शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

आठवणीतली कलाम्हातारी

 एकेकाळी आरेवाडी गावची व त्या भागातील ती एक "सुईण" होती. गावाच्या लेकी-सुनांची सगळी बाळंतपणं तिनेच केली. गावात कुठल्याही बाईचं बाळंतपण असो तिथं कला म्हातारी असणारच. तिच्याशिवाय पार पडणारच नाही ते कार्य. इतका विश्वास होता गावाचा कला म्हातारीवर आणि म्हातारीचा गावावर. तिला गावात सर्वजण कला मानी (माने) म्हणून ओळखत असत. तिच्या हातून ना कधी एखाद्या बाळंतीणीला धोका पोहचला ना कधी जन्माला आलेल्या बाळाला. इतकं सुरक्षित बाळंतपण करायची कलाम्हातारी. गावात एखादी बाई गरोदर राहिल्याचं तिच्या कानावर गेलं की त्या घरी जाऊन ही म्हणणार, "कितवा गं लागला महिना? चांगलं चुंगलं खा पी बाई." असं काय बाय म्हणत तिची विचारपूस करी. एखादी बाई तिचं पहिलं तान्हं बाळ वर्षाचं व्हायच्या आतच दुसऱ्यांदा बाळंतपणाला आली की ही गंमतीने तिची वाट अडवून म्हणणार ! अगं बाई जुळ दिसतंय तुला!

कलाम्हातारी म्हणजे जणू गावगाड्यातली अशिक्षित पण सरावाने प्रशिक्षित डॉक्टरच. कलामानी गावातल्या परसापाच्या वाड्यातील. तिच्यासारखं सुईण बनण्याचा गावगाड्यातल्या अनेक बायकांनी प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. कित्येक वेळा काहीतरी भलतंच होऊन बसायचं. एखाद्या बाईची फुकट आबदा व्हायची. मग पुन्हा कला म्हातारीच्या घराकडं कोणतरी पळायचं. म्हणायचं, "चल लवकर म्हातारे. माझी सून आडलीय." आरं मग अदीच नाय का सांगायचं, तुझा मुडदा बसवला. असं म्हणत म्हातारी हातातलं पान खात तरातरा मागंवाडा मागं टाकून त्या घरात हजर व्हायची. तिच्या हातून लगे मोकळी व्हायची अडलेली बाळंतीन. कुठून शिकली होती ती हे कसब गावाला कधीच कळलं नाही. गावात माहेरी आलेल्या लेकीवर तिचं जास्त लक्ष्य असायचं. एखादीला चिंचा खाऊ वाटायच्या तर एखादीला बोरं. अशावेळी ती त्यांना आणून द्यायची.

एका रात्री पाऊस रात धरून गावावर तुफान कोसळू लागलेला. ओढ्या-नाल्यांना महापूर आलेला ( पूर्वी पाऊस खूप पडायचा ). अशा भर पावसात रानातील वस्तीला असलेल्या कोणाला तरी कळा सुरू झालेल्या (नामोल्लेख करू शकत नाही). वस्ती गावापासून कोसभर अंतरावर. गाव आणि वस्तीच्या मध्ये तुडूंब भरलेला नालाओढा. अशाच भर पावसात कलाम्हातारीला सांगावा गेला. पण म्हातारी झोपलेली. लांबून गावात डॉक्टर आणणं शक्यच नव्हतं. मग कला म्हातारी पोत्याची ख्वॉळ गुंडाळून भर पावसातनं वस्तीवर आली. अडलेली सून मोकळी केली. अशा एक ना हजार गोष्टी कलामानीच्या सुईणपणाच्या ऐकायला मिळतात.

कलाम्हातारी एखाद्या घरात बाळंतपण करायला घुसली की त्या घरातून काहीवेळातच बाळाच्या रडण्याचा ट्यांss ट्यांss आवाज येणारच. कितीही अडल्यानडल्याली बाई असो तिला अलगद मोकळी करून सोडायची कलाम्हातारी. गावात जन्मलेल्या बाळांना पहिला स्पर्श व्हायचा तो कला म्हातारीचाच अगदी लिंबाच्या पाणी हंड्यात उकुळ येईपरेंत आणि अंगोळ घालीपर्यंत काम, ते या म्हातारीच. कितीतरी लेकीसुनांची सुरक्षित बाळंतपणे तिने केली. ती सुईण असल्यानं ती गावातील घराघरात पोहोचलेली होती.

बाळंतपण करायच्या बदल्यात तिला फार काही मोबदला मिळायचा नाही. आणि त्याची ती कधी अपेक्षाही करत नसे. त्या बदली तिला त्या दिवशी चार पाच पानाचं ईडं मिळायचं. कलामानीला पानाची आणि तंबाखूची खूप आवड. बगील तवा पानानं तोंड लाल असायचं. कधी मधी गावात शाळकरी मुलांसाठी 'सुकडी' आली की किंवा तांदूळ शाळंत आला की म्हातारीची गुरुजीवर दादागिरी असायची. कारण कला म्हातारीचे नातू शाळंत असायचं (पूर्वी शाळेत तांदळाच्या पिशव्या मिळत). मी लहान होतो तेव्हा कित्तेक पोरांना म्हातारी म्हणायची तुझा जलम मीच केलाय, म्हातारी ओढ्यात गौऱ्या लावायची अगदी गोलठेल. हुडवा तर असा लावायची जणूकाय गोलघुमट. कला म्हातारीला तपकीर ओढण्याचा सुद्धा नाद आणि माझ्या आज्जीला ही शिवणा कुबडी, कधी घरी आली तर शिवणे म्हणून हाक द्यायची व तपकीर ओढत बसायची. त्यांची गट्टी चांगलीच जमलेली. कारण कोणाच्या लग्नाची भुती असेल किंवा कोणाची रानातली शेरा मापट्याची परडी असंल तर शिवना कुबडी व कला मानी नक्की आसणार तिथं.

बेंदराच्या सणाला कलाम्हातारी कसलाही बैल असला तर धरायची आणि बोटं, हात वर करून गंमत करायची. चालताना मात्र म्हातारीचं दोन्ही हात माग बांधलेलं आणि पायात व्हणा असायच्या. कोल्हापुरी म्हणजे गड्याच्या काळजाची म्हातारी. तर गडी जशा शिव्या देत तसे ती ही द्यायची.

जुन्या गोष्टी अडगळीत जागा धरू लागल्या. नव्या सुधारणा गावात आल्या. या नव्या बदलासोबत गावानं आपली कूस बदलली. कलाम्हातारी आहे त्या कुशीवरच राहिली. नव्या गावातली माणसं बाहेरून चकचकीत दिसू लागली. गावात नव्या डांबरी सडका आल्या. मातीची घरं गळून त्या जागी सिमेंटची घरं यायला लागली. जणू नव्याने गावगाडा बाळंत झाला. हायब्रीड खाऊन बाळंत झालेली ही पिढी हवी तशी चिलीपिली जन्माला घालू लागली. गावात छोटी क्लिनिक उभी राहिली. तालुक्याला पोटात लोखंडी गज घुसवून मोठ-मोठे सिमेंटचे दवाखाने, नर्सिंग होम उभी राहिली. तिथे चोर पावलांनी सोनोग्राफी मशीन घुसल्या. मुलगा पाहिजे तर मुलगाच. मुलीचा गर्भ असला तर लगेच खाली. त्या चकाचक स्पेशल खोल्यातून बायकांची पोटं फाडून पोरंबाळं जन्माला येऊ लागली. एकेकाळी पाच-पाच बाळंतपणं होणा-या घरातील एखादी नवी बाळंतीण नव्या जमान्यात आठवड्याला नर्सिंग होमच्या वाऱ्या करू लागली. या नव्या काळाच्या तडाख्यात कला म्हातारीसारखी सुईण वाऱ्यासारखी गावगाड्यातून बाहेर फेकली गेली. दिवसच बदलले तसे. बदलली नाही ती सुईण. पुढं काळाला झेलत कला म्हातारीही ऊन पावसाळे झेलत थकत गेली. वठलेल्या झाडासारखी वठत गेली. आपल्याच भोवती का फिरतात ही माणसं? का आपलाच पिच्छा धरतात ही माणसं. का येते यांची आठवण कधीतरी निवांत बसल्यावर. कितीही टाळायचं म्हटलं तरी का टाळू शकत नाही. या माणसांना? आपल्यालाच असं का वाटतं. मागील कितीतरी वर्षात गालावर कित्येक लहान पोरांचे मुके घेतलेले पाहिलं. पण जुन्या म्हाताऱ्या जेव्हा लहान पोरांचं मुक घेतात तेव्हा (ट्रू) असा आवाज काही कानातून जात नाही.

…आज कधीमधी गावाकडे घरात कोण बाळंतीण झाली की हमखास कला म्हातारीच नाव निघतं.
काही व्यक्ती अशा असतात कि, त्यांच्या कार्यातून त्या अजरामर होतात. आज गावाकडच्या कित्येकांच्या जन्माच्या वेळी कला म्हातारीचा पहिला स्पर्श झाला असेल. माझ्याही जन्माच्या वेळी पहिला स्पर्श कला म्हातारीचा झाला आहे, माझी आई मला नेहमी सांगते.
धन्य ती कलामानी अर्थात कलाम्हातारी.

लेखक : समाधान कोळेकर
मार्गदर्शक : दाजी कोळेकर
आरेवाडी, सांगली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...