ग्रामीण भागात घरगुती गावरान कोंबड्या पाळण्याचा छंद हा पुर्वीपासुनचाच. पुर्वी दगडी खुराड्यात कोंबड्या डालुन ठेवल्या जायच्या. जास्त रोगही नव्हते. त्यामुळे त्यांचे उत्पादनही जास्त होत होतं. अंडी, चिकनसाठी उपयोगी म्हणून सर्रास प्रत्येक घरी कोंबड्या असायच्याच. त्यामुळे अंडी किंवा कोबड्यांच्या चोर्या व्हायच्या नाहीत.
काळ लोटला तस तशा ग्रामीण भागातही गावरान कोंबड्या पाळण्याचे प्रमाण कमी होऊ लागलं. अंडी, चिकनसाठी बाॅयलर कोंबड्यांना पसंती मिळु लागली पण गावरान ते गावरानच त्याची सर बाॅयलरला येणं अशक्य. पण गावरानच्या किमतीही भरपुर .
आमच्या गावातही कोंबड्याचं प्रमाण घटलेलं होतं त्यात नवीन रोगांनी लोकांचं कंबरडं मोडलं होतं. घरचे दाणे खाऊन कोंबड्या दुसरीकडे अंडी घालून येत होत्या. अशा परिस्थितीत असतानाच खुराड्यातुन अचानक पणे रात्रीच्या कोंबड्या गायब होऊ लागल्या. कोल्ही किंवा कुत्री नेत असतील म्हणून सगळे गप्प होते. दगडी खुराड्यातुन कोंबडी काढुन नेणं कोल्ल्ह्यांना अगदी सोपं होतं. चार पाच दिवसातुन एकेकाची कोंबडी गायब होऊ लागली. तसातसा बोभाटा जास्त होऊ लागला. कोंबड्या कोणता प्राणी नेतोय याची चर्चा गावात ज़ोर धरु लागली. लोक रात्रीची जागुन कोंबड्या कोण नेतय हे शोधत होती. पण कोंबड्या पळवणारा प्राणी मात्र दिसत नव्हता. लोक जागी असली की कोंबड्या जात नव्हत्या. पण बेसावध राहिले की कोंबडी गेलीच म्हणुन समझा. या कोंबडी चोराचा बंदोबस्त केला नाही तर कोंबड्या सांभाळणे अवघड होईल ही चिंता सर्वांना लागुन राहिली होती. सगळी लोकं वैतागुन गेली होती.
आम्हांला जेव्हा ही बातमी कळली तोपर्यत बर्याच जणांच्या कोंबड्या गायब झाल्या होत्या. मग मात्र आम्ही सावधपणे चोराचा शोध घेण्यासाठी प्लॅन बनवु लागलो. आम्ही अनेक प्लॅन केले पण सपशेल फेल झाले. कोंबड्या जातच राहिल्या. मग मात्र आम्ही दोन तीन मित्रांनी वेगवेगळ्या आयडिया लढवायला सुरुवात केली.
ज्या ज्या वेळी आम्ही एकत्र बसुन मित्रांनी प्लॅन केला त्यावेळी तो प्लॅन अपयशी ठरला. आम्ही जागे राहिलो की चोरी होत नव्हती. आम्ही झोपलो की चोरी व्हायची. मग मात्र चोराला पकडण्यासाठी वेगळा विचार सुरु केला आणि चोर काय सापडत नाय उगाच कशाला रात्रभर जागुन डोळे फोडायचे असं म्हणून आम्ही तो नाद सोडल्याचं सगळ्या मित्रमंडळीत जाहीर केलं. पण आमचा दोघां तिघांचा हा प्लॅन आम्ही कोणालाही कळू दिला नाही. सगळे झोपी गेले की आम्ही उठायचो. गुपचुप सगळीकडे गावात चक्कर मारायचो. मंदिरासमोर सात आठ जण तेवढे पत्य्या खेळत बसलेले असायचे. बाकी सर्व सामसूम असायची.
एक दिवस अशीच चक्कर मारत असताना अचानक आमच्या घराच्या आळीला चोरी झाली. कुत्री भुंकण्याचा आवाज झाला तसे आम्ही पळतच घराकडे गेलो पण तोपर्यंत क़ोंबडी गायब झाली होती. आम्ही शोध घेतला पण कुठेच काही सापडेना. दगडी खुराडी जाऊन आता लोखंडी जाळ्या आल्या होत्या तरीही चोरी होतच होती. कुलुप असलेल्या जाळीतुन कोंबडी जात नव्हती मात्र कुलुप नसलेल्या जाळीतल्या कोंबड्या चोरीला जात होत्या. सगळे जण वैतागले होते. शेवटी आम्हीच आमच्या आळीत सर्वांच्या जाळ्यांना कुलुपं लावायला सांगितली. पण मग चोर कसा सापडणार?
एके दिवशी सर्वांच्या जाळीला कुलुप आहे की नाही हे आम्ही फिरुन पाहिलं. चार पाच मित्रांनी प्लॅन क़रुन नेमकी आमचीच जाळी उघडी ठेवली. अन रात्रभर जागुन चोर पकडायची कल्पना आखली. गटारी आमावश्येची रात्र होती. आज चोरी होणार हे शंभर टक्के होतं. चोराला पकडण्याची ही नामी संधी होती. रात्र झाली तशी सामसुम होऊ लागली. कुठंतरी कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता.आम्ही मात्र आमच्या पाल्याच्या गंजीवर चढून बसलो होतो. रात्र पुढे सरकत होती.आम्ही मात्र गुपचीप बसुन होतो. कुठेही आवाज न करता आमचं काम चालु होतं.मध्यरात्री अचानक कुत्री भुंकली. आम्ही सावध झालो.एखादा कोल्हा आला असेल असं वाटलं. पण थोड्याच वेळात दुसर्या आळीतुन आवाज येऊ लागला. आवाज आता आमच्या दिशेने सरकत पुढे येत होता.आम्ही सावधपणे वाट पाहत होतो. आमच्या आळीत कुत्री भुंकायला लागली. एका एकाच्या घराजवळून कुत्र्याचा आवाज येत होता.
आणि अचानक एक रग पांगरलेला व्यक्ती आम्हांला आमच्या खुराड्याकडे येताना दिसला. आम्ही सावध झालो. आता ओरडलो तर चोर पळून जाईल म्हणून तो काय करतोय हे पाहु लागलो. आमच्या खुराड्याला कुलुप नव्हतच. चोराने खुराड्याला कुलुप नसल्याची खात्री केली अन खुराड्यात हात घातला. तशा आम्ही पटापट गंजीवरुन खाली उड्या मारल्या. रगवाल्याला पकडलं. तो पळुन जायचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण आम्हीही तिघे त्याला थोडाच असा पळू देणार ? आम्ही त्याला खाली पाडला अन रग हिसकली तसा आमचा आमच्यावरच विश्वास बसेना. कारण कोंबडी चोरणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता आमचा मित्र गण्या.
गण्या तसा खात्यापित्या घरचा. कायम आमच्याच मित्रमंडळीत असायचा. पण दारुचं व्यसन त्याला जडलं होतं,. म्हणुनच दारुसाठी तो काहीपण करायला तयार असायचा. काही दारुड्या मित्राच्या संगतीमुळे त्याला सहजपणे मिळणारी कोंबडी चोरण्याची सवय जडली होती. सगळे सामसुम झाले की, हा अलगदपणे कोंबडी काढायचा अन दारुवाल्याला नेऊन द्यायचा. बरेच दिवस त्याचा खेळ चालु होता. आम्ही चोर पकडायच्या प्लॅनमधेही तो असायचा. पण त्याला माहीत असल्यामुळे चोरी होत नव्हती. कशी होणार ? कारण चोरच आमच्यात असायचा. पण वेगळा प्लॅन करुन विश्वासु दोघांना घेऊन केलेली आयडीया आज सफल झाली होती आणि गण्या आमच्यासमोर हात जोडत होता. मित्र असला तरी चोरटा होता. त्याला अद्दल ही घडायलाच हवी.म्हणुन आम्ही लगेच आरडा ओरडा सुरु केला. सगळी आळी जागी झाली. समोरचा सगळा तमाशा बघून आळीतल्या लोंकांनी गण्याला चांगलाच धुतला. आतापर्यत गेलेल्या सगळ्या कोंबड्या ह्याच कोंबडी चोराने पळवल्याची खबर दुसर्या दिवशी अख्खा गावात पसरली. तसा गण्याचा सगळ्यांनीच समाचार घेतला. पुन्हा असं करणार नाही हे चावडीवर त्याच्याकडुन वदवुन घेतलं अन गण्याची सुटका झाली. त्या घटनेनंतर मात्र पुन्हा कोंबडी चोरायची हिंम्मत गावात कोणी केली नाही. पण कोंबडीचोर गण्या मात्र सगळ्यांच्याच लक्षात राहिला.

शब्दांकन—
श्री.सतिश नानासाहेब कोळपे
तांबेवाडी ता.दौंड जि.पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी