दोन वर्षाच्या केरबाला सदाच्या पदरात टाकून लक्षी देवा घरी निघून गेली. बापलेक दोघं आणि कंबरेत वाकलेली म्हातारी, असे त्रिकुट आता घरी असायचं. म्हातारी दोघांचं सगळं बघायची. पण तरीपण सदानं लगीन करावं, म्हणून त्याच्या मागं सारखं तगादा लावायची. पण तो सारखा लग्नाला नकार द्यायचा. शेजारीपाजारी सांगून दमले. पण हा गडी काय तयार होत नवता. दिवसा मागून दिवस जात होते. सदाची म्हातारी जमेल तसा तुकडा करून घालत होती. आणि पोटाची भूक भागवत होती. म्हातारीला उतारवयात काहीच काम आता होत नव्हतं. तरीपण ती बसत नवती. बसून राहीले तर खायचे काय? असा प्रश्न होताच.
एके दिवशी पहाटे वरच्या आळीमधून जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि नको ती बातमी समजली. सदाची म्हातारी गेली. सदा आता एकटा पडला.
आईची आठवण आली की लहान केरबा भोकाड पसरायचा. मग कुठं मामाकडे सोड, कुठं लेकीकडे सोड. असं करून सदा दिवस घालवत होता. ही सगळी परिस्थिती बघून नाय म्हणणारा सदा लग्नाला तयार झाला आणि पोरी बघायची सुरुवात झाली. हा गडी मात्र पक्का बाजिंदा. आधी लग्न करायचे नाही म्हणला. आणि सहा महिन्यात दुसरं लगीन करायला तयार झाला. कोण पै-पावनं पोरगी बगणा तर स्वतःच जायचा. कुठे सुगावा लागतो का बगाय. पण कुठं जम बसत नवता.
एके दिवशी माणदेसाकडन एक सांगावं आला. एक स्थळ आहे म्हणून. हा गडी बघायला गेला आणि लगिन उरकून आला. मुलगी मात्र साफ भोळसट, एका डोळ्यांनी कमी दिसत असलेली. स्वतःच्याच नादात असलेली अशी ती माणदेशी मुक्ता. दोन येळचं तुकडं मात्र करून घालायची. लग्नाच्या चौथ्या दिवशीच तिच्या हातात खुरपं आलं आणि भिमा पाटलाच्या बांधाला तुकडा बांधून गेली. सदा मात्र पक्का बाजिंदा. दोन येळच्या तुकड्यासाठी आणि वासनेची भूक शमवणेसाठी त्याला एक देह हवा होता आणि त्याच्या या कारस्थानाला मुक्ता बळी पडली. मुक्ता थोडी भोळी असल्याने तीच लग्न बरेच दिवस झाले नवते.
माहेरची सुध्दा मुक्ताला कंटाळली असणार. असं वाटायचे कारण ती लग्नाला दीड वरीस झालं तरी कोण हिकड येत नवतं. तिझी ईचारपुस करत नवतं, ती कशी आहे तिला काय हवे नको कोणीच विचारत नव्हते . मिळेल ते काम करायचा आणि पोटाला खायचं असेच दिवस ती काढत होती .मुक्ता मात्र आता तीन महिन्याची पोटोशी होती आणि पहिल्या बायकोचं केरबा मात्र त्याच्या मामाकडे असायचा. मुक्ता मात्र अशा अवस्थेतही लोकाच्या बांधाला जात असायची, काबाडकष्ट करायची, तिच्या कामाची वेळ कधी ठरलेली नसायचीच, मुक्ताची अवस्था मात्र खूपच दयनीय होती. तिला पोटाला कधी वेळेला मिळतच नसे.कधी भाकर मिळायची तर कधी नुसत्या भातावर दिस काढायची. भोळसट मुक्ता मात्र आपल जीवन चटणी भाकर खाऊन कोणाचं बांध बांधुर खुरपून जगत होती. तिलाही लोक कामाला सांगायची कारण तिची परिस्थिती सर्वांना माहीत होती.
दिवसामागून दिवस सरत होतं. मुक्ताचं हाल मात्र पाहायला नको अस होत हुतं. शेजारीपाजारी येडी मुक्ता म्हणूनच तिला ओळखत. कारण मुक्ता कोणालाच समजली नवती आणि शिक्षण घेतलेल्या निर्दयी समाजाला तर समजणारही नव्हती .
असेच गरिबीची आणि पोटाची परीक्षा पाहत दिवस पुढ सरत होत, सदाला मात्र मुक्ताची काही फिकीर नव्हती , बघता बघता मुक्ताच्या लग्नाला दोन वर्ष हुन गेली आणि मुक्ताला एक काळंसावळ पोरगं झालं. या वेदनेच्या कळेतून ती मोकळी झाली, पण जीवनाच्या वेदनेतून सुटका कशी होणार हे सांगणं कठीण. सदा मात्र एके दिवशी कामाला म्हणून जो गेला तो परत आलाच नाही. काही दिवसांनी कोणाकडून तर समजले की तो दुसऱ्याच कोणाशी लग्न करून आपला संसार करत आहे. कुठे आहे? काय झालं? काही माहीत नाही. मुक्ता मात्र रोज जीवनाशी खटा ठोमका खाताना दिसते.
" कधी चटणी भाकरी खाऊन झोपी जाते तर कधी नुसतं पाणी पिऊन आतडी ओली करून झोपते.गोडधोड तिला कधी या चार वर्षात मिळाली की नाही काय माहीत".
तिझ पोरगं ही आता पहीलीला गेलं होतं. त्याचं ही तीन नाव नाऱ्या ठेवलं होत.
नाऱ्या हा नावाप्रमाणेच होता ,हाडकुळा अंगात मळकी आणि फाटकी कपडी घातलेलं, अंगाची रया गेलेला, छातीवरून पोटापरेंत एक ओघळ असलेला . लोहाराचं पोरं जस भाता हाणून धूर लागून काळ बनते आणि उन्हात जस चमकत तसा हा नाऱ्या उन्हात चमकायचा. शेजापजारी कोणाचं लगीनयाव असलं की मुक्ताला धुणीभांडी करायला हमखास बोलवण असायचं. दिसभर काम करत ती या जेवणाकडं बघायची, आपल्याला व आपल्या पोराला कधी असलं खायला मिळायचं याची तिला आतुरता लागायची, पण तिची इच्छा ही इच्छाच राहायची , अडगळीत पडलेल्या वस्तूकडे कोणाच लक्ष जात नाही त्याचप्रमाणे मुक्ताकडे ही कोणाच लक्ष जात नसे .नाऱ्या मात्र कधीतरी कोणाचं डोळा चुकवून मुठ मारून थोडी गोड असलेली कळी खायचं. एकदा असाच नाऱ्या गणपतीच्या जेवणकडं गेलं आणि बाजल्याबर असलेली कळ्याची मुठ मारून बकमा तोंडात टाकला.
" तेव्हा त्याला देवाला प्रसाद दावायच्या आधी खातोस म्हणून सुखा तात्यान मार मार मारला"
"ते पाहून मुक्ता गेली व म्हणाली तात्या चुकी झाली माफी द्या म्हनून गयावया करू लागली "
ते पाहून सुखा तात्या बोलला
"मुक्ते सांभाळ तुझं कार्ट नाहीतर बघ मग " हे बोलून तात्या निघून गेला
. नाऱ्या ला काय माहित प्रसाद आणि देव, त्याला फक्त पोटाची भूक माहित. सण समारंभ तर त्यांचे आले का गेले हेच समजायचे नाही. कित्तेक दिवाळी ही नुसत्या गरम पाण्याच्या अंगोळीवर आणि इतरांच्या मुलांनी घालून निम्मे अर्धे फाटलेल्या कपड्यावर यांची दिवाळी हूयाची. कोणी खायला दिवाळीच दिलेस तरी ते महिनाभरानं मिळायचं कारण इतरांच्या घरात उरलेले गोड धोड हे त्यांच्या नशिबी असायच. येड्या इद्र्याच्या तोंडाला यास येतंय बोललेलं खरं हुतंय तस मुक्ताच्या तोंडाला यास हुतं. भोळ्या पणात कोणाला म्हणली
"आता तुला पोरगं हुतंय बघ , तु पास हुतुय बघ" तर ते खरं व्हायचं . अशा एक ना अनेक गोष्टी मुक्ताच्या.
मुक्ताला कधी चांगली साडी चोळी मिळालीच नाही , कुणाची धुनी भांडी करून झाली की तिला वापरून झालेली साडी चोळी मिळायची , पदराला पदूर लावून मुक्ता आपलं अंग झाकत हुती ,
" कधी कोणाला ती वाटत दिसली तर तिला म्हणायची तुझी गरिबी कधी हटायची काय माहिती , मुक्ता मात्र त्यांच्याकडं बघत बसायची आणि आपल्या नशिबाला दोष द्यायची "
शिकण्याच्या नादात मी चार पाच वर्ष बाहेर गेलो. या तंत्रायंत्रांच्या दुनियेत सगळी पुढं सरली. गावात मोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या. जुन्याच नवं झालं. पाचाचं पन्नास झालं. गाव डांबरीकरण झालं .पण मुक्ता मात्र होती तशीच दिसली. थोड केस पिकलेली, तोंडावरची पाक रया गेलेली, एका हातात खूरपं आणि एका हातात शेळी ओढत होती. शेजारीच होतो मी त्यांच्या.
"नऊ वर्षांच्या नाऱ्याला ती जोरानं शेळी हान की हातात जीव नाही का म्हणून ओरडत होती".
आणि नाऱ्या हातात चीचेच बोंड घेऊन खात होता. तीच मळकी चड्डी बनियन घालून हसत होता. मी माझ्या गाडीला अडकवलेल्या पिशवी मधून बिस्किटाचा पुडा काडला आणि त्याला बिस्कीट दिलं. त्यानं ते हातात घेतलं आणि चीचच बोंड खिशात ठेवलं आणि दातांना बिस्कीट पुडा फोडला. एकदम दोन तीन बिस्कीट तोंडात टाकली आणि हात पुढं करून म्हणाला अजुन द्या की. मी अजून दोन बिस्कीट पुडे त्याला दिले.
"तेव्हा मला पाहून मुक्ता जवळ येऊन मला बोलली तु बाहेर हुतास शिकायला आता लय मोठा मास्तर झालंय असं समजलं . माझ्या नाऱ्याला पण तुझ्यासारखं करायचा आहे बघ ," हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता.
"मी म्हणलं करूया की आपण मी सांगीन त्याला सर्व .
"मुक्ता मला म्हणाली जरा लक्ष दे माझ्या नाऱ्याकडे"
मुक्ता एवढ बोलली आणि वाट चालू लागली. ती नजरेआड झाल्यावर मी गाडीला बटण दाबून गाडी घेऊन चाललो आणि गाडीवर असताना मनात एकच विचार मुक्ताचं काय होणार आणि नाऱ्याच भविष्य काय असणार पण तो विचार हा विचारच राहिला ,
मी काहीच मुक्ता साठी करू शकत नव्हतो याची खंत मनात वाटायची .
मुक्ताला शाळेच ज्ञान काडीमात्र नव्हतं पण नाऱ्याला शाळेत तीन घातल हुत, आपल्या पोरांन लय शाळा शिकावी , मोठं व्हावं असं तिला मनोमन वाटत हुत, म्हणून ती त्याला रोज शाळेत धाडायची.
मी कामानिमित्त एक वर्षभर यंत्रांच्या दुनियेत गेलो आणि यंत्रच बनलो , ना मुक्ताची कधी आठवन आली ना नाऱ्या कधी समोर दिसला . खूप दिवसांनी मी परत एकदा गावी आलो , येतोय घरात थांबलो आणि मला मुक्ताच्या घराकडून बायकांचा घोळका आपापसात कुजबुज करत येताना दिसला , ते पाहून माझे पाय आपोआप तिकडे वळले
आणि मुक्ताची स्थिती बघून माझा धीरच सुटला कारण मुक्ता अखेरचा श्वास घेत हुती , ती एका मोडक्या खाटेवर झोपली हुती, डोक्यावर पाण्याची पट्टी हुती , हात पाय हलत नव्हतं तीच सार अंग जड झालं हुतु , मला पाहून तिच्या चेहऱ्यावर थोडा बदल झाला , मला काहीतरी सांगायचं प्रयत्न ती करत हुती पण यंत्रासारख्या हृदयाचा मी मला तिच्या भावना काही समजतं नव्हत्या . ती माझ्याकडे एकदा बघायची व नाऱ्या कडे एकदा पाहायची पण काहीच उमजत नव्हतं .
थोडा वेळ थांबून मी मी घरी आलो हात पाया धून घरात बसलो समोर मात्र मुक्ताच दिसत होती .
" मी आईला विचारल आये मुक्ताला काय झालंय ग '"
"आई बोलली आर मुक्ताला मोठा आजार झालाय , चार दिसाची पाव्हणी आहे म्हणून डाक्टर न सांगितलं आहे, आता सार देवाच्या हातात हाय बघ आपण काय नाय करू शकत "
हे सर्व ऐकून मी आईला बोललो तिला आधी कोणीच हॉस्पिटल मध्ये नेलं नाही का
"मला आई बोलली आर कोण नेणार सदा कुठं गेला तो गेलाच त्याचा काही पत्ता नाही, आणि माहेरकडील कोणीच लक्ष दिल नाही आणि जवा शेजारयानी दवाखान्यात नेलं तेव्हा पार उशीर झाल हुता "
ती यातून जगेल काय या विचारात मी होतो , रात्री कसातरी घास भर जेवलो आणि तसाच बाजल्यावर झोपी गेलो .
पहाटे मात्र आईनं उठवलं
" आर उठ बघ तिकडून आवाज येतोय रडण्याचा मुक्ता गेली वाटत"
मी तसाच उठून गेलो तर मुक्ता हे जग सोडून गेली हुती , लोकांनी तिला तिरडीवर ठेवल हुतु व उचलून नेत हुती , पांढरी शुभ्र कपडी घातलेली लोक एका रांगेत मुक्ताला स्मशान भूमी मध्ये घेऊन चालली हुती . नाऱ्याला एकजनांनी हाताला धरून पुढ नेलं हुत.
स्मशान भूमित आल्यावर तिला सर्पणावर ठेवण्यात आलं , नाऱ्याला हाताला धरून चिता पेटवण्यासाठी एकजण पुढं सरसावला ,अग्नी दिला, नाऱ्याला यातील काही समजतं नव्हतं . माझ्या काळजान मात्र धीर सोडला हुता . मी माझ्या इचारात मग्न हुतु .
"आणि मध्येच आवाज आला हात बाहेर आलाय त्या प्रेताचा तो आत ढकला"
मी तिकडं पाहिलं तर मुक्ताचा एक हात चितेच्या बाहेर आला होता आणि जणू मलाच मुक्ता हात करून सांगत हुती
" मास्तरा माझ्या नाऱ्याला बी तूझ्या सारखा मास्तर कर,
माझ्या नाऱ्याला बी तूझ्या सारखा मास्तर कर.
माझी नजर मात्र नाऱ्याकडं आणि जळणाऱ्या चितेकडं हुती
डोळ्यातून माझ्या अश्रू घळाळं चालू हुतु ,
भयाण शांतता पसरली हुती आणि दूर कुठून तरी टिटवीचा आवाज येत हुता .

कथा लेखक पै. इंजी. समाधान कोळेकर(7498465530)
मार्गदर्शक: दाजी कोळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी