अलीकडच्या १०-२० वर्षांचा टिव्ही, मोबाईलचा काळ पाहता थेट संवाद कमी होताना दिसत आहे. आणि प्रसार माध्यमांसोबत समाज माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. स्मार्ट मोबाईलच्या क्रांतीमुळे या मोबाइलचा वापर अगदी खेडेगावात, घराघरात आणि माणसा माणसात बदल होत आहेत. यामुळे प्रत्येकाच्या संपर्क क्षेत्राचे एक मर्यादित वर्तुळ निर्माण होत आहे. आणि यातूनच कौटुंबिक संवाद हरवत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे.
अलीकडच्या काळात बारीक नजर टाकून निरीक्षण केले तर याची जाणीव होते की, तरुणपिढी ही जास्त आत्महत्या करत आहे. अगदी २० ते २५ या वयोगटातील मुले मृत्यूला कवटाळत आहेत. कित्येक तरुण मुलांच्या मृतदेहाला वडिलांना खांदा देणे व धडाग्नी दिल्याचे प्रसंग पाहायला मिळत आहेत. हे असे का? याची कारण काय? याचा कोणत्याही पालकाने विचार केला पाहिजे. हल्लीची परिस्थिती पाहता असे वाटते की, संवाद कमी होतोय.
पूर्वी कोणतेही सोशल मीडियाचे साधन नसल्याने घरातील सर्वजण एकत्र बसत, कोणताही खेळ खेळत, गप्पागोष्टी, विचारविनिमय, सल्ला मार्गदर्शन करत असत. पण अलीकडे याची जागा म्हणजेच मुलांचा वेळ टीव्ही व मोबाईलने घेतला आहे. मुलगा सातवीला गेला नाही तोपर्यंत त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाइल असतो. यामुळे तो संवाद विसरून जातो. परिणामी त्याची वैचारिक पातळी/कक्षा रुंदावताना दिसत नाही. सध्याचे पालक आपल्या मुलाला अभ्यासाच्या नावाखाली झोपण्यासाठी वेगळी खोली देतात. पण अशाने त्याची मोबाइलशी दोस्ती वाढून मानसिकता बदलत जाते.
काही घरातील दुर्दम्य चित्र म्हणजे बाप व मुलगा एकत्र घरात कधीच जेवत नाहीत. कोणाचं मोठ्या भावाशी जमत नाही, तर कोणाचे वडिलांशी. आजकालच्या पोरांना कशाचे टेंशन (तणाव) आले की लगेच मोबाईल मधील स्टेटस ला टाकायचे "मूड ऑफ". ना आपले दुःख कोणाला सांगतात, ना त्याचे सोल्यूशन शोधतात. फक्त आत्महत्येचा विचार करतात. कोणी एकतर्फी प्रेमातून जीव देतो, तर कोणी नोकरीसाठीच्या परीक्षेत अपयश आल्यावर. पण असे करणे म्हणजे मर्दाचे जीवन नाही, हे या तरुणांना कोणी सांगणार? नाही नोकरी लागली तर आपण जीवनात इतर काहीतरी करू शकतो, ही भावना आजच्या तरुणांमध्ये रुजली पाहिजे आणि रुजविली पाहिजे.
आपला मुलगा काय करतो? कोणाची संगत करतो? रात्री किती वाजता घरी येतो? हे आपण कधी विचारत नाही. कारण मुलांचे व्यसन हेही आजकाल मृत्यूचे कारण बनत आहे. आजकाल नववी दहावीत पोरं देखील व्यसनाधीन झाली आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते कुठे, कशासाठी किती पैसे खर्च करतात, याची विचारपूस वा चौकशी आपण कधीच करत नाही. आपल्या मुलाची चौकशी करणे, ही पालकांची तितकीच जबाबदारी आहे.
परीक्षेत जर अपयश आले तर ही परीक्षा म्हणजे जीवन नाही, हे आपणच आपल्या मुलांना सांगायला हवे. जीवनात इतर कोणताही उद्योग व्यवसाय करू शकतो, हे कोणीतरी या तरुणांना समजावून सांगायला हवे. काही मुले ही अपघातात जातात. पण तो किती गाडी स्पीडने चालवतो, कशी चालवतो? किमान त्याचे ते गाडी चालवायचे कायदेशीर वय आहे का? याची सर्व खबरदारी आपणच घ्यायला हवी.
या हल्लीच्या काळात मुलामुलींना हव्या त्या सुविधा, नको असलेल्या वयात (गरज भासण्याआधी) मिळत आहेत. जेव्हा मुलं मोटारसायकल मागतील, तेव्हा त्याना सायकल द्यायला हवी. कारण असे केल्याने त्याना आहे त्या परिस्थितीमध्ये जुळवून घेण्याची सवय लागेल. आजकाल लहान वयात मुलांना हार्ट अटॅक येण्याचे प्रकार पाहण्यात येत आहेत. हे कशा मुळे होते? तर याचे कारण असेही आहे की, ऐन तारुण्य वयात मुलांना तब्बेत मजबूत बनवण्याचे वेड लागलेले असते. ही चांगली गोष्ट आहे. पण ती बनवत असताना आपला मुलगा कोणतेही उत्तेजित पदार्थ घेत नाही ना? कोणते प्रोटीन तो घेतो? घेत असेल तर किती प्रमाणात घेतो, त्याची वेळ किती? त्याला यासंदर्भात कोण मार्गदर्शन करते. या सर्व गोष्टीची जबाबदार पालक या नात्याने चौकशी करणे गरजेचे आहे. कारण चांगली तब्बेत कमी दिवसात बनवण्याचा नादात मुले काही वस्तूंचे सेवन करतात. आपणास त्याकडे लक्ष देता नाही. काही मुले कोणताही अनुभव व माहिती नसताना कोणतेही स्टेरॉड घेतात (इंजेक्शन) त्यामुळे अश्या घटना मुलांच्या जीवनात घडत आहेत.
मुलांनी देखील कोणताही निर्णय घेण्याअगोदर सर्व गोष्टीचा सारासार विचार करायला हवा. आजकाल मुलांच्या पालकांनी सावध पवित्रा घेतला पाहिजे. आपला मुलांशी (मुलगा/मुलगी) वेळ काढून बोलले पाहिजे, संवाद साधून त्यांच्या मनात काय चालले आहे, आपण समजून घेतले पाहिजे. वर्षातून काही दिवस त्याना आपल्या गावातील (समाज विषयक) गोष्टीची, आपले नातलगासह परिचित व्यक्तींची (आदर्श कार्य) ओळख करुन द्यायला हवी. यातूनच आजकाल हरवत चाललेला संवाद पुन्हा साधला पाहिजे आणि सुसंस्कारीत पिढी निर्माण केली पाहिजे.

लेखक : पै. इंजि. समाधान कोळेकर,
आरेवाडी (सांगली)
संपर्क : 7498465530
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी