श्रावण महिना म्हटलं कि, व्रतवैकल्य आणि सणांचा महिना असतो. या महिन्यांमध्ये अनेकजण उपास तापास करून देवाची प्रार्थना/आराधना करीत असतात. तसेच श्रावण सोमवार हा विशेष भक्तीचा वार मानला जातो. याच वारी सांगली जिल्ह्यातील इरळी येथील प्राचीन महादेवाच्या मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी होत असते. या महादेव मंदिराचा प्राचीन इतिहास आणि सद्यस्थिती याबाबत थोडक्यात…
पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली हा एक ऐतिहासिक वारसांनी नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये अनेक पर्यटनस्थळे असून सर्व स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. ज्याप्रमाणे रामलिंग, गणपती मंदिर, ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा, सागरेश्वर अभयारण्य, रेवणसिद्ध मंदिर, श्री खरसुंड सिद्धनाथ (खरसुंडी सिद्धनाथ) मंदिर, वारणा धरण, चांदोली अभयारण्य, दंडोबा हिल स्टेशन, शुक्राचार्य व बिरोबा मंदिर आरेवाडी. याचप्रमाणे इरळी या गावामध्ये प्राचीन मंदिर बरेच काही पाहण्यासारखे आहे.
सांगली जिल्ह्यातील इरळी (ता. कवठेमहांकळ) हे असेच एक ऐतिहासिक गाव आहे. सांगली पासून ६० किमी अंतरावर असलेले प्राचीन गाव असून धाकल्या आणि थोरल्या ओढ्याकाठी वसलेले पाहावयास मिळते. जुन्या जाणत्या लोकांच्या मतानुसार, इरळी हे सात वेशींचे होते. पण आता आपणांस पहावयास मिळत नाही. तसेच आसपासच्या पंचक्रोशीत ओलेकर सरदारांचा विशेष रुतबा, दबदबा होता. त्यामध्ये यशवंतराव ओलेकर यांचे छत्रपती शाहू महाराजांप्रती आदर आणि स्वराज्यनिष्ठा/स्वामीनिष्ठा धरून होते. छत्रपती शाहू महाराजांची कधीही न सोडलेली साथ आपणास दिसून येते. मराठ्यांच्या सुवर्णकाळात आपला अविट ठसा उमटविलेला दिसतो.
इरळी गावास प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला असून साधारणपणे ९ व्या ते १३व्या शतकापर्यंत शिलाहार, यादव, चालुक्य, पुलकेशी, कलचुरी व गंडारादित्य या राजवटीचा प्रभाव दिसून येतो. कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगाव या भागावर शिलाहारांची राजवट होती. शिलाहार काळातील प्रजा धार्मिक स्वरूपाची असल्यामुळे त्यांनी मंदिर, मठ, मुनी, विद्यार्थी, अभ्यासगत यांना आश्रय व भोजनासाठी दान दिल्याचा उल्लेख वेगवेगळ्या शिलालेखात आढळतो.
शिलाहारांच्या राजवटीमध्ये हिंदू धर्म चांगल्या अवस्थेत होता. शिलाहारांच्या लेण्यांमध्ये मंदिरामध्ये शिव, विष्णू, आदित्य, ब्रह्मा, महालक्ष्मी, योगेश्वरी, भगवती आदि देवतांचे निर्देश आढळून येतात. शिलाहारांचा नृपती गंडारादित्य व त्यांची पत्नी कर्णादेवी होय. राणी कर्णादेवी जैनधर्मीय होती. त्याचा पुत्र विजयादित्य होय. गंडारादित्य कोकण अधिपती मिरिंज देशाचा प्रमुख होता. मिरिंज देशाचा म्हणजे आताचे मिरज होय. आणि या मिरज जवळील इरकुडी म्हणजेच इरळी या गावी राजा गंडारादित्यने शिव, बुद्ध, जैन मंदिरे उभारली व पूजाअर्चेसाठी एक एक अशी तीन निवर्तने भूमी दान दिले आणि गंडसागर तलाव खोदण्यात आला.
इरळी गावांमध्ये आज मितीस प्राचीन शिवमंदिर दिसून येते. समोरासमोर दोन गर्भगृह आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये एक शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली दिसून येते. शिवमंदिराच्या गर्भगृहाला समोर मंडप आहे. या आयताकृती मंडपाला दोन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारावर छान नक्षीकाम केलेले आपणास पहावयास मिळते. मंडपाचे खांब चौरसाकृती असून त्याच्या सभोवताली देखील नक्षीकाम केलेले आहे. छताच्या मध्यभागी उत्कृष्ट काम केलेले पुष्पवर्तुळ आहे. मंदिरावर प्रामुख्याने रामायण-महाभारतातील शिल्पे, मुर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत. मूर्ती मागील शास्त्र/विज्ञान समजणे गरजेचे आहे. प्रत्येक मूर्ती प्रतिमा तयार करण्यामागे अध्यात्मिक अधिष्ठान असे धार्मिक पौराणिक कथेला अनुसरून अशाच मूर्ती घडवल्या जात असे. अशा मूर्ती आज आपणास अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. मंदिरावर देवगणाचे, सुरसुंदरीचे अंकन दिसून येते. बहुतेक ही मंदिरे शिवाची आढळून येतात. इरळीमध्ये सतीशिळा, गधेगळ, वीरगळ अशा अनेक मूर्ती इतरत्र रानोमळामध्ये असलेल्या दिसून येतात.
इरळी गावाला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा म्हणजेच महादेवाचे पुरातन मंदिर म्हणजे अजोड नक्षीकाम आणि एक आदर्श वास्तुकलेचा नमुना आहे. श्रावण महिन्यामध्ये भाविकांची सतत वर्दळ येथे दिसून येते. म्हणून सांस्कृतिक/धार्मिक परंपरांची ओळख प्राचीन वारसा जतन करणे गरजेचे आहे. सध्या या मंदिराची अवस्था पाहता या मंदिराचे संवर्धन जतन व डागडुजी होणे आवश्यक आहे. यासाठी इरळी गावातील दक्ष नागरिक स्थानिक प्रशासन आणि तालुका व जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घातले पाहिजे. तसेच यासाठी शासकीय योजना, मदत, निधी मिळवून या मंदिराचे संवर्धन व जतन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच गावचा हा ऐतिहासिक वसा आणि वारसा जपला जाईल.

शब्दांकन
आनंदराव गणपती हाके
इतिहास/लिपी अभ्यासक




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी