतकरी दादा
करी दिन रात काम
कष्ट नवं नाही
नाही रे ते मला
बियाणं भेटतं महाग
कवडीचे मोल माह्या पिकाला
पोशिंदा जगाचा मी
ठावं आहे मला
राहतो झोपडीत आजही
नाही बांधला बंगला
कामाची माझ्या येळ
नाही गड्या ठरलेली
कव्हा येते दिसाची
कव्हा रातीची बिजली
कधी पडतो पाऊस
कधी उन्हाच्या त्या झळा
जातो हंगाम कोरडा
लावुन नभाकडं डोळा
नाही साथ कुणाची
करतो कसरत जगण्याची
शेता राबून दिसरात
वाहतो चिंता जगाची
जगणं जातं अवघड
नशीब मातीत पेरलं
जरी राबलो दिनरात
भेटणा त्याचबी मोल
शेतीच्या या नादापायी
कर्ज वाढलंय डोई
कसं भरावं हप्त
शेती नोकरी नाही
मोठं मनात सपान
पोरं लई शिकतीन
पैका पडतोया कमी
नशिबी शेतात राबणं
कसं सांगु तुम्हा
शेतकऱ्यांचं ते जिणं
अंगी फाटका सदरा
पायी नाही पायताण
नको आम्हाला काही
दया कष्टाचच मोल
जिवापाड जपलं पीक
नको त्याला कवडीचे मोल…!
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
माझी माय मराठी
माझी मराठी
माझी मराठी
बोल वळविता वळती
सहज साधी सोपी
माय मराठी सर्वांना कळती ….
माझ्या मराठीचा गंध
मधुर भाषिक सुगंध
माझी मराठी निर्मळ
सुंदर बोलीचा दरवळ
माझी माय मराठी
अक्षरी सुंदर वळणदार
कधी मृदू मुलायम शब्द
कधी होती धारदार
माझी भाषा मराठी
माझी आशा मराठी
माझा ध्यास मराठी
माझा श्वास मराठी
माझा देश मराठी
माझा वेश मराठी
मी मराठी
आम्ही मराठी
आमुची माय मराठी

कवी . राहुल दादा बिचकुले
आपुलकी
प्रेम करण्यासाठी
मन मोठ असावं लागतं
प्रेमाच्या प्रवाहात सापडून
वाहवत जायचं नसतं
प्रेम आपल्याला मिळालं नाहीतर
प्रेमासाठी भांडायचं नसतं
कारण प्रेम देहावर नाही
तर ते मनावर करायचं असतं
प्रेमात देहाला जिंकायचं नसतं
तर मनाला जिंकायचं असतं
कारण प्रेम जगाला दाखविण्यासाठी नाही
तर एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण करण्यासाठी असतं
म्हणुन प्रेम करण्यासाठी
मन मोठ असावं लागतं …!
का खेळ निसर्गाशी
शेवटी ज्याचं त्याच्यापाशी
पण विचार करावा मनाशी
काय वागतो आपण
का खेळ निसर्गाशी…!
काय कमी निसर्गानं केलं
नाही आपल्याला पोसलं
कुठं स्वार्थ साधला
तरी माणसा निसर्गावरी तु कोपला
करी पशु पक्षांची हत्या
वृक्ष कत्तल ही केली
जंगलं स्वार्थाने गिळली
माणसा तुझी बुरी नियत रे कसली
नको खेळ निसर्गाशी
नको परीक्षा निसर्ग संयमाची
होईल होत्याचं नव्हतं सारं
माणसा कर आता तरी विचार
माणसा थोडं घे तु मनावर
निसर्ग संवर्धन रुजव विचार
लावूनी झाडं वाचव निसर्गाला
नाहीतर माणसा नाही वाचवू शकणार स्वतःला
निसर्ग ताकद अफाट
नाही आपल्याला पेलणार
करू मैत्री निसर्गाशी
माणसा बरसात होईल सुखाची
शेवटी ज्याचं त्याच्यापाशी
करावी मैत्री वृक्षांशी
जबाबदारी घ्यावी निसर्ग संवर्धनाची
फक्त नको खेळ निसर्गाशी
नको खेळ निसर्गाशी…!
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे
रानात राबणारी ती एक नारी शक्ती
पडक्या घराच्या विसाव्याला
संसार तीचा पहुडलेला
चुलीच्या त्या धुराने
नेत्री आसु डबडबलेला
कुटुंबाचा जरी घेऊनिया भार
देह नसतो थकलेला
तुडविते रोज रानवाटा
राबराबते रानात
घास मिळावा कुटुंबाला
निस्वार्थी ती माया
कधी तक्रार नाही
घराच जपते घरपण
ती घरची गं बाई
तिच्या मायेचा ओलावा
कधी कुणा ना समजला
ओढते रोज तीच
तिच्या संसाराच्या गाड्याला
देह दिसतो कृश
पण किती ताकद अफाट
करिते प्रपंच नेटका
तीच नारी शक्ती
रोज राबराबते रानात …!
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना खुप खुप शुभेच्छा ...!
कवी. राहुल दादा बिचकुले
यवत. ता. दौंड जि. पुणे
संपादक : माझीलेखणी.कॉम
"जगेन मायभू तुझ्यासाठी" एक प्रेरणादायी, चित्तथरारक अनुभवाचा खजिना : लेखक - रमेशजी खरमाळे
जगेन मायभू तुझ्यासाठी
आपली भारतमाता आणि आपली भारत भुमी यासाठी आपले जीवन सार्थकी लागत असेल तर त्यासारखे दुसरे भाग्य नव्हे…!
आज मी आपल्याशी अशाच भारतमातेच्या सुपुत्राने “शिवनेरी भुषण (माजी सैनिक) वनरक्षक मा. रमेशजी खरमाळे” यांनी आपल्या अनुभवातुन आपल्या हातातील लेखणीने समृद्ध केलेले “जगेन मायभू तुझ्यासाठी” या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. हा नुसता ग्रंथ नसुन प्रत्यक्ष भास होणाऱ्या अनुभवाचा भरगच्च खजिना आहे. या माध्यमातून निसर्ग आणि रोजच्या जिवनातील अनेक प्रसंगावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रत्येकाने एकदा तरी हा ग्रंथ वाचावा नुसता वाचु नये तर त्या प्रसंगाशी समरस होऊन अनुभवावा. अंगावर शहारे उमटतील, देशप्रेम, निसर्गप्रेम, समाजकार्य उंचबळून येईल. आणि प्रत्येक अनुभव स्वतःला जगता येईल असा हा ग्रंथ.हृदयी वसे भारतमाता
लेखणी जणु शारदा
धाडस हे भैरवाचे
कसले ध्येय हे भटक्याचे
वर्णन सांगतो सह्याद्रीचे
तव अंगावरी उठे शहारे
देशप्रेम, निसर्गसेवा
कौतुक करावे कार्याचे
सांगतो रमेशजी
बोल आपुल्या अनुभवाचे
ऋणानुबंध भारतभूमीच्या नात्याचे
जीवन आहे आपुले मोलाचे
पण जगावे कुणासाठी
सांगतो प्रत्येक अनुभव
जगेन मायभू तुझ्यासाठी
जगेन मायभू तुझ्यासाठी …!
.jpg)
लेखकाने साध्या सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या अनुभवाचे कथन या “जगेन मायभू तुझ्यासाठी” या पुस्तकातून केलेले आहे. प्रत्येक प्रसंग वाचताना आपल्याला आपण अनुभवत आहे असा फिल येईल. अंगावर शहारे उमठतील, आणि पुढे काय घडले याची आतुरता लागेल. हे लेखन त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या अनुभवाचे बोल आहे. यावरून आपल्याला नक्कीच लेखकाचे देशप्रेम, सामाजिक जाणीव, आणि निसर्गप्रेम याचा प्रत्यय येईल. आणि आपल्याला पुस्तकाच्या नावाचा अर्थ न सांगता उमगेल यात शंका नाही.
“त्याच्या हातात मी माझा मृत्यू पाहत होतो” हा प्रसंग वाचतांना लेखकाने मांडलेल्या सैनिकाच्या जीवनाची मनोव्यथा आपल्याला खुप काही सांगुन जाते. सीमारेषेवर जगत असलेले जीवन आणि त्यातच गावाकडची एखादी संवेदनशील बातमी कानावर पडते, त्यावेळी या कठोर मनाची होणारी घालमेल कशी असते हे समजेल. जवानांच्या अंगी असलेले देशप्रेम, तो झोपेत असतानाही किती सावध असतो व त्यामुळे लेखकाच्या समोर प्रत्यक्षात यमदुत कसा उभा राहतो. त्यातून लेखक कसा वाचतो. त्यावेळी प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखकाने आपल्या लेखणीतून केलेले कथन नक्कीच अंगावर शहारे उभे करतील.
“बिबट्याच्या पिल्लाची व आईची रेस्क्यूद्वारा थरारक भेट” या प्रसंगातुन ‘बिल्ली के गले मे घंटी बांधेगा कौन ?’ या प्रश्नाला दिलेले आपल्या धाडसातून उत्तर…! यामध्ये लेखकाच्या प्रसंगावधान, नियोजन, धाडस, सामाजिक जाणीव, वन्यजीवांबद्दल असलेला आदरभाव अशा अनेक गुणांचे दर्शन घडते, आणि प्राण्यांनाही भावना असतात याची जाणीव निर्माण करून दिली जाते. प्रत्यक्ष वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहते आहे नकळत हा थरार आपल्या डोळ्यासमोर तरळत राहतो.
‘माळशेज घाटातील अपघात’ या लेखातील वर्णन वाचताना, समोर असणारे मृत्यूचे तांडव आणि त्यातील जखमींना वाचविण्यासाठीची लेखकाने केलेली धाडसी रेस्क्यू मोहीम डोळ्यासमोरून जात नाही. यात लेखकाची जखमींना वाचविण्यासाठी केलेली धडपड, धाडस आणि माणुसकी या गुणांचे दर्शन होते.
‘बेल्हे येथील दुर्घटना’ या लेखात लेखकाचे विहिरीत पडलेल्या लोकांना वाचविण्याचे केलेलं प्रयत्न आणि उपाययोजना तसेच माणसाने निर्माण केलेल्या प्रदुषणाचे दुष्परिणाम लेखकाने मांडलेले आहेत.
त्याचबरोबर पुराच्या पाण्यात अडकलेल्या मजूर कुटुंबाला वाचविण्यासाठी दाखवलेली तत्परता व सजगता ‘जीवनदान’ या लेखातून दिसून येते. जनसेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद लेखक सतत जपत असल्याचा प्रत्यय येतो.
‘पेट्रोल पंपावर बस जेव्हा अचानक पेटते’ आणि अंथरुणाखालुन जेव्हा साप बाहेर पडतो’ या लेखातून लेखकाचे प्रसंगावधान दिसुन येते.
तसेच ‘गणपती गडदचा प्रवास’ या लेखातून सहकुटुंब भ्रमंती मधुन त्यांनी निर्माण केलेली आपल्या कुटुंबातील निसर्ग भ्रमंतीची आवड दिसुन येते.
मानव असो वा प्राणी यांच्यात भेदभाव न करता तेवढ्याच आपुलकीने, प्रेमाने लेखक सर्वांना मदत करत असतो याचा अनुभव आपल्याला या पुस्तकातील प्रत्येक लेखातून दिसून येईल असाच एक प्रसंग ‘त्याला वाचविले ८० जणांच्या तावडीतून’ या लेखातून जाणवतो आपला जीव धोक्यात घालून लेखक एका विषारी घोणस सापाला वाचवितो आणि त्याच दिवशी एका पक्षालाही जीवनदान देतो. तसेच ‘फक्त तिच्यासाठी’ या लेखात दुर्मिळ होत चाललेल्या उदमांजर याचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड यातून लेखकाचे प्राणी आणि पक्षांवरील प्रेम आपल्याला दिसून येईल.
लेखक एक ध्येयवेडा भटक्या आहे हे आपल्याला या पुस्तकातून पानोपानी जाणवेल. असाच एक वेडा प्रसंग लेखकाचे धाडसी वेडेपण सांगुन जाईल. ‘नैसर्गिक पुलाचा थरारक अनुभव’ यामध्ये लेखकाने मांडलेला प्रसंग वाचताना आपल्या अंगावर काटा येईल. सुमारे दोन-तीन हजार फुट खोल दऱ्या आणि रुंदीला कमी अशा भयानक कातळ भिंतीवर आपले दोन्ही पाय खाली सोडून हळूहळू पुढे सरकणे आणि आपले ध्येय घाटणे. असे अजब धाडस लेखकाने केले. कुठुन येतं एव्हढ बळ ? देव जाणे ..! असे अनेक प्रसंग या पुस्तकातून आपल्याला दिसून येतील. साक्षात मृत्यूला आव्हान देत. सह्याद्रीच्याकुशीत वाऱ्याशी हितगुज करत, कडेकपारी, डोंगर रांगा, गिरिशिखरे यांना आपलसं करीत, निसर्गाच्या सानिध्यात प्राणी पक्षांशी भावनिक नातं निर्माण करून, निसर्गाने पाहुणचार म्हणुन दिलेला रानमेवा चाखत, आणि प्राणी पक्षांप्रमाणे सोबत आणलेले बीज निसर्गात रुजवत आपला प्रवास हे भटके चालूच ठेवत असतात. ना वेळेच भान, ना कशाची भीती, मनात फक्त आस आज ठरविलेले ध्येय पूर्ण करायचे, अशी स्वप्नाळू माणसं रोज नवीन स्वप्न पाहुन ते रंगवत पुर्ण करायचे यासाठी जीवाचा आटापिटा करायचा पण मनात ठरविलेले साध्य करायचेच. अशा अनेक गोष्टींची ओळख या पुस्तकातून सतत होत राहील.
अनेक गडकोट, गिरिशिखरे, नद्या, जंगले याची भ्रमंती लेखकाने केलेली जाणवेल कधी सोबतीला गाईड तर कधी स्वताच मार्ग काढत ट्रेकिंग करायचे यातून आपल्याला लेखकाचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास जाणवेल आणि ट्रेकिंग चा अनुभवही. भैरवगड, माळशेज घाट, हरीश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा, वानरलिंगी, पडलिंगी, सांदण दरी, भीमाशंकर, शिवनेरी, हरिहर, गणपती गडद, नाणेघाट, जीवधन, मच्छिंद्रगड, गोरक्षगड, पेमगिरी, म्हसवंडीघाट, खामुंडीघाट, नांगरदरा, टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, भोजदाऱ्या, भोरांड्याची नाळ, दाऱ्याघाट, खुटादारा, डोणीदरा, विविध कोकणकडे, किल्ले चावंड असे अनेक गडकोट, भुयारे, बारवा गिरिशिखरे, डोंगरदऱ्या, नद्या यांची ओळख लेखकाच्या अनुभवातुन केलेल्या लेखणीतून होईल.
लेखकाचे सर्वांना सामावून घेण्याचे स्वभावगुण ही अनेक प्रसंगातुन जाणवतील. त्यातीलच ‘ऐंशी वर्षाचा तरुण गाईड’ ‘म्हसवंडी खामुंडी घाट’ चिमुकले गाईड यांच्यासोबत केलेली भ्रमंती, वाटेवर भेटलेल्यांना मदत आणि सोबतीला असलेले सोबती. यातुन आपल्याला लेखकाच्या सर्वांच्यात समरस होऊन जाणे. या गुणांची ओळख करून देईल.
याचप्रमाणे लेखकाचे वनरक्षक म्हणुन अनेक सामाजिक कार्ये, सोशल मिडिया योगदान, निसर्गसंवर्धनविषयक अनेक कार्याची ओळख, पुरस्कार, सन्मान आपल्याला या पुस्तकातून नक्कीच होईल. आणि निसर्ग भ्रमंती याविषयी हे पुस्तक खुप काही शिकवुन जाईल. यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येक सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे, भटकंती करणारे, युवा तरुण, यांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आपल्याला नक्कीच प्रेरणा देत राहील.
रमेश सरांचे व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला जाणवेलच. त्यांच्या समृद्ध अनुभवाचा खजिना असाच सर्व समाजप्रेमी, निसर्गप्रेमी, नवयुवक सर्वांपर्यंत पोहचावा. त्यांच्या लेखणीला बळ मिळुन त्यांच्या हातुन अनेक सत्कार्य घडावीत. यासाठी त्यांना माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा…!
लेखक : राहुल दादा बिचकुले
संपादक : माझीलेखणी.com
यवत, ता. दौंड, जि. पुणे
लेखक परिचय ( जगेन मायभू तुझ्यासाठी )
श्री. रमेश गणपत खरमाळे
शिवनेरी भूषण ( माजी सैनिक खोडद )
मु. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे.
भारतीय सैनिक सेवा १९९५ ते २०१२
रिटायरमेंट नंतर बँकेत गनमॅन म्हणुन ६ महिने नोकरी
सध्या वनविभाग जुन्नरमध्ये वनरक्षक पदावर नियुक्ती
समाज सेवा
तत्पर आपत्कालीन मदत, वृक्षारोपण व बिया रोपण, स्वच्छता अभियान, किल्ले संवर्धन, मुलांच्या करीअरसाठी मोफत सेवा, महाराष्ट्र शासन पुरस्कार २०१८ इ. अनेक सामाजिक पुरस्कार, तालुक्यात इतर महत्वपूर्ण योगदान
लेखक श्री. रमेश गणपत खरमाळे यांच्या जगेन मायभू तुझ्यासाठी या पुस्तकासाठी एक काव्यरूपी प्रतिक्रिया
लेखक श्री. रमेश गणपत खरमाळे यांच्या जगेन मायभू तुझ्यासाठी या पुस्तकासाठी एक काव्यरूपी प्रतिक्रिया.
हृदयी वसे भारतमाता
लेखणी जणु शारदा
धाडस हे भैरवाचे
कसले ध्येय हे भटक्याचे
वर्णन सांगतो सह्याद्रीचे
तव अंगावरी उठे शहारे
देशप्रेम, निसर्गसेवा
कौतुक करावे कार्याचे
सांगतो रमेशजी
बोल आपुल्या अनुभवाचे
ऋणानुबंध भारतभूमीच्या नात्याचे
जीवन आहे आपुले मोलाचे
पण जगावे कुणासाठी
सांगतो प्रत्येक अनुभव
जगेन मायभू तुझ्यासाठी
जगेन मायभू तुझ्यासाठी …!
लेखक : राहुल दादा बिचकुले
संपादक : माझीलेखणी.com
यवत, ता. दौंड, जि. पुणे
रामाची कुऱ्हाड
नुकताच होळीचा सन साजरा करुन रामा धनगर मेंढरांचा वाडा घेऊन कोकनातुन देसाला (घाटावर) निगाला व्ह्ता, वाढत्या शहरीकरनाचा परीनाम जानवतोय वाडा घाट चढुन वर निघाला. असाच यक दिवस वळवाचा पाऊस पडत व्हता मानसं भिजल्याली, गारा आण वारा जितराबं आण मानसाला झोडपतोय, चुल पेटली नाय, कुत्री आणी मानसं चिखलात ठोकल्याल्या पालात जिव दडवुन बसल्यात अशातच मांग रामुशाच्या गड्यांनी घात केला आण रामाची 22 मेंढरं आण 3 बालिंग रामुशांनी पळावलं, सकाळ दिवस ऊगावता रामा झाली घटना सांगायला न्याय मागायला गावात पाटलाचा वाडा हुडकत जातो, पाटलाच्या वाड्याव कारखान्याच्या निवडनुकीची वली पार्टी चालु हाय, मटनाचं टोप शिजत हायतं , जिवापाड जपल्याल्या म्होरप्या भिंगार्या बालिंग्याचं काताडं वाड्याच्या तुळईला लोंबताना रामाला दिसलं, रामा धाय मोकलुन रडाय लागला, रामा तसाच माघारी फिरतो बिर्हाडाव जातो कालच घासुन ठेवल्याली कुर्हाड घेऊन परत पाटलाच्या वाड्यात जातो दारु पिऊन मटान खात झिंगलेला पाटील दात कोरत झोपाळ्यावर पुढची योजना बनवत असतो. पाटील मिशीवर ताव देऊन रामाकडं बघनार तोच रामाची कुर्हाड पाटलाचं मस्ताक ऊडवुन पाटलाचं गरम रगात प्यायली आहे. पाटलाचा देह तसाच फडफडत झोपाळ्यावर पडलाय, रामाला केल्या कामाचा अजीबात पस्तावा नाय, रामा वाट बघतोय कुठं अंन्याय होतोय याची.

दिवे ता.पुरंदर
होते चिऊ काऊचे ते दिस
होते चिऊ काऊचे ते दिस
आता नाही मिळत पाहवयास
आजीच्या गोष्टीत यांना मानाच स्थान
घराच्या आढ्याला घरटं असायचं छान
अंगणात रोज दानं टिपायच्या
आमच्यासोबत उड्या मारत खेळायच्या
सरलं आमचं बालपण
हरवलं त्यात चिऊकाऊच घरपण
कुठे गेल्या कुणास ठाऊक
आजी आता गोष्ट सांगत नाही
आणि आमच्या मुलांना चिऊ काऊ समजत नाही
आम्हाला चिऊकाऊ पासुन शेत राखावं लागत नाही
पण किडे अळ्या पिकं येऊ देत नाही
चांगली होती चिऊ काऊ
आता कधीतरीच दिसते
आढ्याला बांधत नाही आता घर
आता ती कुठ राहते
आता नाही पहिल्यासारखी झाडं
ना राहिली घराला आढं
कुठुन येणार चिऊ काऊ
आपल्या मुलांना आपण चित्रातच दाऊ
अजुन वेळ गेली नाही
चिऊ काऊ पुन्हा येतील
त्यांच्यासाठी आपण करू काही
लावू फळाफुलांची देशी झाडे
ठेऊ त्यांच्यासाठी पाणी
आणि टाकु अंगणात दाणे
त्यांची घरटी मोडायची नाही
नाहीतर पुन्हा निघुन जाईल चिऊताई
एव्हढ करू मनापासुन
तर चिऊ काऊ जाणार नाही रुसुन
जागतिक चिमणी दिवसाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्या
आपल्या लहान चिऊ काऊ सारख्या मुलांना चिऊ काऊ गोष्टीतुन चित्रातून न दाखवता… दाखवू आपण पुन्हा यासाठी प्रत्यकाने हातभार लावावा चिऊ काऊच्या संवर्धनात…..
कवी. राहुल दादा बिचकुले
नाथदेवराई फाउंडेशन सदस्य
तु माझ्या आयुष्यात आली
तु माझ्या आयुष्यात आली
खुप बदल झाला
कोणी नव्हते माझे
पण तु नावलौकिक मिळवुन दिला
नको मला जास्त काही
पण समाधान मिळत आहे
आणि हे सारे तुझ्यामुळेच घडत आहे
तुझ्यावरच्या प्रेमापोटी
हाती लेखणी घेतली
रागावलो असेल तुझ्यावर कित्येकदा
पण तेवढ्याच प्रेमाने
तुला कवेत मी घेतली
कसं व्यक्त करू मी
तुझ्यावरचे प्रेम
विसरण्याचा तर प्रयत्न
मी खुपदा केलाय
पण तु मला सोडशील
असे मला तरी वाटत नाही
कारण कित्येकदा बदलला मी मार्ग
पण तु पुन्हा याच मार्गावर आणले
मन आणि बुद्धी यावर
तु जादु केलीय
हाती येता लेखणी
त्यातुनी सहज तु साकारते
अशी माझी तु कविता
सहचरणी म्हणुनी सदैव
सोबतीच राहते
येऊदे कोणते बी दिस
तुला अंतर मी देणार नाही
जोवर आहे या विश्वात मी
तोवरी तुझ्यावर प्रेम
करत राहणार मी…..
विश्व कविता दिवसाच्या सर्व कवी, कवयित्री आणि वाचक यांना खुप खुप शुभेच्छा…💐💐💐
कवी. राहुल दादा बिचकुले
शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१
वसुंधरा तुला करिते विनवणी….!
पाणी पाणी करुनी
व्याकुळ झाली धरणी
कंठ सुकला तहान लागली
काहीतरी कर माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी…!
पाणी आहे जीवन
निसर्गाची अनमोल देन
जागोजागी त्याला अडवुनी
मुरव मातीत त्याला माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी …!
नाही आज जागा तु झाला
मुकशील भविष्यात पाण्याच्या घोटाला
मग पैसा असुनी नाही मिळणार पाणी
घे ध्यानात आताच माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी …!
साद वसुंधरेची आज ऐकशील
जागोजागी पाणी अडवुन मुरवशील
कमी पडणार नाही कधी कशाची
हे घे ध्यानात माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी….!

कवी. राहुल दादा बिचकुले
संपादक : माझीलेखणी.com
हा वणवा नसुन आपलं भविष्य जळतय...
विज्ञानाने प्रगती केली, आपण आधुनिकतेची कास धरली बेस केलं गड्या… प्रगती झालीच पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे पण प्रगतीचे नवे पंख घेऊन उंच यशाच्या क्षितिजावर विहार करत असताना जिथून झेप घेतली आहे ना त्या मातीला कधी विसरायचं नसतं… कारण शेवटी तिथच पुन्हा उतरायचं असतं…!
असो, सध्या जिकडेतिकडे पाहावे तिथे डोंगर, वनविभाग, गायरान असे अनेक राखीव, पडीक जंगलाचे भाग तिथे वणवे लागताना आपण पहात आहे..
पूर्वी गोष्टीत आणि पुस्तकातून वाचलं ऐकलं होतं जंगलात झाडांच्या फांद्यांना फांद्या घासुन घर्षण निर्माण होऊन वणवे लागायचे आणि त्यामुळे जंगल जळायचे… पण आता मला सांगा सध्याचे वणवे लागताना दिसत आहे तिथं झाड ना झुडुप दिसेना तरी कसे बरं वणवे लागतात. हे निसर्गनिर्मित वणवे नसुन माणसांचं वाईट विचारांचं कुटील कारस्थान असावं…
माणसालाच दोष का असं कुणी म्हणलं तर त्यानं बी समजुन जायचं की आग लावण्याएव्हढा माणसापेक्षा हुशार प्राणी दुसरा कोण नाही.
एकीकडे हजारो निसर्गप्रेमी अपार मेहनत करून आपली वसुंधरा हरित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे असे विघ्नसंतोषी महाभाग निसर्ग चक्रात अडथळे निर्माण करत आहेत. त्यांनी थोडंस समजुन घ्यावं कि आपण काय करतोय…
एक उघडा बोडका गवताने भरलेला डोंगर जरी वणव्यामध्ये जळाला ना तरी हजारो पक्षी, सरपटणारे प्राणी, असंख्य जीव ( किडे मुंग्या) यांची घरे आपण जाळतो. आज त्यांची घरे आपण जाळली तर उद्या भविष्यात निसर्ग आपले घर नक्कीच जाळेलं. हे नक्की ध्यानात ठेवा…
आज आपण निसर्गाचा ठेवा नष्ठ करत आहोत म्हणजे उद्याचे भविष्य जाळत आहे.
एकीकडे विद्युत दिव्यांनी झगमगणारी शहरे आणि त्यालगत असणारे जळजळीत निखाऱ्याने जळत असणारे डोंगर, जंगले. या दिव्यांच्या झगमगाटाची माणसाला इतकी सवय लागावी कि, त्याच्यापुढे त्याला जळत असणारे आपले भवितव्य दिसु नये. आज प्रत्येकाने निसर्गसंवर्धनासाठी प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. कारण आज सिमेंटच्या जंगलाने आपले जे अस्तित्व निर्माण केले आहे त्यामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे. युवा पिढीने पुढाकार घेऊन गावोगावी निसर्ग संवर्धन मोहीम सुरु करावी. त्या माध्यमातुन वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, पाणी आडवा, पाणी जिरवा मोहीम आणि असे अचानक जंगलात लागलेल्या किंवा लावलेल्या आगीपासून जंगलांचे, निसर्ग सृष्टीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आणि निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या विघ्नसंतोषी माणसांनाही धडा शिकवणे गरजेचे आहे.
आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असणारी गिरिशिखरे आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची साक्ष आहे. कित्येक पावले या भूमीवरून कडेकपारीतून धावली असतील, कित्येकांचे रक्ताचा अभिषेक या भूमीवर झाला असेल, कित्येक जुलमी राजवटी या नेस्तनाबुत केलेल्या या भूमीने गीरीशिखारांनी पहिल्या असतील. आपले स्वराज्य याच गीरीशिखारांच्या, डोंगर दऱ्यांच्या सामर्थ्यामुळे निर्माण झाले. हाच तो आपला भुतकाळ किती सुंदर होता. आणि आपल्या पूर्वजांनी कसा जपला होता हे आपण इतिहासाच्या पानोपानी पाहिलेले आहे. मग आपण का एव्हढे थंड रक्ताचे ?
का सळसळत नाही, का उसळत नाही आपले रक्त, आपले भविष्य डोळ्यासमोर जळत असताना …!
आतातरी जागे व्हा ..!
दिसता निसर्गावरी संकट
मावळ्यांनो धावुन जा
कोणी करत असेल जाणूनबुजून
त्यांना सोडू नका
पाहवत नाही या डोळ्यांना
भविष्य डोळ्यासमोर जळतांना
उफाळून येऊद्या रक्त
विषय निसर्गाचा असतांना
वणवा हा वणवा नव्हे
निसर्ग सृष्टी त्यात जळत आहे
आपण त्याच माईची लेकरे
कसे फक्त पहात रहातो
आणि माय डोळ्यासमोर मरत आहे
आता असे होऊ देऊ नका
असे भविष्य डोळ्यासमोर
जळताना पाहू नका ….!
आतातरी जागे व्हा ..!
दिसता निसर्गावरी संकट
मावळ्यांनो धावुन जा
कोणी करत असेल जाणूनबुजून
त्यांना सोडू नका
पाहवत नाही या डोळ्यांना
भविष्य डोळ्यासमोर जळतांना
उफाळून येऊद्या रक्त
विषय निसर्गाचा असतांना
वणवा हा वणवा नव्हे
निसर्ग सृष्टी त्यात जळत आहे
आपण त्याच माईची लेकरे
कसे फक्त पहात रहातो
आणि माय डोळ्यासमोर मरत आहे
आता असे होऊ देऊ नका
असे भविष्य डोळ्यासमोर
जळताना पाहू नका ….!
सर्व निसर्गप्रेमी मित्र मैत्रींनीना विनंती आहे कि, गावोगावी आपले निसर्ग संवर्धनासाठी एक मजबुत संघटन निर्माण करा. आणि त्यांमाध्यमातुन निसर्गसंवर्धन करा. हि भविष्याची गरज आहे. नाहीतर जंगल, निसर्ग, पशु, पक्षी हे आपल्या पुढच्या पिढीला फक्त चित्रात पाहावे लागेल. ते सुद्धा पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन. अंगावर सतत कृत्रिम सावली धरून....

लेखक / कवी : राहुल दादा बिचकुले
माझा प्रपंच (ग्रामीण कथा)
झाली सांजवेळ
या सांजवेळी
सूर्यदेव दुर गेला
बुडाला डोंगरापार
झाकाळली धरती
पसरली सावली
झाला अंधार
झाला अंधार
मला देवाजीचा आधार
एकच मागण माझ
होऊदे सुखाचा संसार
सायंकाळची वेळ अंगणात हातात झाडू घेऊन म्हातारी आजी अंगण झाडत झाडत मनाशीच पुटपुटत असते. सूर्य पार डोंगराच्या पल्याड बुडाला.... सांजची वेळ झाली थोड्याच येळात काळोख पसरल.... माझा किसना आजुन कसा बर आला नाय. हि शेवंती कधी येऊन उरकायची सगळी काम ह्या काळजीत म्हातारी इकड काम उरकीत असती..... तिकड किसना आणि त्याची बायको शेवंता रानातल आवरून थोडसं सरपण आवळून घेत असत्यात ये शेवंते आग उरीक जायला उशीर होईल तीन चार मैलाच आंतर तोडायचंय आजुन....! माझं उरीकलय तुमचच आवरा...... आन मला उचलु लागा थोडं. किसना आपल्या युवराज्या आणि मस्तान्या बैलाला सोडत. चल हट युवराज्या म्हणत युवराज्याला पुढ घेत मस्तान्याला ओढीत शेवंताला सरपण उचलु लागतो. तोवर सूर्य पार डोंगराआड जातो. किसना बैल घेऊन पुढ चालतो... शेवंता सरपणाचा भारा डोईवर घेऊन माग माग चालत असते. दोघेही घराच्या ओढीन झपाझप अंतर उरकीत असताना गप्पा मारीत असतात. दिस कसं निघून जात तेबी कळत नाय... अजुन थोडा येळ मिळाला असता तर दोन सऱ्या खुरपुन झाल्या असत्या... म्या काय म्हणतो शेवंते आपुन उद्याच्याला दोन बाया घेऊ म्हंजी सरीन सरी पटदिशी उरकुन जाईल खुरपणी परत पुढ्बी काम येत्याल. बगा न मग... तेव्हढच एकाला दोघी दोघीला तिघी काम बी उरकलं... मलाबी एकटीला उरकाना झालय. दिस पुराना आन काम उरकाना अशी गत झालीय माझी. चल झपाझपा म्या सकाळ बघतो दोन बाया.... चला चला आजुन घरी जाऊन बी लई काम हाय..... आत्यानी झाडलोट केली असलं पण सयपाकाला पार उशीर होतो तवर पोर बी झोपुन जात्यात. मग पहाटच भुक भुक करत्यात. असचं गप्पा मारत मारत दोघ घरी पोहचतात.. किसना दावणीला बैल बांधतो. शेवंता सरपण टाकून थोडं चुलीसाठी घेऊन घराकड येती... किसना वैरणीच्या गंजीतून दोन पेंड्या कडबा काढुन सरपणातील कुऱ्हाडीने तोडुन बैलांना टाकतो.शेवंता घरी जाताच तुका आणि सई आईला बिलगतात... शेवंता त्यांना गोंजारीत चुलीपुढ सरपण टाकुन चुल पेटवती. शेवंताची सासू घरातुन बाहेर येत.... अग किती उशीर करता येईला..... घर प्रपंचा यामधी पोर सोर बी असत्यात त्यांना काय उपाशी झोपु द्यायचं काई.... आत्या दिस जातो भरदिशी रानातली काम बी उरकत नाही आणि त्यात रान जवळ नाही.... बर बर बया आता भात घाल पटदिशी परत झोपतील उपाशी... तेवढ्यात किसना येऊन हातपाय धुवायला पाणी घेतो... तीकडून आवाज देतो ..... शेवंते जरा च्या ठिव.... आज लई कटाळा आला बग.... ठिव थोडा च्या त्यो बी पिईल मलाबी घोटभर दे आन पोरांना ती पिशवीतली बटरं दे च्याबर.... ठिवती आत्या तुम्ही तेवढा देव्हाऱ्यात दिवा लावा देवापूढ..... म्हातारी उठुन घरात जाऊन दिवा लावते. किसना घड्यामधून जान काढुन ओसरीवर खुल्या आभाळा खाली टाकुन जानावर अंग टाकून पडतो. पोरबी त्याच्याकडला येऊन खेळतात बापलेकरामध्ये गप्पा रंगात म्हातारी आजीही शेजारी बसुन त्या गप्पा मध्ये रंगुन जाते.शेवंता भारी कडाक काळा च्या बनुवून आत्याला तिचा धनी किसनाला देती. पोरांना च्यात बटरं भिजवुन खायला देती. आणि स्वतः घोटभर च्या घेऊन सयपाकाला सुरुवात करते. इकड खुल्या आभाळाखाली आजी नातवंड आणि ल्योक यांच्या गप्पा गोष्टी रंगात आलेल्या असतात... आणि शेवंताची आपला प्रपंच जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.... चुलीच्या धुरात डोळ पुशीत भाकरी कालवण मोठ्या प्रेमान बनविते. आणि सगळ्यांना जेवणासाठी आवाज देते. आजीच्या गोष्टी ऐकत झोपी गेलेली लेकर त्यांना जेवणासाठी बळच उठवुन सगळेजण जेवायला बसतात. किसना, आत्या यांना ताट वाढून शेवंता पोरांना जेवण भरविते. सगळ्याचं जेवण झाल्यावर शेवंता स्वताच ताट वाढुन जेवण करते. आणि सगळे पुन्हा अंथरूनावर अंग टाकून झोपी जातात. शेवंता आपली प्रपंच जपण्यात दंग असते. चंद्राच्या मंद प्रकाशात चांदण्यांच्या चमचमण्यात मोठ्या उत्सहात सगळ आवरून भांडी घासुन झोपलेल्या पोरांच्या अंगावर पांघरून घालून आत्याच्या उशाखालची मोठी जाड उशी आत्याच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन अलगद काढून मनात एकच प्रार्थना करते " हे देवा माझं जिण माझा प्रपंच तुला एकच मागण सुखी होऊदे माझा संसार" पोरांच्या अंगावरून हात फिरवत उद्याचा विचार करत शेवंता झोपी जाते.....

माझ्या मनातलं राजं
माझ्या मनातलं राजं
राजेभुषणसिंह होळकर
वंशज होळकर राजघराण्याचे
थोर आहेत त्यांचे विचार
पुण्यश्लोक अहिल्यामाई
त्यांचे अंगी बाणले विचार
ठेवुनी मनात सदैव आदर
चालती त्यांच्याच विचारावर
सर्वगुणसंपन्न माझा राजा
तेजस्वी वलय चेहऱ्यावर
होळकर पगडी डोईवर
राजा शोभतो रुबाबदार
लाभले भाग्य आम्हास
सोबतीला राजे होळकर
प्रेरीत झाला धगधगत्या मनात
होळकरशाही मावळा साकार
राजे दंग नव स्वराज्यनिर्मितीस
शिलेदार आम्ही सोबतीला
राजे चाला पुढे पुढे तुम्ही
आपण निर्मुया नवस्वराज्याला
साकडे घातले मार्तंडाला
वंदन राजमाता अहिल्यादेवींना
राजेभूषणसिंह मिळाले आम्हाला
तुम्हीही धावुन यावे मदतीला
वंदन भवानीमाता चरणासी
वंदन शिवराय चरणाला
वंदन करितो देवादिकासी
उदंड आयुष्य लाभूदे राजाला
भुषणसिंहराजेंच्या कार्याला....
मनी इच्छिल्या धेयाला
लाभूदे यश किर्ती साफल्य
हिच प्रार्थना परमेश्वराला....
होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांना जन्मदिवसाच्या शत:कोटी शुभेच्छा ..!

कवी :श्री. राहुल दादा बिचकुले
संपादक : माझीलेखणी.com
माणकोबावाडा, यवत ता. दौंड, जि. पुणे
कौटुंबिक संवाद हरवतोय
अलीकडच्या १०-२० वर्षांचा टिव्ही, मोबाईलचा काळ पाहता थेट संवाद कमी होताना दिसत आहे. आणि प्रसार माध्यमांसोबत समाज माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. स्मार्ट मोबाईलच्या क्रांतीमुळे या मोबाइलचा वापर अगदी खेडेगावात, घराघरात आणि माणसा माणसात बदल होत आहेत. यामुळे प्रत्येकाच्या संपर्क क्षेत्राचे एक मर्यादित वर्तुळ निर्माण होत आहे. आणि यातूनच कौटुंबिक संवाद हरवत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे.
अलीकडच्या काळात बारीक नजर टाकून निरीक्षण केले तर याची जाणीव होते की, तरुणपिढी ही जास्त आत्महत्या करत आहे. अगदी २० ते २५ या वयोगटातील मुले मृत्यूला कवटाळत आहेत. कित्येक तरुण मुलांच्या मृतदेहाला वडिलांना खांदा देणे व धडाग्नी दिल्याचे प्रसंग पाहायला मिळत आहेत. हे असे का? याची कारण काय? याचा कोणत्याही पालकाने विचार केला पाहिजे. हल्लीची परिस्थिती पाहता असे वाटते की, संवाद कमी होतोय.
पूर्वी कोणतेही सोशल मीडियाचे साधन नसल्याने घरातील सर्वजण एकत्र बसत, कोणताही खेळ खेळत, गप्पागोष्टी, विचारविनिमय, सल्ला मार्गदर्शन करत असत. पण अलीकडे याची जागा म्हणजेच मुलांचा वेळ टीव्ही व मोबाईलने घेतला आहे. मुलगा सातवीला गेला नाही तोपर्यंत त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाइल असतो. यामुळे तो संवाद विसरून जातो. परिणामी त्याची वैचारिक पातळी/कक्षा रुंदावताना दिसत नाही. सध्याचे पालक आपल्या मुलाला अभ्यासाच्या नावाखाली झोपण्यासाठी वेगळी खोली देतात. पण अशाने त्याची मोबाइलशी दोस्ती वाढून मानसिकता बदलत जाते.
काही घरातील दुर्दम्य चित्र म्हणजे बाप व मुलगा एकत्र घरात कधीच जेवत नाहीत. कोणाचं मोठ्या भावाशी जमत नाही, तर कोणाचे वडिलांशी. आजकालच्या पोरांना कशाचे टेंशन (तणाव) आले की लगेच मोबाईल मधील स्टेटस ला टाकायचे "मूड ऑफ". ना आपले दुःख कोणाला सांगतात, ना त्याचे सोल्यूशन शोधतात. फक्त आत्महत्येचा विचार करतात. कोणी एकतर्फी प्रेमातून जीव देतो, तर कोणी नोकरीसाठीच्या परीक्षेत अपयश आल्यावर. पण असे करणे म्हणजे मर्दाचे जीवन नाही, हे या तरुणांना कोणी सांगणार? नाही नोकरी लागली तर आपण जीवनात इतर काहीतरी करू शकतो, ही भावना आजच्या तरुणांमध्ये रुजली पाहिजे आणि रुजविली पाहिजे.
आपला मुलगा काय करतो? कोणाची संगत करतो? रात्री किती वाजता घरी येतो? हे आपण कधी विचारत नाही. कारण मुलांचे व्यसन हेही आजकाल मृत्यूचे कारण बनत आहे. आजकाल नववी दहावीत पोरं देखील व्यसनाधीन झाली आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते कुठे, कशासाठी किती पैसे खर्च करतात, याची विचारपूस वा चौकशी आपण कधीच करत नाही. आपल्या मुलाची चौकशी करणे, ही पालकांची तितकीच जबाबदारी आहे.
परीक्षेत जर अपयश आले तर ही परीक्षा म्हणजे जीवन नाही, हे आपणच आपल्या मुलांना सांगायला हवे. जीवनात इतर कोणताही उद्योग व्यवसाय करू शकतो, हे कोणीतरी या तरुणांना समजावून सांगायला हवे. काही मुले ही अपघातात जातात. पण तो किती गाडी स्पीडने चालवतो, कशी चालवतो? किमान त्याचे ते गाडी चालवायचे कायदेशीर वय आहे का? याची सर्व खबरदारी आपणच घ्यायला हवी.
या हल्लीच्या काळात मुलामुलींना हव्या त्या सुविधा, नको असलेल्या वयात (गरज भासण्याआधी) मिळत आहेत. जेव्हा मुलं मोटारसायकल मागतील, तेव्हा त्याना सायकल द्यायला हवी. कारण असे केल्याने त्याना आहे त्या परिस्थितीमध्ये जुळवून घेण्याची सवय लागेल. आजकाल लहान वयात मुलांना हार्ट अटॅक येण्याचे प्रकार पाहण्यात येत आहेत. हे कशा मुळे होते? तर याचे कारण असेही आहे की, ऐन तारुण्य वयात मुलांना तब्बेत मजबूत बनवण्याचे वेड लागलेले असते. ही चांगली गोष्ट आहे. पण ती बनवत असताना आपला मुलगा कोणतेही उत्तेजित पदार्थ घेत नाही ना? कोणते प्रोटीन तो घेतो? घेत असेल तर किती प्रमाणात घेतो, त्याची वेळ किती? त्याला यासंदर्भात कोण मार्गदर्शन करते. या सर्व गोष्टीची जबाबदार पालक या नात्याने चौकशी करणे गरजेचे आहे. कारण चांगली तब्बेत कमी दिवसात बनवण्याचा नादात मुले काही वस्तूंचे सेवन करतात. आपणास त्याकडे लक्ष देता नाही. काही मुले कोणताही अनुभव व माहिती नसताना कोणतेही स्टेरॉड घेतात (इंजेक्शन) त्यामुळे अश्या घटना मुलांच्या जीवनात घडत आहेत.
मुलांनी देखील कोणताही निर्णय घेण्याअगोदर सर्व गोष्टीचा सारासार विचार करायला हवा. आजकाल मुलांच्या पालकांनी सावध पवित्रा घेतला पाहिजे. आपला मुलांशी (मुलगा/मुलगी) वेळ काढून बोलले पाहिजे, संवाद साधून त्यांच्या मनात काय चालले आहे, आपण समजून घेतले पाहिजे. वर्षातून काही दिवस त्याना आपल्या गावातील (समाज विषयक) गोष्टीची, आपले नातलगासह परिचित व्यक्तींची (आदर्श कार्य) ओळख करुन द्यायला हवी. यातूनच आजकाल हरवत चाललेला संवाद पुन्हा साधला पाहिजे आणि सुसंस्कारीत पिढी निर्माण केली पाहिजे.

लेखक : पै. इंजि. समाधान कोळेकर,
आरेवाडी (सांगली)
संपर्क : 7498465530
नवी उर्मी
हिर्रर्रर्र त्या तिथं पल्याड माळरानावं बारक्या धनगर आपली मेहरं राखीत व्हता. सुर्व्या डोईवर सरकत आपली ताप चौफेर फेकीत वैशाकाच्या धगीची जाण करू देत व्हता. बारक्या ईसाव्यासाठी मेहरानां हाकीत पाणवठ्याच्या दिशेला निघाला, पन त्याची पावलं नेहमीपेक्षा झपझपा पडत व्हती कारन… अंगाला नुकतीच हळद लागलेली… आज शिदोरी घिऊन ती यणार या कल्पनेनीच पावलं धावत व्हती जणु. पन इतक्यात
दोन आरदांड गडी शड्ड ठोकीत आरोळी देत बारक्याला थांबवन्याचा प्रयत्न करीत व्हते. बरक्या थांबला ते गडी जवळ आलं तसं त्याचं अवसानच गळालं कायतरी बला आली हे त्याला जाणवलं.लय माजलाईस का रं शेळपाट्या,धडं बसलं व्हय कानाचं तुह्या… अशा शब्दात दटाल्याव बरक्यानं अर्जवी सुरात ईचारलं कायज.बकरी पायजेत, पाटलाच्या पोराच लगीन झालय त्याच्या जागरणाला,न्हायजी समदी कोकरं आणी पाजणीच हायती, तवा…. वाक्य पुरं व्हत नाय तोच एकानं तुच्छ कटाक्ष टाकत सरळ खांडात शिरून दोन मेहरं वढीत भाईर काडली तसा बारक्या कळवळुन म्हनला भिकाभाव(त्या दोन इसमांची नांव भीका आणी तुका) नागा नगा असं करु नगा जी. तसं तुक्यानं गचांड धरलं अन बारक्याला बुकलाय सुरवात केली ते बघुन भिक्यानं बी आपली रग दावीत हात साफ केला,बारक्या इव्हळत इनती करीत पाय धरीत असहाय धडपत त्यना रोखन्यची कोशीश करीत….पन त्यांनी दोन दोन मेहरं धरुन चालावली, ती मेहर पन असहाय मागं वड खात व्हती त्यानलाबी जनु जायचच नवतं तरीबी दे दोन बिनभाड्याचे दैत वाढीव जोरानी म्होरं वडीत चाललं व्हतं.
इकडं बारक्या उसनं आवसान आनित उठला जणु काय तापल्या सुर्व्यातुनच
इकडं बारक्या उसनं आवसान आनित उठला जणु काय तापल्या सुर्व्यातुनच नवी उर्मी मिळाली. आपल्या कमरची गोफन काढली दृढ निश्चय केला आन दगड भरला अन हातानी वेग घेतला चक्रावानी सुदर्शन चक्रावानी फिरत व्हती गोफन…..सुटला दडग सुटला घु….घु…..घु करीत..बारक्या येरवड्याच्या जेलात…विद्रोह…

लेखक : आनंद नामदेव कोकरे
दिवे, पुरंदर.
झाडांमध्ये जीव आहे...
आम्हाला कधी कळेल
झाडांमध्ये जीव आहे
सपासप चालवतो कुऱ्हाडी
माणसानेच केली जंगल तोडी
ऑक्सिजन ची कमतरता आता भासत आहे
तेव्हा कुठे समजते
झाडे सुद्धा महत्वाची आहे.
झाडे संवेदनशील असतात
स्वार्थ न बाळगता
ते सतत काहीना काही देत असतात
तळपत्या उन्हात देतात सावली
फळे फुले यांनी सजीवांची गरज भागवली
प्राणवायू देतात मोफत
झाडे भेद कधीच नाही करत…
पण माणुस लई स्वार्थी
आपली गरज भागविण्यासाठी
झाडे मुळातूनच तोडली
निर्माण केली सिमेंटची जंगले
कृत्रिम झाडांनी सजवले बंगले
कृत्रिम झाडे आपल्याला काही देत नाही
तेव्हा कुठे समजते
झाडात सुद्धा जीव आहे
समजून काय उपयोग
उमजून घेण्याची इच्छाच नाही
माणुस बुद्धिवान प्राणी
पण मेंदु त्याचा गंजुन गेला
निसर्ग आपल्या फायद्याचा कि तोट्याचा
अजुन उमजलाच नाही त्याला
माणसाने अक्कल गहाण ठेवलेली आहे
कारण त्याला समजत नाही अजुन
झाडात सुद्धा जीव आहे
झाडे खुप काही देतात
जगण्याचं बळ
भुकेला फळ
आयुर्वेदिक औषधी
फुले ठेवायला पुजेमधी
आणखी काय दयायला पाहिजे
झाडे खरंच कल्पतरू आहे
जे मनात आणता
ते निसर्ग देत आहे
म्हणुन निसर्ग हा आपल्यासाठी
देव आहे… देव आहे…
निसर्ग पुजायला शिका
निसर्ग नियमांप्रमाणे जगायला शिका
परिस्थिती पाहतच आहोत
म्हणुन निसर्ग रक्षण करायला पुढे या…!

कवी : राहुल दादा बिचकुले
तुक्याचं लगीन
दोन पोरींच्या पाटीवर ताईबाईला नवस करुन झालेल्या तुक्याला उद्या पोरगी बगायला जायचं, म्हणून सजा म्हातारीच्या पायाला पाय नव्हता. चाळीशी पार केलेला तुक्या बिनलग्नाचा हुता. दिसच तसं आल्यातं. त्याला कोणी काय करणार? प्रत्येक पोरीला शहरात राहणारा आणि नुकरीवाला पोरगा पाईजी असतुया. शेतकऱ्याला आणि रोजगारीनं जाणाऱ्याला कोण लागलं म्होरं हुन पुरगी द्यायला.
पण जवापासून मान भागात आपल्या बिदागीरीची पोरं आहे आणि जमण्यासारखं आहे आसं जवा तिच्या लांबच्या भावाकडनं समजलं तवापासुन सजा म्हातारी सगळ्या काळ्या मळ्यात फिरून सांगून आली. उद्या आपणास माझ्या तुक्याला पोरगी बगायला जायच आहे म्हणून. सजा म्हातारीची ही धावपळ व गडबड बगुन कमला म्हातारी बोलली, सकाळी उगवत्या दिसाकडं तोंड करून गाडी हलवा. आदीच लय विघ्न आलेत. कमला म्हातारीचं ही शब्द ऐकून सजा म्हातारी जाग्यावर थांबली. कारण तिजा बेत हुता मोटारसायकल वरती जायाचं. पण कमला म्हातारी म्हणली. चांगल व्हान करून जावा. म्हंजी पाव्हण्याला पण बरं वाटल आणि तीच म्हणाली वरच्या आळीच्या पकाचं डमडम आहे बग. त्याला इचार आणि जावा त्यात.
कमला म्हातारी बोललेलं ऐकून, त्याच इचारात सजा म्हातारी वरच्या गल्लीत पोचली आणि पका टमटम वाल्याच घर जवळ केलं. पका तात्यानं इचारलं, का आलतीस आज घरला? आय रानात गेल्या संद्याकाळी तु ये. सजा म्हातारी बोलली, नाय तुझ्याकडं आली हुती. पकातात्या म्हणाला, माझ्याकड? काय काम काढल आज म्हातारीनं? त्याला इचारलं, कासारवाडीला किती पैकं लागतील जायला? आपल्याला तिकडं उद्या जायचं आहे. डमडमवाला पका हसून म्हणाला, काय… तुक्याच लगीन ठरलं की काय? म्हातारी त्याला म्हणाली नाय ठरण्यासारखं हाय. बघायला जायच हाय. त्येचं एकदा तांदूळ पडलं की, मी म्हातारी मोकळी झाली बघ. आरं तुझ्याच वार्गीचा माझा तुक्या. आता तुझी थोरली पोरं लग्नाला आली आन माझ्या तुक्याच अजून लगीन नाय. बघ! उद्या येशील नवं? पका तात्या म्हणला, येईन की. आवरा तुमचं. आन २६५० रुपय भाडं हुतंय बघ. पैशाचा आकडा ऐकून सजा म्हातारीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ही एवढं पैक आनि इतर खरच म्हणल की पाच हजारच तोंड बघावं लागत हुतं. पोराच्या सुखासाठी काहीतरी करायला पायजी, ही भावना ठेऊन ती म्हणली, 'ये बाबा करती कायतरी. पैशासाठी काय करायचं या इचारात सजा म्हातारी काळा मळा जवळ करत हुती.
वस्तीवर आल्यावर ती लिंबाखाली बसली व पैशाचा विचार करायला लागली. इचार करत असताना तिला बाजूच्या कुडाच्या मेडीला बांधलेली गाबनी शेळी दिसली. तिच्याच शेजारी शेवरी खाताना तान्ही पाट दिसली. उद्याच्या खर्चासाठी ही पाट विकायचं व पैशाची जोडणा करायची या इचारानं शेजारच्या वकील बापूला सांगितलं, ही पाट न्या व मला सात एक हजार द्या. वकील बापुनं सहा हजाराला व्यवहार ठरवला. सजा म्हातारीला फक्त आपल्याला लेकाचा सुख दिसत होत बाकी काहीच नाही. सजा म्हातारीनं सगळ्यांना सांगून झाल्यावर ती रोजगार हमीच्या कामावर गेलेल्या तुक्याची वाट पाहत बसली हुती. तीनं तुक्याची इजार शर्ट निरम्यात घालून स्वच्छ धुन ठिवली हुती. म्हातारी तुक्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत हुती आणि कधी एकदा दिस उजडतोय असे तिला झालं हुतं. ह्यो इचार करत असताना तुक्या सायकलवरनं आला. तो उतरतो नाही तोपरेंत म्हातारीनं त्याला ही बातमी सांगितली. आपल्या आईचा आनंद पाहून आपल उद्या जमतंय की काय असेच तुक्याला वाटलं. उद्या लवकर उठायचं म्हणून त्यो लवकर झोपी गेला. सकाळी कोंबडा आरवायच्या आत सजा म्हातारी उठली. कुडाच्या एका बाजूला बांधलेली शेळी बाहेर नेऊन कोंबड्याच्या मोठला बांधली. कोंबड्या सोडल्या व हापशावरून पानी आणून तवलीत तापायला ठेवलं. पाणी तापवत असताना तुक्याला हाक दिऊन उठवलं व त्येच्या हातात बाटलीतील कोळशाची मिसरी दिली आणि आवरायला सांगितलं.
सूर्य कूस बाहेर काडतुय तोपरेंत म्हातारीनं संपूर्ण मळ्याला येडा आणला आवरा म्हणून. लांबचा पल्ला हाय, आवरा लवकर, अस सर्वाना सांगत होती. बगता बगता पका तात्या डमडम घेऊन दारात आला. त्याच्या मधी त्यानं वाकळ टाकली व आवरा लवकर निगूया म्हणून हाक द्यायला लागला. सजा म्हातारीनं ठिवणीतलं लुगडं नेसायला काढलं हुतं. कंबरला पैक खवलं व ती डमडमकड निघाली. एव्हाना सगळी जाणारी माणसं गाडीत बसली हुती. तुक्या आवरून गाडीत बसला हुता. एवढ्यात पुतळा म्हातारी बोलली वटीत घालाय केळाची फणी घेतली का?तुक्या म्हणला, 'नाही राहिल्या डालत तशीच. आता आणतू म्हणून उतरायला लागला. तेवढ्यात सदा नाना म्हणला तु कशाला उतरतोय आता? चालत्या गाडीला नाट लावायला. हे शब्द ऐकताच सजा म्हातारी ओशाळली. तरीपण चला आवरा म्हणून गाडीला बटन दाबलं. गाडी जोमानं निगाली. मजल दरमजल करत कासारवाडी जवळ करत चालली, प्रवासात असताना अनेक जुन्या गोष्टीना उभाळा मिळत होता. गप्पा गोष्टी रंगात आल्या होत्या आनि मध्येच ज्ञानू आबा म्हणाला तुक्याचा बा केरबा असता म्हंजे लय बरं झालं असतं बघा. आपल्या धन्याच नाव काढल्यावर सजा म्हातारीला चर्रर्रर्र झाल आणि त्यो जीवनातला काळा दिस तसाच दिसू लागला.
तीस वर्षाच्या पाठीमागची ही गोष्ट तवा तुका लहानच होता त्याला घेऊन सजा म्हातारी आणि तीझा मालक केराप्प दादा उसतोडणीला गेली होती, गावातील अजून हातावर पोट असणारी बरीच लोक हुती सोबत, सगळी एका जीवान राहत हुती, कारखाना ज्या बाजूला हाय त्या बाजूला सगळी पाल मारून आभाळाच्या छताखाली राहत हुती. सजा म्हातारी व केराप्प दादा उस भरणीला असायची, कारण केराप्प दादा भरणीला लय ताट गडी. असाच एके दिवशी उस भरून घेऊन जात असताना वगळाटीकडला ट्रॅक्टर घसरला व केराप्प दादा त्या उसाखाली घावला व जीव गुदमरून गेला , सजा म्हातारीनं तो प्रसंग बगुन हंबरडा फोडला पण नशिबाचा फासाच त्या दिवशी उलटा होता त्याला कोण काय करणार , तेव्हाचा दिस आणि आजचा दिस आहे तसाच आहे. सजा म्हातारी सर्व प्रसंग आठवून आतल्या आत तिची घालमेल होत होती. आये बोल की गप का हायच म्हणल्यावर सजा म्हातारी भानावर आली . एव्हाना कासारवाडी ही जवळ आली होती .
कासारवाडीच्या आल्याड सजा म्हातारीच भाव हुबा हुता. त्याला बगुन गाडी थांबवली. कारण त्यानच ही स्थळ काढलं होतं. बोलता बोलता गाडी कासारवाडीच्या पाव्हण्याच्या दारात आली. पोरीच्या बापानं राम राम घातला व पाणी देऊन आत बसायला बोलावलं. सजा म्हातारी बैचेन होती. काय हुतय, कसं हुतंय म्हणून. मनोमन देवाला प्रार्थना करत हुती माझ्या लेकाचा एवढं जमुदि.
च्यापाणी झाल्यावर मुलगीला बाहेर बोलावलं आणि पोरीला पाहून कमला म्हातारी म्हणली, पाठ जरा वरतं सार. तुळईखाली येतूय आणि उजवा पाय टाकून पाठावर बस. तिला बसलेली पाहून सजा म्हातारीला इतर बायका म्हणल्या, पोरगी एक नंबर हाय. आता फक्त जमायला पाईजी. तेवढ्यात मुलीच्या बापानं तुक्याला इचारलं. काम काय करता? तुक्या म्हणला, रोजगारीनं जातूय सडकंवर कामाला. आन पाटलाचं श्यात हाय, तित बी जातूय, काम नसल्यावर. हे ऐकताच पाठावर बसलेल्या पोरीचा चेहरा पडला आनि तो क्षण काय सजा म्हातारीच्या नजरतनं सुटला नाय. थोडया वेळानं सजा म्हातारीच्या भावाला पाव्हण्यानं बाहेर बोलावून नेलं व कायतरी कानात सांगितलं. सजा म्हातारीचा जीव मात्र खाली वर होत हुता. सगळा कार्यक्रम झाल्यावर गाडी पुन्हा आहे त्या मार्गानं निघाली. थोडया अंतरावर आल्यावर पका तात्यांनं इचारलं, काय म्हणलं मगाशी पाव्हनं?ओशाळलेल्या आवाजात तुक्याचा मामा म्हणला, ही राहिली आपण दुसरी बघू पोरगी. हे शब्द ऐकताच सजा म्हातारी गपचिप बसली. तीनं सगळं काही समजून घेतलं हुत. ही बी हातचं पाव्हणं जात्यात ही म्हातारीनं वळखलं होतं.
दिवस मावळतीकड झुकत हुता आणि आभाळ मोठ्यानं गरजत हुतं. गावाकडच्या बाजूला धो धो पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट चालू हुता. शेळ्यामेंढ्याचा आवाज येत हुता. सजा म्हातारीला काही सुचत नव्हतं. गपचिप टिकून बसली हुती.
कमला म्हातारी, सजा म्हातारीला बोलली, घर आलं उतर आता. एकीकडं पका तात्या गाडीच भाडं मागत हुता. सजा म्हातारी भानावर आली आणि बाहेर बगती तर एक मेड मूडली हूती छपराची लावलेली. शेवरीची बंदाटी उडून गेली होती. निम्मा कुड ढासळला हुता. शेळीनं खुट्टा उपसून हैदुस घातला हूता. कारण तान्ही पाट वकील बापू सोडून घीऊन गेला हुता. कंबरेच पैकां काडून देताना सजा म्हातारीला एकच विचार येत हुता माझ्या तुक्याच्या नशिबात तांदूळ धरलं आहे की नाही, याच इचारात ती खाली उतरत होती. आहे त्या परिस्थितीमध्ये मायलेकरं घरात आली त्या दिवशी उपाशीच झोपली.
हा प्रसंग होऊन आता दोन महिन हुन गेलं हुत, तुक्या नेहमीप्रमाण कामावर जात हुता. गावातील त्याच्या वारगिची किंवा मोठी लोक बोलावून घ्यायची व मी तुला एक पोरगी बघितल्या म्हणायची. लग्नाचा विषय काढला की तुक्या ही आनंदी होयचा आणि तितच बैठक मांडायचा आणि समोरचा माणूस मात्र निर्दयी होऊन त्याच्याकडून लाकडं फोडून घ्यायचा व इतर ही काम करुन घ्यायचा. कोण आपल्या शेताला पाणी पाजून घ्यायच तर कोण खात टाकून घ्यायच सगळ्यां निर्दयी लोकांना तुक्या बिनपगारी गडी मिळायचा आणि संध्याकाळी घरी सांगत यायचा आये आमुक गावाला पाव्हणं आहेत म्हणून सांगितलं आहे. आजकाल लहान पोरं ही सायकलवरून जाताना त्याला म्हणतात, ये तुक्या लगीन कधी रं तुझं? समद्या गावाचं लहान थोराचा चेष्टचा विषय म्हंजे 'तुक्याच लगीन' झालं आहे. तुक्याच्या आईला सजा म्हातारीला हे सर्व समजत हुतं. पण हे सर्व तुक्याला समजतं असेल? का त्याला समजूनच घ्यायच नसेल हे त्या देवालाच माहिती. सजा म्हातारी मात्र नेहमी याच विचारात असते. माझ्या तुक्याच कसं होणार … माझ्या तुक्याच कसं होणार.

ग्रामीण कथालेखक : समाधान कोळेकर
मार्गदर्शक :दाजी कोळेकर
आरेवाडी ( 7798965801)
महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...
जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...
-
माझ्या गावातलं जागृत देवस्थान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवस्थान श्री सिद्धनाथ मंदिर माणकोबावाडा ( shri siddhnath mandir mankobawada...
-
शिवबा कुणाचा मराठी मनाचा मराठी मन कुणाचे महाराष्ट्रातील मातीचे आठरापगड जातीचे ! महाराष्ट्र असो व इतर राज्य, राज्य सोडा द...
-
धनगरी साज एक वेगळीच बाज रानोवणी घुमतो मेंढ्या हाकण्याचा आवाज भीती नाही कशाची भाळा देवाचा भंडार असा वीर शोभतो तळपती कुऱ्हाडीची धार अंगी साधेप...
-
माझा समाज आणि शिक्षण मनामध्ये येई विचार माझा समाज धनगर शिक्षणाची जरी इच्छा फार परी जिवनाचा प्रवास खडतर आम्ही राखतो मेंढर होऊनी जीवावर उ...
-
वंदन माझे महाराष्ट्राच्या राजाला छत्रपती शिवाजी राजाला वंदन माझे बा मल्हारबाला त्यांच्या थोर कर्तुत्वाला वंदन माझे पुण्यश्लोक मातेल...








.jpg)
.jpg)
.jpg)

