महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला खूप मोठा इतिहास आहे. नाथ सांप्रदाय , दत्त सांप्रदाय , भागवत म्हणजेच वारकरी सांप्रदाय , शैव वैष्णव सांप्रदाय अश्या एक ना अनेक मार्गांनी भक्ती सांप्रदाय भरून गेला आहे. परंतु काही सांप्रदाय महाराष्ट्रातील सारस्वतांच्या विस्मरणात गेल्याचे दिसते. त्यातील हालमत सांप्रदाय व सिध्द सांप्रदाय हे दोन महत्वाचे सांप्रदाय होय. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात हा सांप्रदाय मोठ्या प्रमाणात असून या भागातील मोठा जनसमुदाय या सांप्रदायला मानणारा आहे.
मुळचा शैव सांप्रदायाशी मिळती जुळती संस्कृती असणारा हा समाज स्वतःला मोठ्या प्रमाणावर शिवभक्त म्हणवून घेतो. व. या सांप्रदाय मधील स्थानिक देवदेवता या भगवान शंकराचेच अवतार समजून पुजले जातात.
यातील हालमत सांप्रदाय मध्ये भरमदेव सुरम्मादेवी , काशीलिंग बिरोबा कन कामावती , विठोबा भागीरथी , विठ्ठल बिरूदेव , घोडेगिरी बिरदेव , सतोषा बिरुदेव , म्हाळोबा बिरोबा म्हाळींगराया जकाप राया तूकापराया अशी दैवते पुजली जातात.
तर सिध्द सांप्रदाय मध्ये अमोगसिध्द ,महासिद्ध , मलकारसिध्द , मंगरायसिध्द , धयसिध्द अशी 1700 सिध्द पुजले जातात. महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये मोठ्या प्रमाणावर या दैवतांची मंदिरे मठ असून या ठिकाणी स्थळमहात्म्य मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अश्या हा महत्वाच्या पण दुर्लक्षित सांप्रदायपैकी सिध्द सांप्रदाय मधील महासिद्ध या महत्वाच्या देवतांवर या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने काही लिखाण करणार आहोत.
श्री महासिद्ध यांची पार्श्वभूमी
शंभूमहादेव डोंगर रांगेत वसलेले नातेपुते गावचे पाटील जाबनगौड हे आपल्या कुटुंब व पशुधनासहित नातेपुते या गावी वास्तव्य करत होते. नातेपुते गावचे पाटील या नात्याने कुटुंबाची व गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती. गावामध्ये शिवाचं पानलिंग नामक मोठे प्राचीन मंदिर आहे. जाबन गौड यांच्या पत्नी सौ कन्नबाई असून या मोठ्या धार्मिक मनाच्या होत्या. शेजारच्या शंभू महादेवावर यांची मोठी धर्मनिष्ठा होती.शंभू महादेवावर निस्सीम भक्ती करणाऱ्या कन्नबाई व जाबनगौड यांच्या घरी पुष्कळ खिलार गोधन , भरपूर शेतीवाडी व सुबत्ता घरी नांदत होती. परंतु पोटी संतान नसल्याचे एकमेव दुःख या दोघांना असे. यासाठी मोठ्या महादेवाकडे अनेक वेळा साकडे घातले गेले व तुझाच अंश माझ्या उदरात वाढू दे अशी मनोभावे कामाना हे दांपत्य करत होते. परंतु अश्या परिस्थितिच नातेपुते गावावर मोठा दुष्काळ ओढवला. चाऱ्यापाण्या विना पशुधनाच हाल चालले. शेती पिकेनाशी झाली. आणि जाबनगौड यांना आपल्या कुटुंब कबिल्यासह भटकंती सुरू केली. पाठीमागे आपली संपत्त्ती सुरक्षित राहावी म्हणून आबगौड यांना गावीच ठेवले. शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन मस्क्यान हट्टी ( म्हसवड ) मंग्यानहट्टी (मंगळवेढा ) नंदयानहट्टी ( नंदूर) उमऱ्यानहट्टी (उमरज) व शेवटी गवळयानहट्टी (ग्वाळगी आताचे कर्नाटक मधील इंडी तालुक्यातील गोविंदपूर होय. )
गोविंदपूर परिसरात जाबन गौड यांचा मुक्काम असताना त्या गावातील कोळी समाजाचे चार भाऊ मोठ्या संपत्तीसह राहत होते. गावात त्यांची सुबत्ता बघण्याजोगी होती. परंतु एके दिवशी दरोडेखोर गावावर दरोडा टाकून गावातील सर्व संपत्ती लुटून नेणार असल्याचे आवई उठवली त्यामुळे जामगोंड , लकण्णगौड , बसगोंड व लगमण्णा हे बंधू घाबरून गेले. हा विषय आपली खिलार गोधन राखनाऱ्या जाबनगौड यांच्या कानावर गेला. दरोडेखोरांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी आपला नातेपुते गावचा बंधू आबगौड यांस गोविंदपूर ला बोलावून घेतले. आबगौड व जाबनगौड हे दोघे ही बंधू पट्टा चालवण्यात पटाईत होते. दोघांनी दरोडेखोरांशी सामना करण्याची कसून तयारी केली. ज्या रात्री दरोडेखोर दरोडा घालण्यासाठी आले तेंव्हा आबगौड व जाबन गौड यांनी पराक्रमाची शर्थ केली. व आपल्या पट्टा चालवण्याचा कौशल्यावर दरोडेखोरांना गावातून पिटाळुन लावले. गाव दरोडेखोरापासुन सुरक्षित राहिले. दोघा बंधूंच्या पराक्रमाने गाव सुरक्षित राहिले असे प्रत्येक गावकऱ्यांना वाटू लागले. आणि गावातील श्रीमंत कोळी बंधूंनी जाबनगौडा ना मोठा बंधू मानून गोविंदपूर येथे स्थायिक होण्याची विनंती केली. ही लढाई आपण शंभू महादेवाच्या कृपेने जिंकल्याचे जाबन गौड व आबगौड यांना मनोमन वाटले . त्यामूळे त्यांची शिखरीच्या मोठ्या महादेवावरची श्रध्दा आणखी वाढली. परंतु तरीही पोटी मूलबाळ नसल्याचे दुःख पदरी होतेच.
क्रमशः.
महासिद्ध जन्म कथा पुढील भागात.
(टीप : नातेपुते गावचे परंपरागत पाटील हे पांढरे पाटील आहेत. महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासात या घराण्याचा मोठा वाटा आहे. आजही शिखर शिंगणापूर येथे पांढरे पाटील यांना महाशिवरात्रीला मोठा मान असून महासिद्ध याच घराण्याचे पूर्वज असावेत.)
धन्यवाद
मधुकर हाक्के
पुजारी ( श्री महासिद्ध मंदिर कवलापुर)
9049500097
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी