शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

ज्याचं जळाल ना साहेब त्यालाच कळालं...

 

वरवंड कोविड केअर सेंटर, वरवंड. अनुभव - समन्वयक : सुभाष फासगे

31 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या कोविड सेंटर वरवंड चे अधिकृत उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. परंतु त्याअगोदर कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरवातीला कोविड सेंटर सुरू करण्यात सर्वात प्रथम विंदा दिवेकर, दिपक अप्पा, मनोज सातपुते, दशरथ तात्या यांची तळमळ आणि धडपड चालू होती. त्याचाच एक भाग गावातील बोर्डिंग मध्ये क्वारंटाईन सेंटर चालू केले. त्यावेळेसचे सरपंच मा.गोरखआण्णा दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, राहुलदादा दिवेकर ,ग्रामसेवक, आपत्कालीन समिती तसेच गावातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी कोविड सेंटर चालू करण्यासंदर्भात शासन दरबारी हालचाली करत मागणी केली, आणि एकदाचे कोविड सेंटरचे मान्यतापत्र ग्रामपंचायतीला मिळाले. परंतु तोपर्यंत पहिल्या लाटेची भीषणता ओसरली असे वाटले, लॉकडाउन उठले गेले आणि पहिल्या सारखे पूर्ववत चालू झाले, वाटले कोरोना आता हद्दपार झाला. पण थोड्या दिवसातच देशात विशेषतः आपल्या राज्यात आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडाला.

वरवंड कोविड सेंटर मधील एक आनंदी क्षण

या कोरोना संसर्गजन्य महामारीच्या महायुद्धात ना औषध, ना गोळया, ना कसले इंजेक्शन ना कसलेच शस्त्र चालत होते, आजूबाजूकडून नुसत्या मृत्यूच्या भयंकर बातम्या येत होत्या. गावातील अनेकजण एक एक करून मृत्यूला कवटाळीत होते .सर्वजण हतबल झाले होते, नेमके काय चालले आहे आणि नेमके काय होईल ? आणि नेमके काय करावे ? फक्त चिंता, काळजी, आणि भीती. कोरोनाची चेन काय तुटायला तयार नव्हती. शासन, प्रशासन, शास्त्रज्ञ, अगदी WHO ने देखील हात टेकले होते, सर्वांचीच दमछाक झालेली होती. अशा वेळेस तलवार कमी ढाली ने बचाव जास्त होऊ शकतो म्हणून यावर लॉकडाउन, क्वारटाईन सेंटर,कोविड केअर सेंटर या संकल्पना जास्त प्रभावी जाणवू लागल्या.
आपल्या गावचे पूर्वनियोजन (सतर्क असल्याने) अगोदरच ग्रामपंचायतिकडे कोविड सेंटर ची मान्यता असल्याने काम सोपे झाले होते. परंतु तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या नवीन बॉडी आली.
नवनिर्वाचित सरपंच मा.सौ.मीनाताई दिवेकर, उपसरपंच मा.प्रदीपभाऊ दिवेकर तसेच ग्रामपंचयात सदस्य व आपत्कालीन समितीने लगेच कोविड सेंटर चालू करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. कोविड केअर सेंटर व्यवस्थापन समिती तयार केली आणि सेंटरची उभारणी करण्यास प्रारंभ झाला.
प्राथमिक केंद्रशाळा वरवंड कोविड सेंटर करण्याचे ठरले. शाळेतील वर्गखोल्या, हॉल,धुऊन घेणे, परिसर सपाटीकरण, बाथरूम व्यवस्था, स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गरम पाण्याची व्यवस्था, मोटार,पाण्याची टाकी, पंखे बसवणे व्हरांडा धुणे अशी कितीतरी बारीक सारीक कामे सरपंच नाणींच्या मार्गदर्शनाने आदरणीय राहुलदादा दिवेकर यांच्या नेतृत्वखाली उपसरपंच श्री.प्रदीपभाऊ दिवेकर, श्री.मारुतिभाऊ फरगडे, श्री.मनोज सातपुते, नाना शेळके, मोतीआण्णा दिवेकर,संदीप दिवेकर, रणधीर, पंडित महाराज आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यां सर्वांनी अथक परिश्रम घेऊन ( राहुलदादा ,प्रदिपभाऊ, मारुतिभाऊ व पंडित महाराज यांनी स्वतः झाडून काढले व रूम धुऊन काढल्या सॅनिटाइझर मारले ) सेंटरची उभारणी केली. मा. डॉ.पांचाळ मॅडम, आरोग्य सेवक बढे साहेब यांचे मार्गदर्शन व वरवंड आरोग्य विभाग कर्मचारी वर्ग यांच्या बरोबर चर्चाविमर्ष, बैठक, नियोजन करून वरवंड कोविड सेंटर शेवटी 31 मार्च रोजी पुणे जिल्हा सह. बँकेचे अध्यक्ष मा.श्री.रमेश आप्पा थोरात यांच्याहस्ते तसेच तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ. पोळ मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाले.
तीन वरिष्ठ डॉक्टर्स, पाच नर्स, व दोन वॉर्डबॉय व एक लॅब टेक्निशियन असा आरोग्य विभागाच्या स्टाफ कोविड सेंटर साठी मंजूर झाला असे समजते. तसेच एक होमगार्ड. कोविड पेशंट्ससाठी नाष्टा, व दोन वेळेचे जेवण वेळेत देण्याचा ठेका आपल्या गावातील आर डी शेलार यांच्याकडे होता. आणि ग्रामपंचायत वरवंड तसेच कोविड व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी दौंड यांच्याकडून कोविड सेंटर समन्वयक म्हणून खास माझी ऑर्डर काढली व जोडीला सहायक म्हणून लक्ष्मण पंडित महाराज घेतले. अशाप्रकारे कोविड केअर सेंटरची व्यवस्था झाली.
कोविड पेशंट्सना शासकीय जेवनाव्यतिरिक्त पौष्टिक आहार म्हणजे नॉनव्हेज चे जेवण, उकडलेली अंडी, हळदीचे दूध, काढा, फळे, सायंकाळच्या चहा , प्राणायाम, मनोरंजन, खेळ, यांची आवश्यकता, गरज असल्या कारणाने कोविड व्यवस्थापन समिती सदस्य, व कोविड केअर सेंटर समन्वयक या नात्याने ग्रुपवर आवाहन केले आणि लगेच क्षणार्धात त्याच दिवशी वरील इतर गरजा पूर्णही झाल्या.
महिन्यातून आठ वेळा म्हणजेच आठवड्यातून दोन वेळचे कायमस्वरूपी नॉनव्हेजचे जेवण देण्याची सेवा सुमन नारायण कन्स्ट्रक्शन समूहाचे मालक मा.श्री.संजयभाऊ जाधव साहेब करतो म्हणाले परंतु त्यांना महिन्यातून दोन वेळेची सेवा दिली बाकी इतर गावकऱ्यांना ही सेवा राखून ठेवली. उकडलेली अंडी देण्याची व्यवस्था मा.राहुल लव्हाजी दिवेकर यांनी घेतली. जो पर्यंत कोविड सेंटर आहे तोपर्यंत प्रत्येक रविवारी पेशंट्सच्या मनोरंजनासाठी ऑर्केष्ट्राचे नियोजन स्वरा ग्रुप कंपनीचे मालक मा.अनिल दिवेकर पाटील यांनी घेतले. उरलेली सेवा सायंकाळचा चहा, प्राणायाम, खेळ, ध्यानधारणा, प्रार्थना व दिलेल्या देणग्या, भेट, जेवणाचे वेळापत्रक त्यांचे फोटो व ग्रुपवर प्रसारित करणे इ.इ. कामे त्यांच्या नोंदी व ही सेवा संत निरांकरी मंडळ वरवंड यांच्याकडे म्हणजेच आमच्याकडे घेतली.
कोविड पेशंटने 10 ते 12 दिवस आपले घर सोडून सेंटर मध्ये त्यांनी राहावे, नाही तर आनंदाने राहावे. तसेच कोविड पेशंट्सना हॉस्पिटल कमी एक फॅमिली ट्रीपचा फील यावा आणि महत्वाचे म्हणजे पेशंट्सने तेथून पळून न जाता कोविड सेंटर मध्ये खिळून रहावे म्हणून त्रिसूत्री मायक्रोप्लॅनिंग केले.
# त्याचाच एक भाग म्हणून "आदर्श नियमावली",सूत्र तयार केले. 1) महिला व स्त्रियांसाठी स्वतंत्र कक्ष तसेच पुरुषांना वेगळा कक्ष 2) पेशंट्सची दिवसातून दोन वेळा सयाचुरेशन नोंदी 3) आंबूलन्स ची सोय 4) दर पंधरा दिवसांनी सर्व खोल्या व व्हरांडा व परिसराचे सिनिटाइझर 5) पेशंट्सना रोज तीन वेळा वाफ घेण्यासाठी नेबुलाईझर सेट 6) रात्रीच्या वेळी चार हैलोजन वापरून परिसर प्रकाशित 7) प्रत्येक रूम मध्ये पंखे तसेच चार ते पाच पुस्तकांची सोय (वाचनालय) 8) पिण्यासाठी फिल्टर पाण्याची सोय 9) आठवड्यातून दोन वेळा म्हणजे महिन्यातून आठ वेळा नॉनव्हेज चे नियोजन 10) दर तीन दिवसांनी उकडलेली अंडी तसेच फळे 11) आठवड्यातून तीन वेळा गरम हळद मसाला दूध 12) दर रविवारी मनोरंजनासाठी ऑर्केष्ट्राचे आयोजन 13) प्रत्येक पेशंटला डिस्चार्ज मिळाल्यावर एक झाड सप्रेम भेट (ऑक्सिजन साठी) 14) सर्वांना दररोज प्राणायाम 15) परिपाठ ( ध्यान धारण ,समाधी,प्रार्थना,प्रेरणादायी गोष्ट, व सर्वांसाठी बालपणीचे खेळ )
# मायक्रोप्लॅनिंगचा दुसरा भाग "पेशंट्सचे वेळापत्रक" तयार केले. ते असे सकाळी 5 ते 7.30 पर्यंतअंघोळ 8 ते 8.30 पर्यंत नाष्टा. 9 ते 12 वाचन, इनडोअर खेळ (गजगे,चाललासाठ, गोट्या,इ.) 12 ते 1 दुपारचे जेवण 2 ते 4 दुपारची झोप, सायंकाळी 5 ला चहा 5.30 ते 8 पर्यंत ग्राउंड वर ( श्वासनावरील व्यायाम ,प्राणायाम, ध्यानधारणा, मनोरंजन, प्रार्थना, गंमतीचे लहानपणीचे खेळ,इ.इ.) रात्री 9 ला रात्रीची झोप.
# तिसरा भाग म्हणजे "पंचसूत्राचा फॉर्म्युला" तयार केला. 1) पौष्टिक आहार ( खाण्यात पिण्यात कसलीच उणीव व कमतरता पडू द्यायची नाही ) 2) संपूर्ण झोप (दुपारी व रात्री) 3) सकारात्मक विचार ( खेळ,गोष्टी,माहिती व प्रवचन,) 4) लक्षनारूप उपचार ( दोन वेळा स्याचुरेशन नोंदी, ताप खोकला,पेशी कमी जास्त,HRCT, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर गरज) व 5) वैयक्तिक समुपदेशन ( जाणीवपूर्वक प्रत्येक पेशंटचे वैयक्तिक निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शन, सल्ला, योग्य माहिती देणे व महत्वाचे त्यांना मानसिक,आर्थिक आधार देणे.)
अशा प्रकारे कोविड सेंटरचे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत व कोविड व्यवस्थापन समिती तसेच वरवंडचे सर्व ग्रामस्थ व सर्व मान्यवर देणगीदार या तीनही पातळीवरचा एकसुर समतोल झाल्यामुळे घरापासून, समाजापासून रुग्ण कसा दूर (सेंटर मध्ये) राहील आणि फक्त नी फक्त कोव्हीड रुग्ण लवकर बरा होऊन, आलेले संकट कसे दूर निघून जाईल एवढाच एक ध्यास घेतल्याने अवघ्या 102 दिवसात गावावर आलेले, आजूबाजूच्या गावावर आलेले नव्हे नव्हे तर अखिल मानव जातीवर आलेले शतकातील हे सर्वात मोठे संकट (दुसऱ्या लाटेचे) आम्ही वरवंडकर या नात्याने सर्वांनी खांद्याला खांदा लावून कोणताही मतभेद न ठेवता, राजकारण विरहित, मानसन्मान बाजूला ठेवत, अत्यंत संयम राखत, मानवसेवा या एकच उदात्त भावनेतून हातात हात घालून या कोरोनाच्या भस्मासुराला दुसऱ्या लाटेतून आपण त्यांना वाचवू शकलो. असंख्य जणांचे प्राण वाचवू शकलो. अनेकांचे लाखो कोट्यवधी रुपये वाचवू शकलो.
वरवंड कोविड सेंटरची विशेष नोंद घ्यावी अशा काही खास उल्लेखनीय घटना ज्या कदाचित कुठेच झाल्या नसाव्यात. 1) दोन वेळा कोविड तरुण मुलामुलींनी महास्वच्छता अभियान राबवले 2) पंढरीच्या वारीचा सोहळा देखावा 3) आकर्षक वेशभूषासह चार दिंड्याचा पालखी सोहळा 4) वाघ्या -मुरळी, बरबटाच्या जेवणासह जागरण गोंधळ कार्यक्रम 5) छ.शिवाजी महाराज राज्याभिषेकदिन आकर्षक वेशभूषासह दिमाखदार सोहळा 6) काळाच्या विस्मरणात गेलेले बालपणीचे रोज असंख्य खेळ 7) जवळ जवळ पन्नासहून अधिक खेळांचे चित्रांकन करून जुन्या गाण्यासह व्हिडीओ निर्मिती 8) एकाच वेळी 70 ते 80 पेशंट्सना पुरणपोळीच्या जेवणाची सामूहिक पंगत 9) तीन वेळा सेंटर मध्ये आंबरसाची पंगत 10) सेंटरमध्ये दाखल झालेल्या सर्व बालचमुंना विशेष नामकरण उदा. शंकरपाळ्या, चकल्या, लाडू, बासुंदी, पापड्या, गुलाबजाम, पेढा, बर्फी, चकली, जिलेबी, करंजी, इ.इ. 11) बालचमूच्या अग्रहखातीर सेंटरमध्ये दोन वेळा मनसोक्त वडापाव खाण्यासाठी गाडा लावली. 12) डिस्चार्ज झाल्यावर पेशंट्सना एक मोठे ऑक्सिजन देणारे झाड भेट. 13) अर्धा पाऊण तासाचे अध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम.14 ) विशेष रमजान ईद (दोन दिवस शिरखुरमा ची रेलचेल) 15) सर्वांना बासुंदी पुरीचे खास जेवण 16) मदतीचा दुप्पट वेग कोविड सेंटर 102 दिवस आणि मदत केली 210 व्यक्तींनी अशाप्रकारे असे अनेक लक्षात राहण्याजोगे अनेक प्रकार, घटना घडल्या.
कोरोनाच्या काळात कोविड पेशंट म्हंटले तर प्रत्येकाच्या जीवाचा थरकाप उडायचा, शेजारी तसेच नातेवाईक सोडा अगदी सख्खे रक्ताचे संबंधातील सुद्धा जवळ येत नसत. आणि कोविड सेंटरचा तर मग विचारच करता येत नाही परंतु त्यातूनही माणुसकीचे भान असणारे काही जिवंत व्यक्तींनी मात्र सेंटरला भेटी दिल्या आणि पेशंट्सचे मनोधैर्य सुद्धा वाढवले. त्यातील काही बाहेरील गावचे मान्यवरांच्या ठळक भेटी 1) प्रजापिता ब्राह्मकुमारीच्या आदरणीय मंगला दिदी व दादा,केडगाव 2) श्री.प्रशांत मुथा एक मित्र एक वृक्ष (केडगाव) 3) श्री.डॉ.गणेश आव्हाड साहेब (पुणे) 4) मा.श्री.रमेश आप्पा थोरात साहेब (दोन वेळा) 5) मा.श्री.विश्वास शितोळे साहेब उपाध्यक्ष राष्ट्रवादी (पडवी) 6) मा.श्री.महेश दादा पासलकर जिल्हाध्यक्ष शिवसेना 7) श्री.विलास रासकर तालुका प्रमुख निरांकरी मंडळ, (नानगाव ) 8) श्री.लक्ष्मण तात्या दिवेकर कडेठान 9)श्री.प्रेमनाथ दिवेकर (कडेठान) 10) डॉ.खळदकर, मयुरेश्वर हॉस्पिटल (केडगाव) 11) श्री.अवणीत तावरे सेवादल झोनल इचार्ज निरंकारी मंडळ (पुणे) 12) श्री.दिग्विजय जेधे साहेब ( तीन वेळा) पुणे 13) आर.एस.एस. तालुका प्रमुख (दौंड) 14) मा.श्री.संकेत शिंदे साहेब पुणे (दोन वेळा) (सुप्रिया ताईंचे भाऊ) 15) श्री.दिलीप हंडाळ (केडगाव) दोन वेळा 16) मा.तुषारदादा थोरात (दोन वेळा) खुटबाव. 17) श्री.सागरदादा थोरात (मांडवगण) तीन वेळा 18) माजी सभापती सौ.मीनाताई धायगुडे (बोरीपारधी) 19) मा.सुनीलबापू सोडनवर सरपंच (बोरीपारधी) 20) श्री.विकास खळदकर (नानगाव) अशा कितीतरी बाहेरील सहृदयी व्यक्तींनी पेशंट्सचे मनोबल वाढवले.
माझे सतगुरू निरंकारी बाबाजींचे एक अनमोल वचन आहे. … "जगात आत्तापर्यंतच्या सर्वात चांगल्या चांगल्या गोष्टी या , …लिहून झाल्या, वाचून झाल्या. सांगून झाल्या, ऐकून हि झाल्या, आणि पाहून झाल्या, आणि कळून हि आल्या पण त्या चांगल्या गोष्टी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची (अंमलात आणणाऱ्याची) संख्या खूपच लहान आहे."
परोपकार, प्रामाणिकपणा, मानवता, सेवाभाव, असे सतगुण धारण करणाऱ्यांची लाईन (संख्या) वाढली पाहिजे. आणि ते वचन आपल्या कोविड सेंटरला या भयानक काळात दिसून आले. आपल्या वरवंडच्या अनेक गावकऱ्यांनी कोविडला न घाबरता अनेक ग्रामस्थांनी सेंटरला भेटी देऊन पेशंट्सचे मनोधैर्य वाढवले. काही निवडक नावे 1) मा.श्री. संजय जाधव साहेब 2) श्री. बापू बारवकर 3) सौ.हर्षदाताई दिवेकर (सा. न्याय मंच) 4) ह.भ.प. वाबळे महाराज 5) श्री. संग्रामदादा दिवेकर 6)श्री. विंदाजी दिवेकर 7) श्री. सुभाषआण्णा दिवेकर 8) श्री.देवीदासभाऊ दिवेकर 9)श्री. तानाजी दिवेकर साहेब 10) डॉ. निलेश अडसूळ 11) श्री.भगवान जगताप 12) श्री.नवनाथ पंडित 13) श्री. सूर्यकांत देशमुख साहेब 14) श्री. रमेश शिंदे साहेब 15) श्री.विशाल सरनोत 16) श्री.चंद्रकांत दिवेकर पाटील 17) श्री.प्रदिप पानसरे 18) श्री.सुनीलदादा फरगडे 19) श्रीम.लताबाई ओव्हाळ 20) श्री. महादेव सावंत 21) पत्रकार अमर परदेशी साहेब 22) पत्रकार मोरे साहेब 23) पत्रकार अहिरेश्वर जगताप साहेब 24) सौ.शोभनाताई भंडारी 25) सौ.जयश्रीताई दिवेकर 26) श्री. कांतीलाल टेंगले 27) श्री.भीमराव कोळी 28) दिपकआप्पा दिवेकर. 29) श्री.रवींद्र आबा दिवेकर 30) श्री.संजय आण्णा दिवेकर 31) श्री.डी. एन. दिवेकर साहेब (ऑनलाइन) फोन वरून.
त्याचबरोबर खऱ्या अर्थाने कोविड सेंटरच्या यशस्वी होण्याच जबाबदारीचं ओझं ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन समर्थपणे पेलले असे 1) वरवंडच्या कोविड सेंटरचा आरोग्य विभाग 2) मा.श्री.राहुलदादा रामदास दिवेकर 3) मा. श्री. प्रदिपभाऊ दिवेकर (उपसरपंच) 4) मा. श्री. मारुतिभाऊ फरगडे 5) मा.श्री.किशोरदादा दिवेकर (पोलीस पाटील) 6) मा.श्री. मनोज सातपुते 7) मा.श्री.देशमुख सर 8) मा.श्री.मोतीलाल दिवेकर पाटील 9) मा.श्री.शाफिकभाई शेख 10) मा.श्री.दत्तात्रय दिवेकर सर 11) मा.संदीप दिवेकर चेअरमन
या सर्वांनी कोविड सेंटरला आर्थिक,भौतिक व मानसिक रसद पुरविण्यास कसलीच कुचराई केली नाही.
माझे सतगुरू निरंकारी बाबाजींनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. "" एकदा एक भल्या मोठ्या जंगलाला अचानकच वणवा लागला. सुरवातीला आगीच प्राथमिक स्वरूप ठिणगीकच होती. ठिणगीतून थोडी मोठी आग झाली, एक झाड दुसरे झाड पाहता पाहता अनेक झाडांनी पेट घेतला. जंगलातील पशु पक्षांमध्ये एकाच गडबड गोंधळ उडाला. काहीजण नुसतेच जोरजोरात ओरडायला लागले, काहीजण स्वतःचा बचाव करत नुसते आगीकडे पाहत राहिले, आगीने जसे उग्र रूप धारण केले तसे काहीजण आपला परिवार सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ लागले. तर काहीजण टिंगल-टवाळ्या मस्करी करत आगीचे गोळे एकमेकांवर भिरकाऊ लागले. आत्ता तर आगीने प्रचंड उग्ररूप घेतले अनेक पशुपक्षी तडफडून मरू लागले. माझ्या परिवारातील सर्व भस्मसात झाले म्हणून काहींनी तर मुद्धामहून दुसऱ्यांना आगीत ढकलायला सुरवात केली.
एकच हाहाकार उडाला, निरपराध जीव जिवाच्या आकांताने सर्व पशुपक्षी सैरावैरा पळू लागले. एक चिमणी मात्र आपल्या तोंडात पाणी घेऊन आगीच्या दिशेने उडत होती. शेजारी असलेल्या तळ्यात जात, आपले पंख भीजवित आणि चोचीत पाणी घेऊन लागलेल्या आगीवर शिंपडत. तिच्या कामात ती व्यस्त होती. इतर काही पशुपक्षी तिला हसू लागले, काहींनी तर तिला पाहून न पहिल्या सारखे केले. तर काहीं हितचिंतक यांनी स्वतःच्या बचावाचे तिला सल्ले दिले. "" मूर्ख उलट्या दिशेने कुठे चालली, मरायचे आहे का? हा कसला वेडेपणा. त्यावर चिमणी स्वतच्या मनाशीच म्हणते " मूर्ख मी नाही तर मूर्ख तुम्ही सगळेजण आहात. या जगात कोण वाचणार आहे ? एक दिवस सर्वांनाच मरण येणारआहे, मरणाच्या दाढेतून येथे कोण सुटणार आहे?
इथं कायमचे कोणीही जगणार नाही. जन्माला आला तो इथं मरणार. मरणाऱ्याची यादी ही वाढतच जाणार आहे. मला मरणाऱ्याच्या यादीत नाही तर वाचवणाऱ्याच्या यादीत जायचं आहे. म्हणून हे काम करते आहे.""
जो इतरांना वाचवतो ना तोच खरा जगतो, आणि इतर बरेचशे जण जगतात ना ते मरण्यासाठी जगतात.
जगात कोरोनारुपी वणवा लागला. पण आपल्या वरवंडच्या एक नाही दोन नाही तर असंख्य मदतीच्या हातांनी तब्बल 210 जणांनी असंख्य लोकांना मदतीचा हात देऊन वाचवले आहे. त्यातील काही निवडक नावे.
102 दिवस चाललेल्या कोविड सेंटर मधील पेशंट्सना 210 व्यक्तींनी मदत केली. सर्वांचीच मदत ही लाखमोलाची होती त्याचे मोल होणारच नाही. त्यातील काही भरीव ठळक मदत.
1) मुख्याध्यापक, प्राथ.केंद्र शाळा (ज्यांनी कोविड सेंटर म्हणून वापरण्यास दिले.) 2) डॉ.चौरे दिवेकर हॉस्पिटल (10 खाटा) 3) आय टी आय, वरवंड (20खाटा) 4) ग्रामपंचायत कड़ेठान (20 खाटा) 5) मा. डॉ. गणेश आव्हाड साहेब लोटस केअर सेंटर पुणे (63 PPE किट मोफत) 6) मा. दिग्विजय जेधे व मा. संकेत शिंदे साहेब (देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन) (40,000 /) औषधे, तीन वेळाला भेट व दोन वेळा जेवण 7) मा. संजय जाधव साहेब ( महिन्यातून दोन वेळा नॉनव्हेज चे कायमचे जेवण, गरजवंता HRCT तपासणी साठी रोख पैसे, सेंटर साठी 100 मोठी झाडे 8) मा.डॉ.अशोक के. पाटील साहेब ( 57,000/ रु ची अँटीजन किट 9) मा. प्रदिप पानसरे साहेब ( 25,000/रु. ची अँटीजन किट) 10) इ.10 वी बॅच (2010-11) विशाल सरनोत ग्रूप ( 20,000) रु ची अँटीजन किट 11) मा. रमेश शिंदे साहेब,मुंबई ( 20,000 रू. ची नेबुलाईझर, सॅनिटाइझर, मास्क इ.) 12) मा.सचिन दिवेकर सुजाता मेडिकल ( 20,000/ रू ची औषधे 13) श्री.विश्वासराव शितोळे साहेब ( 10,000/) रु रोख भेट स्वरूप 14) मा. सागरदादा फडके ( 50 वाफेचे मशीन सर्वांना ) 15) मा.सौ. मीनाताई धायगुडे ताई ( 5000/ रोख रक्कम व जेवण) 16) मा. राहुल लव्हाजी दिवेकर ( सर्वाना दररोज उकडलेली अंडी व्यवस्था) 17) कै. राजुशेठ सरनोत वाटर फिल्टर ( दत्तात्रय दिवेकर) सेंटरला कायमस्वरूपी मोफत पाण्याची व्यवस्था 18) मा. मनोज सातपुते साहेब ( 50 Kg. साखरेचे पोते) 19)अनिल दिवेकर पाटील चेअरमन- स्वरा ग्रूप ऑफ कंपनी तसेच ( मा.राजू आढाव साहेब) ( सेंटरसाठी दर रविवारी मोफत ऑर्केष्ट्राचे आयोजन 20) मा.राजेश पवार ( स्पीकर सेट) 21) मा.दादा पडवळ( हॅलोजन,लाईट व्यवस्था) 21) मा. अनिल दिवेकर सर मुख्याध्यापक नागनाथ विद्यालय,( माईक, साउंड मशीन) 22) कोविड मधून बरे झालेले श्री. गणेश सोनवणे व श्री.अनिकेत काळभोर (यांनी बकऱ्याचे (15 Kg.) नियोजन करून बरबटाचे जेवणाची व्यवस्था 23) तसेच 1)निखिलजाधव 2) शेखर व महावीर भंडारी तसेच 3) मा.श्री.सतिषशेठ, श्री.वैभवशेठ भंडारी यांनी ( खास आंबरसाचे नियोजन केले.) 24) मा.राजू लगड ( दर पंधरा दिवसांनी सेंटरमध्ये सॅनिटाइझर फवारणी) 25 ) ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी वर्ग. (सुरवातीला स्वच्छता व व्यवस्था) 26) सर्वात महत्वाचे मा.श्री.आर.डी.शेलार ( सर्व पेशंट्सना वेळेत आणि शेवटपर्यंत जेवण बनवून सेवा देणारे सेंटरचे अन्नदाते.
बाधाये आती हैं आये, घीरे प्रलय की घोर घटाये, निज हातोमे हसते हसते, आग लगाकर जलना होगा, …कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा या अटलजीं यांच्या कवितेच्या सुंदर ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. हातात हात घालून सेवा करणाऱ्या मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या कोविड सेंटरसाठी पडेल ते काम सेवा म्हणून करणारे माझे सहकारी गुरुबंधू आ.श्री.लक्ष्मण पंडित महाराज, नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. अनिल दिवेकर सर, श्री. मोतीआण्णा पाटील दिवेकर, श्री.नाथाभाऊ थोरात, जिवन दिवेकर, श्री.बाळासाहेब कदम (शुभमआर्ट) श्री.भारत दिवेकर, श्री.दत्तात्रय दिवेकर, व राजू लगड या सर्वांनी अखंडपणे 102 दिवस सेंटर मध्ये उपस्थित राहून मदत पुरवली.
वादळ येते,आणि जसे येते …तसे जाते ही. फक्त संयम व एकजूट असेल तर कितीही मोठे संकट आपण सहज परतावून लावू शकतो हे आज कोरोनाच्या काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण सर्व वरवंडकरांनी दाखवून दिले.
हे कोविड सेंटर ना कोणत्या गटाचे होते, ना कोणत्या राजकीय पक्षाचे होते. ना कोणत्या समूहाचे होते. शतकातील सर्वात मोठे अखिल मानव जातीवर आलेलं प्रचंड मोठे संकट होते.आणि तो वणवा आपल्या गावात, घराघरात शिरला होता. आणि ते परतावून लावण्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी कोविड सेंटरच्या रुपात हा यज्ञ पेटवला होता.
हा प्रदिर्घ लेख लिहिण्याचा प्रपंच यासाठी की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः अनेक कुटुंब, माणसं उध्वस्त झाली होती. आपण सेंटर उभारून किती मोठी जबाबदारी, व सामाजिक कर्तव्य यशस्वीपणे पार पाडली हे लक्षात यावे. मी एक दोन उदाहरण सांगतो यावरून अंदाज येईल.
1) हसत खेळत असणार घरआई वडील, दोन मुले एकाचे लग्न झालेले त्याला लहान लहान दोन मुले व लहान भाऊ आठवीत असेल. आणि एक मोठी बहीण डिलिव्हरी साठी घरी आणलेली. असे एकूण आठ माणसं राहत होती.
मोठ्या भावाची बायको नुकतीच माहेरी जाऊन आली. येताना ती कोविड घेऊनच आली. चार दिवसांनी तिच्या नवऱ्याला ताप खोकला. टेस्ट केले पॉझिटिव्ह आला, खाजगी दवाखान्यात ऍडमिट झाला. दोन दिवसांनी ती स्वतः आणि सासूबाईंना त्रास जाणवू लागला, दोघीपण कोविड सेंटरला ऍडमिट झाल्या. थोड्या दिवसात डिलेवरीसाठी आलेली मुलगी दवाखान्यात ऍडमिट झाली. डिलिव्हरी झाली मुलगा झाला. पण तिला कोविडची लक्षण जाणवू लागली. म्हणजे कोविडच झाला. डॉक्टरने सांगितले बाळाला सुरक्षितेसाठी घरी घेऊ जा. झालं बाळाला घरी आणले. थोरल्या मुलाची दोन लहान मुले, बाळ आणि आठवीत शिकणारा लहान मुलगा आणि सासरा. असे आता पाचजण घरी.(ना स्वयंपाक बनवणारे, ना बाळाला संभाळणारे, ना बाळाला दूध पाजणारे)
स्कोर वाढल्याने एक मुलगा मोठ्या खाजगी दवाखान्यात कोविड उपचारासाठी, सासू आणि सून कोविड सेंटरमध्ये तर मुलगी वेगळ्या दवाखान्यात उपचार घेत होती.
बाळाला पावडरचे दूध पाजत,बारा दिवस अक्षरशः उपाशी तापाशी राहून दिवस काढले. किती भयंकर त्रासातून ते कुटुंब जात होते हे त्यांनाच माहीत…
2) एक आनंदी भरलेलं घर.शेजारील 2 चुलते कोविड मुळे ऍडमिट, काही दवाखान्यात तर काही घरीच. थोड्याच दिवसात वडिलांना संसर्ग झाला आणि त्यांना सेंटर मध्ये आणले, दोन दिवसातच त्याची पत्नी आणि दोन मुले सुद्धा सेंटर मध्ये उपचारासाठी आली. वडिलांचा जास्त स्कोरमुळे देऊळगाव येथे हलवले, परत तिथून दौंडला ऍडमिट केले.
दोन चुलत्यायांच्या परिवाराची काळजी, स्वतःच्या वडिलांची चिंता, सेंटरमधील पत्नी आणि दोन मुलांची आठवण, पैशांचा कसा बंदोबस्त करायचा?, कोणाला मागायचा? ते डोक्यात, कोणाचे काय होईल याची प्रचंड भीती 10 ,12 दिवस नुसता वरवंडचे सेंटर, देऊळगाव, दौंड आणि घर अशा प्रकारे धास्ती घेऊन मारलेल्या फेऱ्या…किती किती वेदना झाल्या असतील…?
3) सहा जणांचे कुटुंब वडिलांना त्रास जाणवू लागला .त्यांना सेंटर मध्ये ठेवले. दुसरयाच दिवशी मुलगी ऍडमिट केली. पुन्हा दोन दिवसांनी आईला सुद्धा ऍडमिट केली. काही दिवसांनी वडिलांना देऊळगाव नंतर स्कोर वाढल्याने दौंडला, आणि वडिलांचा स्कोर पुन्हा वाढल्याने तेथून विश्वराजला ऍडमिट केले. घरी पत्नी व एक मुलगा, सेंटरमध्ये आई व मुलगी आणि वडील विश्वराजला. आणि स्वतः प्रचंड काळजी आणि भीती घेऊन वणवण फिरणारा तो…?
अशा प्रकारे सेंटरच्या माध्यमातून एक दोन नाही तर शेकडो उदाहरण पाहिली. # ज्याचं जळालं ना साहेब त्यालाच संकट कसं होत ते कळालं.#
अशा प्रकारे कोविड सेंटर उभारून हजारो लोकांचे प्राण वाचले, त्यांचे कोट्यवधी रुपये वाचवले. ( खाजगी दवाखाण्यात कमीत कमी एक पेशंटला 2 ते 7 लाखाचे बिल आले ) सर्वात महत्वाचे त्यांना सेंटरमध्ये ठेवल्याने इतर गावकरी सुद्धा सुरक्षित राहिले आणि यांचेही पैसे वाचले व त्यांची काळजी घालवली.
हजारोंचे प्राण वाचले हेच आपल्या कोविड सेंटरचे यश म्हणावे लागेल. आणि या यशाचे खरे श्रेय हे आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांना जाते. मदतीचा वर्षाव करणाऱ्या गावातील,परगावातील सर्व देणगीदारांना जाते. आपल्या आरोग्य विभागाला जाते, आणि नियोजन करणाऱ्या व्यवस्थापन समितीला जाते, तसेच सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायतीला जाते. एकूणच कळत नकळत, तनाने,मनाने धनाने सेवा करणाऱ्या सर्वांच्याच योगदानामुळे हे यश मिळाले असे मी मानतो.
आमच्या संत निरंकारी मंडळाच्या आदेशानुसार कोविड काळात मानवसेवा करावी असा मला गुरूआदेश होता. आणि आपण सर्वांनी ही मानवसेवा करण्याची माझ्यासारख्या एका शिष्यावर,व एका शिक्षकावर विश्वास ठेवला आणि हि सेवा करण्याची संधी दिली यामुळे मी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो.

( सेंटरला अनेक भेटी देणारी व देणगी देणारी दानशूर व्यक्तीची नावे होती चुकून कोणाचे नाव राहिले असल्यास त्यांची दिलगिरी व्यक्त करतो.)

सर्वांना पुन्हा एकदा कळकळीचे नम्र निवेदन व आवाहन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचि दाहकता ओसरलेली दिसत असली तरीपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार लटकलेलीच आहे.
सामाजिक अंतर पाळा, गर्दीत जाऊ नका, नेहमी हात घुत रहा, सॅनिटाइझर व मास्कचा वापर करत रहा.

श्री.फासगे सुभाष नारायण
समन्वयक : वरवंड कोविड केअर सेंटर, वरवंड.
श्री.रोकडोबानाथ विद्यालय, भांडगाव, ता.दौंड,जि.पुणे. 9890199485

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...