रविवार, ५ डिसेंबर, २०२१

श्री महासिद्ध चरित्र भाग २

 

पहिल्या भागात आपण श्री महासिद्ध यांचे वडील व आई यांना कशा रितीने दुष्काळामुळे दूर कर्नाटकात जावे लागले हे पाहिले तसेच त्यांनी दरोडेखोरांचा कसा बंदोबस्त केला हे पाहिले. या भागात आपण महासिद्ध यांचा जन्म व बाल लीला यांची थोडक्यात माहिती घेऊ.

कन्नबाई व जाबन गौड यानी शिखरशिंगणापूर च्या महादेवाची मोठी आराधना केली परंतु अजूनही त्यांच्या पोटी मूल बाळ नव्हतेच. हजार गाय वासरे दावणीला होती. दूध दुभत्याचा पूर होता लोण्या तुपाला खंड नव्हता. नव्हता तो फक्त मायेचा पान्हा. आणि याच मुळे गोविंदपूर मधील स्त्रिया कन्नबाई यांच्या विषयी वाईट बोलू लागल्या. समाजाची रीतच होती.वांझोटी स्त्रियांना अपशब्द बोलले जात होते. सवाष्णीचा मान पान दिला जात नव्हता. धार्मिक कार्यात पुढे केल जात नव्हते. ह्या मुळे कन्नबाई व जाबनगौड मनातून दुःखी असत. महादेवाचा धावा करत. एके दिवशी जाबन गौड यांना स्वप्नात साक्षात्कार झाला. व त्यांना मुमेटगिरीच्या अमोग सिध्दाने दर्शन घेण्यासाठी आरकेरी मुमेटगिरी ला बोलवून घेतले. सकाळी उठून जाबनगौड यांनी झालेला साक्षात्कार कन्नबाई हिस सांगितला. तिनेही लगेच जाण्याची तयारी केली. गोविंदपासून आरकेरी तसा लांबचा प्रवास तो ही पायी करावयाचा होता. त्यासाठी योग्य ती शिदोरी देऊन जाबनगौड यांना अमोगसिद्ध यांच्या दर्शनाला पाठवले. मजल दर मजल करत जाबनगौड आरकेरी ला पोहचले. श्री अमोगसिध्दाचे दर्शन घेतले. तेंव्हा अमोगसिध्द यांनी अमोगवाणी केली ती अशी ,"तुमच्या पोटी जन्म घेणारे बाळ हे साक्षात शिखरी च्या शंभूमहादेवाचा अवतार असून तो लोक उध्दाराचे पवित्र कार्य करणार आहे. परंतु पहिल्या मुलाला माझी सेवा करण्यासाठी पाठवावे लागेल." जाबनगौड ह्या अमोगवाणी ने धन्य पावले. अमोगसिध्द यांना वचन देऊन परत घरी आले. घरी येऊन कन्नबाईंना सारा वृत्तांत सांगितला त्याही आनंदित झाल्या. महादेवच आपल्या पोटी जन्मला येईल हे ऐकून त्या धन्य पावल्या. लवकरच महादेवाच्या व अमोगसिध्द यांच्या आशिर्वादाने उभयतांना लवकरच पुत्ररत्नाची चाहूल लागली. आणि यथावकाश महाशिवरात्री दिवशी बाळ जन्मला आले. संपूर्ण पांढरे कुळाला आनंद झाला. थोरला पुत्र जन्मला आला. सकळ महाराष्ट्र व कर्नाटक भागातील जनता आनंदली. कन्नबाई व जाबन गौड यांच्या परमभक्तीला महादेव पावला. महासिद्ध जन्मला आले.

महासिद्ध यांच्या जन्मावेळची सुरस कथा.

बाळ जन्मला आल्या नंतर बाळाची कुंडली बघण्यासाठी व नामकरण सोहळ्याची तारीख ठरवण्यासाठी ज्योतिषाच्या कडे गेले. ज्योतिषाने नामकरण सोहळ्याची वार ,तिथी सांगून कुलदेवतेला नरबळी देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. नामकरण सोहळ्याची जोरदार तयारी गोविंदपूर मध्ये सुरू होती परंतु नरबळीची चिंता जाबनगौड यांच्या मनाला सतावत होतीच. त्या दिवशी नेमके जाबनगौड यांना घरी यायला रात्र झाली. तेंव्हा तीन चोर त्यांना लुटायच्या उद्देशाने आले. त्यांनी जाबनगौड यांच्या कडे सोन्याची मागणी केली असता, सोने घरी आहे घरी चला घरी भरपूर सोने आहे अशी थाप दिली. चोर ही आंधळा विश्वास ठेऊन जाबन गौड यांच्या घरी आले. नरबळी देण्याची ही चांगली संधी समजून जाबन गौड यांनी त्या तिघांना गोड बोलून देव घरात नेले आणि क्षणाचाही विलंब न करता दोन चोरांची मुंडकी तलवारीने धडावेगळी केली. परंतु या झटपटीत तिसरा चोर दगड्या मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याने ह्या गोष्टीची तक्रार हलसंगी येथील बादशहा अथवा बादशाहचा वजीर याच्या कानावर घातली. बादशाहने जाबन गौड यांस बंदी बनवण्याचा हुकूम केला. बादशहा समोर त्यांना उभे केले असता त्यांनी साफ नकार दिला व खरे खोटे करण्यासाठी प्रत्यक्ष घरी येण्याची विनंती केली. बादशहाने काही सैनिक घरी पाठवले तेंव्हा बाळ महासिद्धने सैनिकांना अडवले. सैनिकांनी कोण आहे विचारले असता सिध्द सुलतान असे सांगितले. सैनिकांनी देवघरात जाऊन पाहिले असता तिथे बोकडाची मुंडकी दिसून. बादशाहाने जाबनगौड यांची निर्दोष मुक्तता केली. जाबनगौड यांनी घरी येऊन मोठ्या थाटाणे महासिद्ध हे नाव ठेवले परंतु पुढे ते मादाण्णा , मादुलिंग ,सिध्दसुलतान या नावाने ओळखले जाऊ लागले.

महासिध्दाच्या नावाने चांगभलं…

क्रमशः

( ही मौखिक कथा असल्याने स्थानपरत्वे , वेगवेगळ्या गावात वेगवेगळी कथा सांगितली जाऊ शकते. परंतु कथेचा मुख्य गाभा बदलत नाही. )

(पुढील भागात महासिद्ध व आमोगसिध्द भेट. )

धन्यवाद.

श्री मधुकर सर्जेराव हाक्के
(पुजारी श्री महासिद्ध मंदिर कवलापुर) 9049500097

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...