लोककलेचा जुना बाज बदलत्या काळातही जपला पाहिजे...!
बिरुदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील आरेवाडी नगरीने बिरोबाच्या भक्ती आणि सेवा परंपरेतील महत्वाचा भाग असलेली कैपतनृत्य आजही जतन केली आहे. याच लोककलानगरीने बिरुदेवाच्या कांबळ्याचे निशाण जगभरात अनेक देशात फडकवित लोककलेची पताका मानाने मिरविली. त्यातील एक महत्त्वाचा दौरा म्हणजे २००१ मधील इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय दौरा. याच दौऱ्याला दोन दशके (२० वर्षे) पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त थोडेसे…
आरेवाडी म्हणजे धनगर समाजाचे दैवत असलेल्या बिरोबाची पुण्यभूमी होय. या गावाने धनगर समाजाच्या अनेक परंपरा जिवापाड जपल्या आहेत. अगदी आजच्या रिमिक्सच्या जमान्यात आणि इंटरनेटच्या डिजिटल युगात देखील पारंपारिक लाकडी ढोल, कैपत नृत्य व विविध प्रथा जपल्या जात आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेली कैपत नृत्यकला नुकती जपली नाही, तर जगातील अनेक देशात सादर करून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आरेवाडीची कैपत नृत्य म्हणजे लोककला रसिकांना खिळवून ठेवणारी कसरतीचे कला आहे. दैवत बिरोबाच्या भक्ती आणि सेवा प्रित्यर्थ ही लोककला जपली जात असून या कलेच्या उपासनेमुळे शरीराचा भरपूर व्यायाम होतो. अगदी २-३ मिनिटांत घामाच्या धारा लागतात. भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या, अशा या लोककलेने देशविदेशात वाहवा मिळविली आहे.
त्यातीलच एक महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक व आंतरराष्ट्रीय दौरा म्हणजे १५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २००१ चा इंग्लंडचा दौरा होय. ९ कलाकारांच्या सहभागाने पार पडलेला २१ दिवसांचा हा दौरा म्हणजे आरेवाडीच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णक्षण होय. हा क्षण साकारण्यासाठी खूप कष्टमय आणि शुण्यापासून तयारीचा प्रवास (पासपोर्ट काढण्यापासून ते इंग्रजी संवादापर्यंत) करावा लागला. कारण यातील बहुतांशी कलाकार अशिक्षित व कमी शिक्षित होते. तसेच २० वर्षापूर्वी आजच्या सारख्या हव्या तशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच यासाठी अनेक महिने सराव देखील करावा लागला. यासाठी आणखी काही नवीन कलाप्रकार सादर करावे लागणार असल्याने ते शिकता/सराव करता आले. मग त्यामध्ये लेझीम असेल किंवा ढोलाच्या वाद्यातून इशारे देत लपविलेला नारळ डोळे बांधून शोधून काढणे, असे वेगळे कला प्रकार जपता आले.
अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये सहभागी होताना काही नवे/वेगळे लोककला प्रकार शिकण्याची संधी मिळते. ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आपलं 'जुनं ते सोनं' विसरता कामा नये. कारण कोणतीही कला एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमीत/प्रवाहीत होताना, त्यामध्ये काहीसा/थोडाफार बदल/सुमार दर्जा होत असतो. तसेच या संक्रमण काळात काही जुने पावंड/प्रकार सादरीकरणाविना व कलेकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोन बदलामुळे अदृश्य होताना दिसत आहेत. पण तसे होवून चालणार नाही. सांस्कृतिक परंपरेला रिमिक्सच्या जमान्याचे कितीही धक्के बसले किंवा लोककलेच्या बाजारात कालचे देखील उंच शिखरावर गेल्यासारखे वाटले, तरी किमान आरेवाडीकरांनी तरी लोककलेचा जुना बाज (आपल्या पूर्वजांच्या अस्सल कला) जपला पाहिजे.
लोककलेचा हा अस्सल बाज जपण्यासाठी जुन्या-जाणत्या कलाकारांनी पुढे येऊन त्यांना दाखविले/शिकविले पाहिजे आणि नवतरुणांनी देखील तितक्याच तळमळीने शिकले/जपले पाहिजे. म्हणजेच जुन्या-नव्या यांच्या सहयोगातून लोककलेचा वारसा, आहे तसाच पुढे जतन व्हायला पाहिजे. तरच आपले हे सांस्कृतिक वैभव टिकविता येईल.
अन् स्वागताची वेळ हुकली…
दिडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या गोऱ्या साहेबांकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. पण त्यावेळी मोबाइल हा प्रकार नव्हता. होता तो दूरध्वनी (Landline). तेव्हा इंग्लंडमधील एका भारतीयाच्या मोबाइलवरून, "आम्ही उद्या सकाळी येतोय", असे सांगितले. त्यानंतर लगेच गोदी कामगारांसह शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनी स्वागताची जय्यत तयारी केली. पण इंग्लंड आणि भारत देशातील दिनमान (वेळ) फरक कोणाच्याच ध्यानीमनी नाही. आणि सकाळी पोहोचणारे कलाकार मंडळी रात्रीच मुंबई विमानतळावर पोहोचले. त्यामुळे स्वागताची वेळ हुकली.

इंग्लंड दौऱ्यातील सहभागी कलाकार
१) आकाराम हरी कोळेकर (प्रमुख)
२) हरिश्चंद्र शिवाजी कोळेकर
३) संजय अंबाजी कोळेकर
४) भिमराव बाबासाहेब कोळेकर
५) नानासाहेब ज्ञानु कोळेकर
६) शिवाजी दादासाहेब कोळेकर
७) हायाप्पा मुकिंदा कोळेकर
८) चंद्रकांत विठोबा कोळेकर
९) आप्पा नामदेव कोळेकर
संकलन व लेखन
दाजी कोळेकर, नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी