हरी नाना दोन दिवस झाल गपाचीप हुता . एक फाटक पोत टाकून आंब्याच्या झाडाखाली बसला हुता, आणि हरी नानाची म्हातारी मात्र रानात खुरपत असताना काही बाय बरळत हुती .आणि हरी नाना बसणा नाही तर काय करणार , नानाच्या घरात चार दिस झाल दोन्ही पोरांनी धुडगूस घातला हुता . त्यांना वेगळं राहायचं हुत. थोरला किसना आणि धाकला सदा या दोघांच मात्र अलीकडं एकमेकांना काही पटणा झालं हुत . नेहमी एकमेकांना तरकी यायच दोघ पण. रोज उठ की सूट या ना त्या कारणावरून दोघात जुंपलेली असायची . हे रोजच झालं हुत हरी नाना ला आता . त्यामुळे हरी नाना आता चितगती हुता . या पोरांचं काय हुनार याच विचारात नाना असायचा.
दोघां भावांना आता वाटणी हवी हुती आणि मदन पडदि घालून घ्यायची हुती, दोघांना ही वेगळा संसार थाटायचा हुता . नाना खूप समजावून सांगत हुत एवढ वरीस काढा एकत्र म्हणजे बर होईल चार काम दोघांच्या ताकतीने हुतील पण पोरं मात्र ऐकायला तयार नव्हती आमचा तुकडा पाडून हवा म्हणून तग लावून बसली हुती, याच कारणावरून रोज घरात हैदुस असायचा . हा हा म्हणता हरी नाना च्या घरचा हा विषय साऱ्या वस्तीला माहिती झाला, आणि साऱ्या वस्तीवरील लोकांना एक चर्चेला विषय मिळाला .
हरी नानान साऱ्या भावकी मधी ताकतीने संसार उभा केला हुता , कधी बैलाचा , कधी शेळ्याचा व्यपार करून दोन एकर जमीन विकत घेतली हुती , चार बुक पोरांना शिकवली हुती , दोघांची लग्न करून दिली हुती , लग्न झाल्या नंतर दोन वर्ष गुण्या गोविंदान राहिली पण सुन्या आल्यावर भांड्याला भांड थटायला लागला , एकमेकिंचा इसाळ चालू झाला. आनी यातच कुणाच कुणाल इचार पटणा. जो तो ज्याच्या त्याच्या मर्जीने वागायला लागला , तो करल का मी करलं यावरून शेतीच उत्पन्न कमी झालं . दोन्ही भाऊ सनावाराला ही कधी एकत्र जेवणात .आपल्या डोळ्या देखत आपली पोरं वेगळी राहणार या इचारात हरी नाना व गोदा म्हातारी गपचिप स्वतःच्या इचारात दिवस काढत हुती .
दिवस मावळतिच्या सुमारास असताना हरी नाना पान खात सोप्यात बसला हुता, आपल्या पोरांचं कस होणार या इचारात असताना थोरला किसना म्हणाला नाना उद्या गावातील पंच पाटील येणार आहेत जी काय आहे ती वाटणी करून घेणार आहे आम्ही . किसना च बोलण झाल्यावर नाना म्हणाला आर पोरा तू थोरला आहॆस जरा समजिक पणा घी . ते काही जमायचं नाही मला म्हणून किसनान आवाज चढवला,मला फारकत पाहिजी म्हणजे पाहिजी असा बोलून किसना रागानं निघून गेला . हरी नाना ला मात्र रातभर डोळ्याला डोळा नव्हता आणि लागलं तरी कसा ज्यांना अंगा खांद्यावर खेळवल त्यांना वेगळं हुताना नाना ला पाहावत नव्हतं .
सकाळी नाना उठायच्या आधीच दोन्ही सुनानी पाणी तापवाच्या फुकनी वरण तोंडाचा पठ्ठ चालू केला होता , दोघी पण एकमेकांना कमी पडत नव्हत्या . एवढ्यात गोदा म्हातारीनं आण हिकडं काडी मी बिना फुकारनीची चूल पेटऊन देती म्हणून पुढ सरली तवा कुठं ते भांडण थांबलं .हरी नाना मात्र पाक रया गेल्या गत झाला हुता.
सकाळी दहाच्या टिपनास पंच पाटील आलं आणि सर्वाना समोर घेऊन म्हणाल तुमच्या घरातील सर्व सामान बाहेर काढा ,आता आपण भांड्याकुंड्या ची वाटणी करू मग जमिनीच तुकड करुन देतो .असं बोलल्यावर बायकांनी सर्व बारीक सारिक वस्तू बाहेर आणल्या . आणि वाटणी ला सुरुवात झाली ,आदी पितळची भांडी वाटून दिली व नंतर जर्मनची भांडी वाटून झाली .
सर्व भांडी वाटून झाली का? असा पंचान विचारल्यावर धाकली सुनबाई म्हणाली एक पीतळची ठोक्याची घागर वाटणी मध्ये नायी , ती कुठल्या सांधाडिला ठेवल्या काढायला लावा ,तवर थोरली बोलली ती मी देणार नाही कारण ती माझ्या आईनं मला दिल्या ती माझ्याकड राहणार मग लगेच धाकली बोलली मी पण मग माचोली देणार नाही ती माझ्या बापान बनवून दिल्या . शेवटी पाटील बोललं ठीक आहे तस करा म्हणाल व उठा आता जमीन व जनावर वाटून देऊ असा बोललं , हे सगळं हरी नाना व गोदा म्हातारी खिन्न मनान बघत हुती , त्यांना बगन्याशिवाय काहीच पर्याय नव्हतं ते तरी काय करणार .
सगळी उठून जनावर वाटणीकड गेली , पंच बोलायचं हुत तोवर थोरला किसना म्हणला ढवळ्या बैल माझ्याकड राहणार म्या त्यास संभाळला आहे तो मी कुणाला बी देणार नाही , तवर सदा म्हणाला पाटील तस चालणार नाही घरच्या गायीचं बैल आहे तो त्याचा काय तो मार्ग लागला पाहिजी सगळी वाटणी करताना मलाच खार लावू नका, असा हलक्या स्वरात सदा बोलला. पण किसना काय ऐकायला तयार हुयीना शेवटी पंच बोलल बैलाचं पुनः बघू आता इतर गोष्टी वाटून घेऊया म्हणून सर्व पुढ सरली.
सर्व आलेल्या पंच पाटील यांनी सर्व लहान मोठया जनावरांची वाटणी केली अगदी कोंबड्याच्या मोट सकट. लहान सार साऱ्या गोष्टीची वाटणी झाल्यावर उरला हुता आता जमिनीचा विषय, पाटलांनी आनी पंचांनी किस्नाला आणि सदाला पुढ बोलावल व म्हणले किसना तू इस कर आणि सदा ला उचलुदी नाहीतर सदा तू इस कर आणि किस्नाला उचलुदी . लगेच धाकला सदा म्हणाला मी इस करणार,आणि मीच उचलणार. पाटील बोललं असं होत नसतं .एक काहीतरी सांग ,मग सदा बोलला करू द्या ईस त्याला पण नाळव्यच्या कडलं कासराभर रान आगाव सोडा. त्या बाजूला पीक येत नाही मग कुणाच्याबी वाटनीला येऊ द्या . अश्या बोलीवर सर्व वाटण्या झाल्या . या वाटण्या करत असताना हरी नाना व गोदा म्हातारी जड अंतःकरण करुन सर्व बघत हुती .
सर्व झाल्यावर पाटील पंच घरात आली आणि बसली ,तोवर किसना आपल्या मालकिणीला बोलला चार कप चहा ठिव सर्वाना, पाटील पंच बोलत बसली हुती तोवर सदा ला त्याच्या मालकीण आता बोलावून घेतलं व कानात काहीतरी सांगितलं व लगेच सदा बाहेर येऊन बोलला.
"नवं ते म्हातारा आणि म्हातारीच पण बोलला असता तर बर झालं असत, कारण प्रत्येक वेळी मीच दवा डॉक्टर बगतोय, सदा च हे शब्द ऐकून हरी नाना च्या काळजाचा ठोकाच चुकला आणि बोलला आता आमची बी वाटणी करता की काय, तवर धाकली सून बोलली तस नव्ह मामाजी एकाच्या स्वाधीन असलं म्हणजे बर असतंय .
हे शब्द ऐकून गोदा म्हातारी रडवलेल्या स्वरात बोलली अहो तुम्ही शांत रहा आता ती आणि त्याची बायको चार बुक शिकली आहेत त्यांना सर्व कळत तुम्हला काय समजतं होय.
हे सर्व ऐकून पंच मंडळी बोलली व्हय र किसना काय करायचं यांच तोवर किसना बोलला दोघांकड एक एक द्या संभाळायला , तोवर लगेच किसनाची बायको किस्नाला बोलली आपल्याकड म्हातारीला घ्या उगाच झाड लोट केली तरी ऐकत नाही म्हातारा नुसता खाऊन बसतोय, आता काहीच कामाचं नाही. हे थोरल्या सुनेचं शब्ध ऐकून हरी नाना कासावीस झाला आणि मनोमन म्हणाला ,अंगात ताण हुता तवा गाडी संग पळत हुतु , मोटन दिसाला एकर भर रान पाणी पाजत हुतू , आता उतारवयात अशी अवस्था झाली माजी,म्हणून बसलेल्या ठिकाणी चार चार धारा लावल्या . ते बघून गोदा म्हातारी जवळ आली व म्हणाली आहो मी आहे सोबत नका खचून जाऊ . तेवढ्यात सदा बोलला मग राहूद्या म्हातारं माझ्याकड आणि म्हातारी किसनाकडं .
हे शब्द ऐकून म्हातारीच काळीज चर्रर्रर्र झालं ज्याच्या सोबत आयुष्याच्या काष्ठा खाल्ल्या , सुखात दुःखात सात दिली , आणि आता वेगळं होयच काय नशीब म्हणून गोदा म्हातारी हंबरडा फोडायला लागली . सर्व जण वाटणी करुन निघून गेली सदा न आणि किस्नान पडदी घालून घेतली सर्व वाटणी होऊन आता पंधरवडा झाला हुता . घरात भयाण शांतता हुती एका कोपऱ्यात गोदा म्हातारी भीतीला टिकून बसली हुती आणि हरी नाना एकीकडं टिकून बसला हुता .
जिच्या सोबत आयुष्य घालवल सुख दुःख वाटून घेतल, सात जन्म सोबत राहायची वचन दिली, तिलाच सोडून उतार वयात वेगळं राहायला लागलं, याच विचारात हरी नाना रोज हुंदक देऊन रडतोय, डोळ्यातून पाणी तर येतच नाही पण मनात मात्र हुंद्क्याच्या पूर रोजच येतो,पण ते रडणं ऐकायला व समजून घ्यायला माणूस उरलाच नाही असते ती फक्त आता मधली भिंतच फक्त मधली भिंत.

शब्दांकन : समाधान कोळेकर ( 7498465530)
मार्गदर्शक : दाजी कोळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी