रविवार, २६ डिसेंबर, २०२१

"जगेन मायभू तुझ्यासाठी" एक प्रेरणादायी, चित्तथरारक अनुभवाचा खजिना : लेखक - रमेशजी खरमाळे

 जगेन मायभू तुझ्यासाठी

आपली भारतमाता आणि आपली भारत भुमी यासाठी आपले जीवन सार्थकी लागत असेल तर त्यासारखे दुसरे भाग्य नव्हे…!

आज मी आपल्याशी अशाच भारतमातेच्या सुपुत्राने “शिवनेरी भुषण (माजी सैनिक) वनरक्षक मा. रमेशजी खरमाळे” यांनी आपल्या अनुभवातुन आपल्या हातातील लेखणीने समृद्ध केलेले “जगेन मायभू तुझ्यासाठी” या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. हा नुसता ग्रंथ नसुन प्रत्यक्ष भास होणाऱ्या अनुभवाचा भरगच्च खजिना आहे. या माध्यमातून निसर्ग आणि रोजच्या जिवनातील अनेक प्रसंगावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रत्येकाने एकदा तरी हा ग्रंथ वाचावा नुसता वाचु नये तर त्या प्रसंगाशी समरस होऊन अनुभवावा. अंगावर शहारे उमटतील, देशप्रेम, निसर्गप्रेम, समाजकार्य उंचबळून येईल. आणि प्रत्येक अनुभव स्वतःला जगता येईल असा हा ग्रंथ.



हृदयी वसे भारतमाता
लेखणी जणु शारदा
धाडस हे भैरवाचे
कसले ध्येय हे भटक्याचे
वर्णन सांगतो सह्याद्रीचे
तव अंगावरी उठे शहारे
देशप्रेम, निसर्गसेवा
कौतुक करावे कार्याचे
सांगतो रमेशजी
बोल आपुल्या अनुभवाचे
ऋणानुबंध भारतभूमीच्या नात्याचे
जीवन आहे आपुले मोलाचे
पण जगावे कुणासाठी
सांगतो प्रत्येक अनुभव
जगेन मायभू तुझ्यासाठी
जगेन मायभू तुझ्यासाठी …!

     लेखकाने साध्या सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या अनुभवाचे कथन या “जगेन मायभू तुझ्यासाठी” या पुस्तकातून केलेले आहे. प्रत्येक प्रसंग वाचताना आपल्याला आपण अनुभवत आहे असा फिल येईल. अंगावर शहारे उमठतील, आणि पुढे काय घडले याची आतुरता लागेल. हे लेखन त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या अनुभवाचे बोल आहे. यावरून आपल्याला नक्कीच लेखकाचे देशप्रेम, सामाजिक जाणीव, आणि निसर्गप्रेम याचा प्रत्यय येईल. आणि आपल्याला पुस्तकाच्या नावाचा अर्थ न सांगता उमगेल यात शंका नाही.

“त्याच्या हातात मी माझा मृत्यू पाहत होतो” हा प्रसंग वाचतांना लेखकाने मांडलेल्या सैनिकाच्या जीवनाची मनोव्यथा आपल्याला खुप काही सांगुन जाते. सीमारेषेवर जगत असलेले जीवन आणि त्यातच गावाकडची एखादी संवेदनशील बातमी कानावर पडते, त्यावेळी या कठोर मनाची होणारी घालमेल कशी असते हे समजेल. जवानांच्या अंगी असलेले देशप्रेम, तो झोपेत असतानाही किती सावध असतो व त्यामुळे लेखकाच्या समोर प्रत्यक्षात यमदुत कसा उभा राहतो. त्यातून लेखक कसा वाचतो. त्यावेळी प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखकाने आपल्या लेखणीतून केलेले कथन नक्कीच अंगावर शहारे उभे करतील.
“बिबट्याच्या पिल्लाची व आईची रेस्क्यूद्वारा थरारक भेट” या प्रसंगातुन ‘बिल्ली के गले मे घंटी बांधेगा कौन ?’ या प्रश्नाला दिलेले आपल्या धाडसातून उत्तर…! यामध्ये लेखकाच्या प्रसंगावधान, नियोजन, धाडस, सामाजिक जाणीव, वन्यजीवांबद्दल असलेला आदरभाव अशा अनेक गुणांचे दर्शन घडते, आणि प्राण्यांनाही भावना असतात याची जाणीव निर्माण करून दिली जाते. प्रत्यक्ष वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहते आहे नकळत हा थरार आपल्या डोळ्यासमोर तरळत राहतो.
‘माळशेज घाटातील अपघात’ या लेखातील वर्णन वाचताना, समोर असणारे मृत्यूचे तांडव आणि त्यातील जखमींना वाचविण्यासाठीची लेखकाने केलेली धाडसी रेस्क्यू मोहीम डोळ्यासमोरून जात नाही. यात लेखकाची जखमींना वाचविण्यासाठी केलेली धडपड, धाडस आणि माणुसकी या गुणांचे दर्शन होते.
‘बेल्हे येथील दुर्घटना’ या लेखात लेखकाचे विहिरीत पडलेल्या लोकांना वाचविण्याचे केलेलं प्रयत्न आणि उपाययोजना तसेच माणसाने निर्माण केलेल्या प्रदुषणाचे दुष्परिणाम लेखकाने मांडलेले आहेत.
त्याचबरोबर पुराच्या पाण्यात अडकलेल्या मजूर कुटुंबाला वाचविण्यासाठी दाखवलेली तत्परता व सजगता ‘जीवनदान’ या लेखातून दिसून येते. जनसेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद लेखक सतत जपत असल्याचा प्रत्यय येतो.
‘पेट्रोल पंपावर बस जेव्हा अचानक पेटते’ आणि अंथरुणाखालुन जेव्हा साप बाहेर पडतो’ या लेखातून लेखकाचे प्रसंगावधान दिसुन येते.
तसेच ‘गणपती गडदचा प्रवास’ या लेखातून सहकुटुंब भ्रमंती मधुन त्यांनी निर्माण केलेली आपल्या कुटुंबातील निसर्ग भ्रमंतीची आवड दिसुन येते.
मानव असो वा प्राणी यांच्यात भेदभाव न करता तेवढ्याच आपुलकीने, प्रेमाने लेखक सर्वांना मदत करत असतो याचा अनुभव आपल्याला या पुस्तकातील प्रत्येक लेखातून दिसून येईल असाच एक प्रसंग ‘त्याला वाचविले ८० जणांच्या तावडीतून’ या लेखातून जाणवतो आपला जीव धोक्यात घालून लेखक एका विषारी घोणस सापाला वाचवितो आणि त्याच दिवशी एका पक्षालाही जीवनदान देतो. तसेच ‘फक्त तिच्यासाठी’ या लेखात दुर्मिळ होत चाललेल्या उदमांजर याचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड यातून लेखकाचे प्राणी आणि पक्षांवरील प्रेम आपल्याला दिसून येईल.

https://youtu.be/IEOS2d5T_CE
नैसर्गिक पुलाचा थरार

लेखक एक ध्येयवेडा भटक्या आहे हे आपल्याला या पुस्तकातून पानोपानी जाणवेल. असाच एक वेडा प्रसंग लेखकाचे धाडसी वेडेपण सांगुन जाईल. ‘नैसर्गिक पुलाचा थरारक अनुभव’ यामध्ये लेखकाने मांडलेला प्रसंग वाचताना आपल्या अंगावर काटा येईल. सुमारे दोन-तीन हजार फुट खोल दऱ्या आणि रुंदीला कमी अशा भयानक कातळ भिंतीवर आपले दोन्ही पाय खाली सोडून हळूहळू पुढे सरकणे आणि आपले ध्येय घाटणे. असे अजब धाडस लेखकाने केले. कुठुन येतं एव्हढ बळ ? देव जाणे ..! असे अनेक प्रसंग या पुस्तकातून आपल्याला दिसून येतील. साक्षात मृत्यूला आव्हान देत. सह्याद्रीच्याकुशीत वाऱ्याशी हितगुज करत, कडेकपारी, डोंगर रांगा, गिरिशिखरे यांना आपलसं करीत, निसर्गाच्या सानिध्यात प्राणी पक्षांशी भावनिक नातं निर्माण करून, निसर्गाने पाहुणचार म्हणुन दिलेला रानमेवा चाखत, आणि प्राणी पक्षांप्रमाणे सोबत आणलेले बीज निसर्गात रुजवत आपला प्रवास हे भटके चालूच ठेवत असतात. ना वेळेच भान, ना कशाची भीती, मनात फक्त आस आज ठरविलेले ध्येय पूर्ण करायचे, अशी स्वप्नाळू माणसं रोज नवीन स्वप्न पाहुन ते रंगवत पुर्ण करायचे यासाठी जीवाचा आटापिटा करायचा पण मनात ठरविलेले साध्य करायचेच. अशा अनेक गोष्टींची ओळख या पुस्तकातून सतत होत राहील.

https://youtu.be/ICvpqkeqgx0
भैरवगड थरार

अनेक गडकोट, गिरिशिखरे, नद्या, जंगले याची भ्रमंती लेखकाने केलेली जाणवेल कधी सोबतीला गाईड तर कधी स्वताच मार्ग काढत ट्रेकिंग करायचे यातून आपल्याला लेखकाचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास जाणवेल आणि ट्रेकिंग चा अनुभवही. भैरवगड, माळशेज घाट, हरीश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा, वानरलिंगी, पडलिंगी, सांदण दरी, भीमाशंकर, शिवनेरी, हरिहर, गणपती गडद, नाणेघाट, जीवधन, मच्छिंद्रगड, गोरक्षगड, पेमगिरी, म्हसवंडीघाट, खामुंडीघाट, नांगरदरा, टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, भोजदाऱ्या, भोरांड्याची नाळ, दाऱ्याघाट, खुटादारा, डोणीदरा, विविध कोकणकडे, किल्ले चावंड असे अनेक गडकोट, भुयारे, बारवा गिरिशिखरे, डोंगरदऱ्या, नद्या यांची ओळख लेखकाच्या अनुभवातुन केलेल्या लेखणीतून होईल.

लेखकाचे सर्वांना सामावून घेण्याचे स्वभावगुण ही अनेक प्रसंगातुन जाणवतील. त्यातीलच ‘ऐंशी वर्षाचा तरुण गाईड’ ‘म्हसवंडी खामुंडी घाट’ चिमुकले गाईड यांच्यासोबत केलेली भ्रमंती, वाटेवर भेटलेल्यांना मदत आणि सोबतीला असलेले सोबती. यातुन आपल्याला लेखकाच्या सर्वांच्यात समरस होऊन जाणे. या गुणांची ओळख करून देईल.



    याचप्रमाणे लेखकाचे वनरक्षक म्हणुन अनेक सामाजिक कार्ये, सोशल मिडिया योगदान, निसर्गसंवर्धनविषयक अनेक कार्याची ओळख, पुरस्कार, सन्मान आपल्याला या पुस्तकातून नक्कीच होईल. आणि निसर्ग भ्रमंती याविषयी हे पुस्तक खुप काही शिकवुन जाईल. यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येक सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे, भटकंती करणारे, युवा तरुण, यांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आपल्याला नक्कीच प्रेरणा देत राहील.
रमेश सरांचे व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला जाणवेलच. त्यांच्या समृद्ध अनुभवाचा खजिना असाच सर्व समाजप्रेमी, निसर्गप्रेमी, नवयुवक सर्वांपर्यंत पोहचावा. त्यांच्या लेखणीला बळ मिळुन त्यांच्या हातुन अनेक सत्कार्य घडावीत. यासाठी त्यांना माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा…!


लेखक : राहुल दादा बिचकुले
संपादक : माझीलेखणी.com
यवत, ता. दौंड, जि. पुणे

लेखक परिचय ( जगेन मायभू तुझ्यासाठी )
श्री. रमेश गणपत खरमाळे
शिवनेरी भूषण ( माजी सैनिक खोडद )
मु. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे.
भारतीय सैनिक सेवा १९९५ ते २०१२
रिटायरमेंट नंतर बँकेत गनमॅन म्हणुन ६ महिने नोकरी
सध्या वनविभाग जुन्नरमध्ये वनरक्षक पदावर नियुक्ती
समाज सेवा
तत्पर आपत्कालीन मदत, वृक्षारोपण व बिया रोपण, स्वच्छता अभियान, किल्ले संवर्धन, मुलांच्या करीअरसाठी मोफत सेवा, महाराष्ट्र शासन पुरस्कार २०१८ इ. अनेक सामाजिक पुरस्कार, तालुक्यात इतर महत्वपूर्ण योगदान


 

२ टिप्पण्या:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...