डॉ. विठ्ठल ठोंबरे लिखित येतेय नवी कादंबरी...
डॉ. विठ्ठल ठोंबरे म्हणजे सांस्कृतिक साहित्यविश्वातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व होय. दीड तपाहून अधिक काळ भटकंती करून खंडोबा वरती ग्रंथ साकारणारे तथा खंडोबाची महती घराघरात पोहोचविणाऱ्या जय मल्हार मालिकेचे तज्ञ सल्लागार आणि तितक्यात तोडीचा जोतिबावर देखील अभ्यास असणारे दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेचे तज्ञ सल्लागार डॉ. विठ्ठल ठोंबरे हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जाण असलेले ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत. याच डॉ. विठ्ठल ठोंबरे यांची लवकरच बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावरती आधारित कृष्णाकाठचं भयपर्व ही कादंबरी येतेय.

बापू बिरू वाटेगावकर ऊर्फ आप्पा म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले कृष्णा खोऱ्यातील एक झंझावात. कायद्याची भीती न बाळगता गरिबांच्या न्यायासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवणारे बापू बिरू वाटेगावकर हे पुढे आप्पा महाराज बनले. ऐन उमेदीच्या काळातील दोन दशके पोलिसांना गुंगारा देत फरारी जीवन जगणारे बापू बिरू वाटेगावकर यांचा काळ गुन्हेगारांसाठी मोठे भय ठरले होते. आप्पांचा जीवनप्रवास म्हणजे चित्रपटात, तमाशातील वग नाट्यात आणि पोवड्यातील न बसणारे कथानक. एक माळकरी ते कीर्तनकार, व्हाया आया बहिणींची अब्रू वाचविण्यासाठी कायदा हातात घेणारा, गुन्हेगारांचा कर्दनकाळ होता. गावगाड्यातील गोरगरीब महिलांवर होणारा अन्याय अत्याचार डोळ्यांनी पहावत नसल्यामुळे एका माळकरी माणसाला हत्यार उचलावे लागते. आणि गुंड प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागतो. हीच समाज व्यवस्था आणि १९७० च्या दशकात बापू बिरू च्या जीवनाला मिळालेली कलाटणी आणि त्यांचा एकूण प्रवास यावर साकारलेली कादंबरी येत आहे.
प्रसिद्धीमाध्यमांना मर्यादा असण्याच्या काळात बापू बिरु आणि त्यांचा गावगुंडाविरोधात असणारा लढा सर्वदूर पोहचला. तळागाळातील लोकांनी बापुचं जगणं अक्षरशः डोक्यावर घेतलं. महाराष्ट्रातील कोणत्याही फरारी झालेल्या व्यक्तीच्या वाट्याला आली नाही इतकी अफाट प्रसिद्धी आणि लोकप्रियता बापू बिरुला मिळाली. बापू बिरुची २० जून २००३ रोजी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सातारचे चित्रपट निर्माते दीपक देशमुख यांनी बापू बिरुच्या लढ्यावर आधारित "बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर" नावाचा सिनेमा काढला. तो संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चालला. या सिनेमात आघाडीचा अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी बापू बिरुची व्यक्तिरेखा साकारली आहे. ज्या व्यक्तीवर हा सिनेमा बनविला आहे, ती व्यक्ती अजून हयात आहे " हे समजल्यानंतर सिनेमा पाहिलेल्या अनेक लोकांचं कुतूहल जागं झालं. बापू बिरुला प्रत्यक्ष पाहण्याचा काहींना मोह आवरता आला नाही.
भारतातून इंग्रज जाऊन दीड दशकांचा काळ लोटला होता. मात्र त्यांची 'झोडा आणि फोडा ' ही राजनीती हिंदुस्थानच्या भूमीत पूर्णपणे रुजली होती. त्यामुळेच देशात सरंजामीवृत्ती दिवसेंदिवस फोफावत होती. त्यातूनच गावोगावी जमीनदार, श्रीमंत, सावकार, गावगुंड हे सामान्य गरीब जनता, स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करीत होते. कृष्णा-वारणा नद्यांकाठचा प्रदेश तर या लोकांच्या दहशतीमुळं प्रचंड भयभीत झाला होता. गोरगरिबांना कुणी वाली उरला नव्हता. नेमक्या याच वेळेस सामान्य कष्टकरी जनतेचा कैवार घेण्यासाठी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी ' पैलवान बापू बिरु वाटेगावकर' या धाडशी मेंढपाळ तरुणानं हाती शस्त्र घेतलं. सामान्य लोकांचा विनाकारण छळ करणाऱ्या गावगुंडांचं बापू बिरुनं थेट हत्यासत्र सुरू केलं. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील खलनायकी प्रवृत्तीच्या लोकांचा बापू बिरु आणि त्यांची टोळी कर्दनकाळ ठरली. बापू बिरुचं साधं नाव जरी ऐकलं तरी गुंडापुंडांच्या उरात धडकी भरत होती. या भागात डझनानं कुख्यात गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होत्या. परंतु बापू बिरु विरुद्ध साधा ' ब्र ' काढायचीही कुणामध्ये हिम्मत उरली नव्हती. खऱ्या अर्थानं 'बापू बिरु वाटेगावकर' यांच्या रुपानं कृष्णाकाठी सामान्य माणसांसाठी' न्यायपर्व' आणि गुन्हेगारांसाठी 'भयपर्व' अवतरलं होतं. म्हणूनच डॉ. ठोंबरे यांनी बापू बिरू वाटेगावकर यांच्या झंजावाती जीवनावर साकारले आहे कृष्णाकाठचं भयपर्व.
गावगुंडांच्या जाचातून गरिबांना मुक्त करण्यासाठी सलग १९ वर्षे भूमिगत (फरार) असणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर यांच्या वादळी जीवनाचा सखोल वेध घेणारी आणि वाचकांच्या मनात थरार निर्माण करणारी डॉ. विठ्ठल ठोंबरे लिखित बहुचर्चित/बहुप्रतिक्षित कादंबरी लवकरच वाचकांच्या हाती येणार आहे. डॉ. विठ्ठल ठोंबरे यांची साहित्यकृती नक्कीच वाचकांच्या पसंतीस पडेल, यात शंका नाही.

शब्दांकन
दाजी कोळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी